अंबाजोगाईच्या स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेत "भान" शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन

अंबाजोगाईच्या स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेत "भान" शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन
=======================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
येथील स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेत "भान" शिबिराचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. या शिबिरात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पौगंडावस्थेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी "भान" शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

पौगंडावस्था म्हणजे मुलांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा. या काळात त्यांच्यात शारीरिक, मानसिक व भावनिक बदल होत असतात. ज्यामुळे मुलांना अनेक प्रकारच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. या वयात त्यांच्यात असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव आणि बदलत्या शरीराबद्दल अनिश्चितता असते. योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांची विचारसरणी व वर्तनावर परिणाम होऊ शकतो. या काळात त्यांना योग्य समुपदेशन आणि योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा अनेक अडचणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. कित्येकवेळा मुलामुलींच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या घटना या काळात घडू शकतात म्हणून या वळणावर मुलामुलींना भानावर आणणे गरजेचे असते. यामुळेच स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिर शाळेत इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पौगंडावस्थेतील अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी "भान" शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे तीन दिवसीय शिबिर दि.१९, २० आणि २१ सप्टेंबर २०२४ रोजी शाळेत आयोजित करण्यात आले होते. श्रीमती वैशालीताई गोस्वामी यांनी विद्यार्थ्यांना पौगंडावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, त्यांचे परिणाम, आणि या बदलांना कसे हाताळावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या शिबिरादरम्यान त्यांचे प्रश्न विचारले व प्रशिक्षक वैशालीताईंनी त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले, तसेच मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधला. नवक्षितिज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांच्या परवानगीने व शाळेच्या मुख्याध्यापिका स्वरूपाताई दिग्रसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्विरित्या संपन्न झाला. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक होत आहे.

=================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)