प्राचार्य राजाभाऊ धाट सहस्त्रचंद्र दर्शन समारोहातून घडले नि:स्वार्थ ध्यासपूर्ण समर्पणाचे दर्शन
शाश्वत विकासासाठी प्राचार्य धाट यांचे मौलिक कार्य - सतिश मराठे
सहस्त्रचंद्र दर्शन समारोहातून घडले नि:स्वार्थ ध्यासपूर्ण समर्पणाचे दर्शन
=================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती आहे. विद्यार्थीप्रिय आणि प्रयोगशील प्राचार्य म्हणून ज्यांचा आजही नांवलौकिक आहे. व ज्यांनी शिक्षणासोबतच वित्त, ग्रामीण आणि कृषी विकास, अ.भा.वि.प., सहकार भारती अशा विविध क्षेत्रातील संस्था आणि सेवाकार्याच्या उभारणीत तसेच विकास कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्या प्राचार्य राजाभाऊ धाट यांच्या बहुमोल कार्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहरात प्राचार्य धाट यांचे चाहते, विद्यार्थी, कुटुंबिय व विविध क्षेत्रातील सहकारी यांनी एकत्रित येत समारोह समितीच्या माध्यमातून सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे रविवार, दिनांक ३० जून २०२४ रोजी आयोजन केले होते.
अंबाजोगाई शहरात प्रख्यात प्राचार्य राजाभाऊ गोपाळराव धाट यांच्या बहुमोल कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी सहस्त्रचंद्र दर्शन समारोह अनिकेत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. मुख्य समारोहाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत केळकर (भूतपूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री, सहकार भारती) हे होते. तर यावेळी व्यासपीठावर सतीश मराठे (सदस्य, केंद्रीय संचालक मंडळ, भारतीय रिझर्व बँक) हे प्रमुख अतिथी. आणि गौरवमूर्ती प्राचार्य राजाभाऊ धाट, सौ.सुलभा धाट, वसंतराव देशमुख, प्रा.डॉ.शरदराव हेबाळकर, डॉ.अ.द.पत्की या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्री व सौ धाट यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल, भेट वस्तू आणि चित्रकार उमेश डोंगे यांनी काढलेले अप्रतिम रेखाचित्र भेट देवून ह्रद्य सत्कार करण्यात आला. तसेच दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष ऍड.मकरंद पत्की, उपस्थित सर्व सन्माननीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी ही यथोचित सत्कार केला. प्रारंभी गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक संयोजन समितीचे डॉ.अ.द.पत्की यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी यांनी केले. तर बहारदार सुत्रसंचालन अभिजीत जोंधळे यांनी केले. सन्मानपत्राचे लेखन प्रा.शाम बारडकर व प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी यांनी केले. यावेळी प्राचार्य धाट यांचे विषयी बोलताना प्रा.डॉ.शरदराव हेबाळकर यांनी ऋग्वेदातील संदर्भ देत आजच्या सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मोठे महत्त्व आणि उपयोगीता असल्याचे नमूद केले. सहस्त्रचंद्र दर्शन समारोह करण्यामागील उद्देश सांगितला. व्यक्ती जीवन- समाज जीवन-राष्ट्र जीवनाचे महत्त्व विशद केले. तर वसंतराव देशमुख यांनी संघ परिवार, विद्यार्थी परिषद, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि सहकार भारतीच्या माध्यमातून प्राचार्य धाट यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला. सतिश मराठे यांनी विद्यार्थी परिषद व सहकार भारती यांच्या उभारणीत तसेच ग्रामीण भागात शेती, बॅंक, संशोधन, विकास सोसायटीच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी प्राचार्य धाट यांनी केलेले कार्य मौलिक आहे असे प्रतिपादन केले. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य राजाभाऊ धाट यांनी मा.मा.