केवायसी संदर्भात रखडलेले अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा-अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
केवायसी करून ही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे, सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही अनेक शेतकरी बांधव अनुदानापासून वंचित आहेत. तसेच असंख्य वयोवृद्ध शेतकऱ्यांचे अंगठे व डोळे व्यवस्थित स्कॅन न होणे, या संदर्भात शेतकऱ्यांना बॅंक, तलाठी व तहसीलदार कार्यालयात सतत चकरा माराव्या लागत आहेत. शेतीची कामे, दवाखाना तसेच हातातली अत्यावश्यक कामे सोडून रखडलेले अनुदान मिळविताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांची हेळसांड थांबवून रखडलेले अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना मंगळवार, दिनांक 4 जुलै रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे आणि विभागीय अध्यक्ष गोपाळराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांची प्रत्यक्ष भेट घेवून व चर्चा करून महसूल प्रशासनाचे महत्त्वाचे प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंबाजोगाई तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे अनुदान वाटप केले आहे. तर काही शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप वाटप केले नाही. वाटप न करता प्रत्येक शेतकऱ्याला केवायसी करणे बंधनकारक केलेले आहे. यात जवळपास सर्व शेतकऱ्यांनी केवायसी केलेले असून ही दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन ही केवायसीच्या नांवाखाली आज पर्यंत अनेक शेतकऱ्यांचे अनुदान हे बँकेत जमा केलेले नाही. शेतकरी बँकेत गेले असता केवायसी दाखवले जाते. परंतु, पेमेंट दाखवले जात नाही. बँकेतले कर्मचारी शेतकऱ्यांना तलाठ्याकडे पाठवतात, तर तलाठी तहसील कार्यालयात पाठवतो. तहसीलचे कर्मचारी परत शेतकऱ्याला त्यांच्या सज्जाचे तलाठ्याकडे जाऊन चौकशी करा म्हणून परत पाठवतात. तसेच बँकेचे, तहसीलचे व तलाठी हे कर्मचारी शेतकऱ्यांना सहकार्य करायचे सोडून प्रसंगी उद्धटपणे वागतात. यात शेतकऱ्यांची हेळसांड होताना दिसत आहे. यात आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण केले जात आहे. अजून किती दिवसांपर्यंत शेतकऱ्यांनी बँक तलाठी व तहसील या ठिकाणी चकरा माराव्यात. तसेच जे वयस्कर शेतकरी आहेत. त्यांना आधार अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर त्यांचे अंगठे लागत नाहीत. डोळे पण स्कॅन होत नाहीत. याला आपण पर्याय उपलब्ध करावा. तरी याबाबत उपजिल्हाधिकारी साहेबांनी याप्रकरणी लक्ष देऊन शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशी विनंती व सहकार्याची अपेक्षा सदरील निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी तहसिलदार, तहसिल कार्यालय अंबाजोगाई यांना देण्यात आली आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख रणजित डांगे, सुधीर उफाडे, पांडुरंग देशमुख, नृसिंह ढवळे, शेख अकबर, बालासाहेब नेमाणे, रामेश्वर भोसले आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांचेकडून दखल :
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मागणी बाबत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न आणि जे वयोवृद्ध, वयस्कर शेतकरी आहेत. त्यांना आधार अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर त्यांचे अंगठे लागत नाहीत. डोळे पण स्कॅन होत नाहीत. याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असे निवेदनकर्त्यांना आश्वासित करून याप्रश्नी श्री.मुंदडा यांनी उपजिल्हाधिकारी व तहसिलदार यांचेशी चर्चा केली. आणि प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
==========================
Comments
Post a Comment