शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण कुटुंब संकल्पनेचा अवलंब करावा - डॉ.बाबासाहेब ठोंबरे
जवळबन येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन
=================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
ग्रामीण संस्कृतित कृषिचे अनन्यसाधारण महत्त्व व योगदान असून दिवसेंदिवस शेती व्यवसायास प्रतिकूल होत जाणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीत शेतकऱ्यांनी हवामान बदलास अनुकूल पिक पद्धतीचा अवलंब करावा. कृषि, पशुधन व मानव हे एकमेकांस पूरक निसर्गचक्र असून ते सकारात्मक दिशेने गतिमान करणे आवश्यक आहे. असे उद्गार कृषि महाविद्यालय लातूर व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्र महाविद्यालय लातूरचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे यांनी काढले. ते कै.भानुदासराव बाबुराव करपे यांच्या पाचवे पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवार, दि.०३ जुलै रोजी आयोजित केलेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून गटशेतीचे प्रणेते तथा केशर आंबा लागवड व निर्यात अभ्यासक भगवानराव कापसे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाकेशरचे संस्थापक अध्यक्ष सुशिल बलदवा व माजी सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी गिरी, डॉ.शिवाजी मस्के, अच्युतराव गंगणे, ऍड.विश्वनाथ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.ठोंबरे पुढे बोलताना म्हणाले की, गांव खेड्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण कुटुंब या नविन संकल्पनेचा अवलंब करून स्वावलंबी बनावे. भगवानराव कापसे यांनी शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनात हवामानानुसार शेतकऱ्यांनी फळे, भाजीपाला व नगदी पिके उत्पादित करावीत. अतिघन केशर आंबा लागवड करून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आंब्याचे उत्पादन घेऊन निर्यातक्षमता वृद्धिंगत करावी व आपले निव्वळ उत्पन्न वाढवावे. शेतकऱ्यांना गट शेतीचा प्रयोग करणे क्रमप्राप्त असून त्यामुळे लागवडीचा खर्च कमी होण्यास मदत होईल व नफा वाढेल असेही डॉ.कापसे यांनी प्रतिपादन केले. माजी सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी गिरी यांनी वन्य प्राण्यांपासून पिकाचे कसे संरक्षण करावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.दिलीप करपे यांनी केले तर आभार अभियंता प्रकाश करपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रकांत करपे, राजाभाऊ करपे, विश्वनाथ चव्हाण, दीपक शिनगारे, नरहरी करपे, बाबुराव खोडसे, जनक करपे, शिवाजी करपे, शहाजी करपे, ऍड.पी.जी.शिंदे आदींनी परिश्रम घेतले. शेतकरी मेळाव्यास पंचक्रोशीतील शेतकरी, पशुपालक व तरूण बहुसंख्येने उपस्थित होते.
================================
Comments
Post a Comment