क्षीरसागर यांच्यामुळे मी घडलो. भाशिप्र, दीनदयाळ बॅंक, दीनदयाळ शोध संस्थान, वृद्धांसाठी प्रकल्प उभारणी, संघ परिवार, विद्यार्थी परिषद, सहकार भारती याद्वारे देशभक्ती व आपुलकीचा संस्कार समाजात पुढे नेला. समाजात एकोपा वाढीस लागावा म्हणून प्रसंगी विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांशी मैत्री जोपासली असे सांगितले. विविध आठवणी सांगताना प्राचार्य धाट यांचा कंठ दाटून आला होता. ह्रद्य सत्कार केल्याबद्दल संयोजन समिती व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. अध्यक्षीय समारोप करताना सूर्यकांत केळकर यांनी सांगितले की, प्राचार्य धाट यांनी समाजासाठी नि:स्वार्थ, समर्पण भावनेतून अध्ययन व अध्यापन केले. त्यांनी केलेले सातत्यपूर्ण परीश्रम, ध्यासपूर्ण कार्याचा हा गौरव आहे. धाट यांनी समाजकार्य हा यज्ञ आरंभला. आजच्या काळात समर्पित भावनेतून समाजकार्य करणाऱ्या प्राचार्य धाट यांचा सत्कार होणे ही अभिनंदनिय बाब आहे असे गौरवोद्गार सूर्यकांत केळकर यांनी काढले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य धाट यांच्या जीवनकार्याचा परीचय करून देणाऱ्या प्राजक्त गौरवग्रंथाचे विमोचन करण्यात आले. गौरवग्रंथाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे असून त्यात ९ विभागात ६२ वाचनिय लेख आहेत. हा गौरवग्रंथ १६८ पानांचा आहे. ज्यात सचित्र वृत्तांत आहे. अत्यल्प कालावधीत गौरवग्रंथाचे सुरेख संपादन प्रा.सतिश हिवरेकर, प्रा.शाम बारडकर, प्रा.दत्तप्रसाद गोस्वामी, प्रा.डॉ.दिगंबर मुडेगावकर आणि श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. यासाठी माणिक जैन यांचे मोठे सहकार्य लाभले. प्रारंभी सकाळी शांती हवन, तुला करण्यात आली. त्यानंतर पहिल्या सत्राचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलन आणि भारतमातेच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.सतिश पत्की हे होते. पहिल्या सत्रात मला भावलेले धाट सर या विषयावर ऍड.किशोर गिरवलकर, संजय सराफ, प्रा.प्रदीप रत्नपारखी, विष्णु बोबडे, गिरीश कऱ्हाडे, महेश वैद्य, सौ.रजनी सोनवळकर, रमेश पांडव, उन्मेष मातेकर, भगवानराव शिंदे, भक्तराम हळबे, सौ.सुजाता धाट, निवृत्ती दराडे, डॉ.गोपाळ चौसाळकर यांनी नेमक्या शब्दांत धाट सरांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू, भूमिका, स्वभाव वैशिष्टे, कार्यकर्तृत्व उलगडून दाखवत स्वानुभव कथन केले. गौरवपूर्ण उल्लेख करून या सत्राचा अध्यक्षीय समारोप प्रा.सतिश पत्की यांनी केला. बाहेरगावाहून आवर्जून उपस्थित असलेले विष्णू बोबडे (ठाणे), नंदू पावगी (पालघर), गणेशराव गाडगीळ (सांगली), उमेश कुलकर्णी या मान्यवरांचा धाट परिवाराकडून सहर्ष स्वागत करण्यात आले. कार्यक्रम स्थळी चित्रकार उमेश डोंगे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. प्रथम सत्राचे सुत्रसंचालन प्रा.शाम बारडकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संकेत धाट यांनी मानले. यावेळी संघ परिवार, विद्यार्थी परिषद, सहकार भारती, भाशिप्र संस्था, दीनदयाळ बॅंक, दीनदयाळ शोध संस्थान यांच्यासह विविध प्रकोष्ठ यांच्याशी निगडित मान्यवर, कार्यकर्ते, स्वयंसेवक, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, डॉ.सुरेंद्र आलुरकर, डॉ.नरेंद्र काळे, पंजाबराव मस्के, राम कुलकर्णी, महेंद्र निकाळजे आदींसह शिक्षण, समाजकारण, सहकार, अर्थ, वैद्यकीय, पत्रकारिता, विधी, व्यापार, कृषी, सांस्कृतिक, संगीत, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवरांसह माजी विद्यार्थी, सहकारी, नातेवाईक, स्नेही उपस्थित होते. वैयक्तिक पद्य विश्वजीत धाट यांनी सादर केले. मुख्य समारोह सत्रात उपस्थितांचे आभार समीर धाट यांनी मानले. सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाच्या यशस्वितेसाठी समारोह संयोजन समितीचे डॉ.अ.द.पत्की, सौ.शरयूताई हेबाळकर, बिपीन क्षीरसागर, ऍड.मकरंद पत्की, प्रा.अशोक पाठक, डॉ.श्रीकांत बुट्टे, सनतकुमार बनवसकर, मकरंद सोनेसांगवीकर, डॉ.प्रफुल्ल पानसे, डॉ.सरिता पानसे, समीर धाट, सौ.रेणूका धाट, अनिल मोहरीर, सौ.संंपदा मोहरीर, डॉ.संकेत धाट, सौ.सुप्रिया धाट आदींसह इतरांनी पुढाकार घेतला. कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
==================================
Comments
Post a Comment