योगेश्वरी देवल कमिटीच्या नविन विश्वस्तांची झालेली निवड तात्काळ रद्द करा
सर्वपक्षीयांचे ठिय्या आंदोलन ; तहसीलदारांना निवेदन
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्रीक्षेत्र माता योगेश्वरी देवी देवल कमिटीच्या नविन विश्वस्तांची झालेली निवड तात्काळ रद्द करा अशी मागणी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि भाविकांनी मागील काही दिवसांपासून सातत्याने केली आहे. याप्रश्नी सोमवार, दिनांक १ जुलै रोजी सर्वपक्षीयांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. व तहसीलदार, अंबाजोगाई तथा अध्यक्ष, योगेश्वरी देवल कमिटी यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार, अंबाजोगाई तथा अध्यक्ष, योगेश्वरी देवल कमिटी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संपुर्ण महाराष्ट्राची कुलस्वामीनी असलेल्या अंबाजोगाईच्या श्री.योगेश्वरी देवीच्या विश्वस्त मंडळाची मुदत संपल्यामुळे नवीन विश्वस्त मंडळ भाविकांमधून निवड करण्याचे आदेश मा.सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बीड यांनी दिले. या आदेशानुसार अंबाजोगाई शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या भक्तांना विविध निकष लावून अर्ज मागविण्यात आले. त्यामुळे एकुण १११० भक्तांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर त्रुटीमध्ये २३७ अर्ज काढले गेले. ८७३ भक्तांचे दररोज ४० या प्रमाणे बीड येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात जवळपास ३५० भक्तांनी बीड येथे जाऊन मुलाखती दिल्या. घेण्यात आलेल्या या मुलाखती ईन कॅमेरा न घेतल्याने निवड करण्यात आलेल्या विश्वस्त महोदयांनी अशा कोणत्या प्रकारे मुलाखती दिल्या हे शंकास्पद आहे. सदर निवड झालेल्या विश्वस्तांची यादी उघड झाल्याने अंबाजोगाईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवड केलेल्या १६ विश्वस्तांपैकी ४ ते ५ विश्वस्त हे अंबाजोगाई शहराबाहेरील असून त्यांचे अन्य गावाच्या मतदार यादीमध्ये नांवे आहेत. यादीतील शिरीष पांडे व पृथ्विराज साठे वगळता अन्य १३ विश्वस्त हे वर्षातून एक वेळेस तरी देवीच्या दर्शनासाठी येतात का..? या बद्दल नागरिकांकडून सवाल उपस्थित करण्यात येत आहे. विश्वस्त म्हणुन नवीन नियुक्ती देताना मागील १६ पैकी १० जणांना कमी करण्यात आलेले असून यामध्ये मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचाही समावेश आहे. तर नव्याने निवड झालेल्या विश्वस्तांमध्ये आजी व माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, एक न्यायालयीन तक्रारदार यांचेसह एका व्यक्तीच्या गोतावळ्यामधील तब्बल १० जणांचा समावेश आहे. निवड करण्यात आलेल्या विश्वस्तांमध्ये योगेश्वरी देवीशी निगडीत पारंपारिक सेवा करणारा पुजारी, पौरोहित्य करणारा पुरोहित, पालखी उचलणारे भोई, नवरात्र व अन्य उत्सवात सेवा देणारे कलावंत, गोंधळी, सेवेत असणाऱ्या बारा बलुतेदारांपैकी एक, मागासवर्गीयांपैकी एक यांच्या सारख्या व्यक्तींचा समावेश केला असता तर कोणीही यादीवर आक्षेप नोंदविला नसता अशी चर्चा शहर व परिसरात सुरू आहे. वरील प्रकरणात विश्वस्तांची निवड करतांना मा.सहाय्यक धर्मादाय आयुक्त, बीड यांच्या कार्यालयाकडून विशेष व्यक्तींचाच समावेश केलेला आहे. तरी सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा सर्वपक्षीयांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील सर्वपक्षीय निवेदनावर शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख बाळासाहेब शेप प्रिन्स, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.बब्रुवाहन पोटभरे, भिमशक्तीचे भिमराव सरवदे, लोकजनशक्ती पार्टीचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे, कृष्णा सुनिलराव लोमटे, दिपक भाऊ कांबळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर ठिय्या आंदोलनात शिवसेना (उबाठा) केज तालुकाप्रमुख अशोक जाधव, विधानसभा महिला आघाडी संघटिका डॉ.नयनाताई शिरसाट, शहरप्रमुख अशोक हेडे, जिल्हा समन्वयक अशोकराव गाढवे, विधानसभा समन्वयक युवराज चव्हाण, विधानसभा सचिव दुल्हेखाॅं पठाण, मा.तालुकाप्रमुख बाळासाहेब वाघाळकर, महिला आघाडी शहरप्रमुख सुनिता जाधव, तालुका सचिव बाबा भिसे, उपतालुकाप्रमुख निखील पाडुळे, शहरसचिव शंकर भिसे, उपतालुकाप्रमुख बालाजी चाटे, उपतालुकाप्रमुख विलास घाडगे, उपशहर प्रमुख पप्पू आपेट, युवासेना शहरप्रमुख निलेश जाधव, भीमशक्तीचे रवी आवाडे. सुमित आवाडे, धीरज आवाडे, लोकजनशक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गोरे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश घार, जिल्हा उपाध्यक्ष मारोती शिंदे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अशोक काळे, अंबाजोगाई शहराध्यक्ष प्रदीप घुंडरे, अंबाजोगाई शहर कार्याध्यक्ष आदित्य चौरे, शहर उपाध्यक्ष अर्जुन शिंदे, विशाल शेवाळे, मनोज जोगदंड, निसार पठाण, गजानन तिरमले, फिरोज शेख, पिंटू कांबळे आदींसह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि देवीचे भाविक सहभागी झाले. याप्रकरणी शासन व प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही केली नाही तर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय निवेदनातून देण्यात आला आहे.
=================================
Comments
Post a Comment