केज पाठोपाठ अंबाजोगाई ‘एमआयडीसी’च्याही जागेसाठी शोध सुरू

आ.नमिताताई मुंदडा यांच्या मागणीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अनुकूल

=========================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) अंबाजोगाई येथे एमआयडीसी व्हावी याबाबत आ.नमिताताई अक्षय मुंदडा या सातत्याने प्रयत्नशील आहेत. आ.मुंदडा यांच्या मागणीला आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही अनुकूलता दर्शविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे यांनी या प्रकरणी बीड जिल्हाधिकारी यांना नियोजित अंबाजोगाई एमआयडीसी संदर्भात जागा उपलब्धता बाबतची माहिती देण्यासंदर्भातचे पत्र शुक्रवार, दि. 14 जुलै रोजी दिले आहे. यामुळे लवकरच प्रस्तावित क्षेत्राची महामंडळाच्या मुख्यालयीन स्तरावरील भू-निवड समिती मार्फत पहाणी करून भूसंपादन प्रस्ताव मुख्यालयामार्फत शासनाच्या उच्चाधिकार समिती समोर सादर होणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील बेरोजगार युवक, नवउद्योजक तसेच जनतेने आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांचे आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले आहेत.


महाराष्ट्रात जवळपास सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एमआयडीसी आहेत. परंतु, अंबाजोगाई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत औद्योगिक क्षेत्र प्रकारातील प्रकल्प नाही. अंबाजोगाईत एमआयडीसी व्हावी म्हणून दिवंगत मंत्री स्व.डॉ.विमलताई मुंदडा यांनी सन 2004 मध्ये वरवटी येथे पंचतारांकित एमआयडीसी मंजूर केली होती. त्यासाठी गायरान व शेतकर्‍यांची जमीन संपादन करणे आवश्यक होते. परंतु, शेतकर्‍यांनी विरोध केल्याने सदर प्रकल्पासाठी जागा उपलब्ध झाली नाही. या विषयी आ.नमिताताई अक्षय मुंदडा यांनी संदर्भीय पत्र क्रं.2 व 3 अन्वये मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, प्रधान सचिव उद्योग विभाग यांना लिहिलेल्या पत्रात अंबाजोगाई जि.बीड येथे औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी अंतर्गत औद्योगिक क्षेत्र स्थापन करण़ेबाबत मंजूरी द्यावी अशी विनंती केली होती. आ.मुंदडा यांच्या मागणीला आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेही अनुकूलता दर्शविली आहे. अंबाजोगाई शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने व या ठिकाणी बहुतांश जिल्हास्तरीय सर्व कार्यालय कार्यरत आहेत. या ठिकाणी सहकारी साखर कारखाना, सुतगिरण्या, कृषी उत्पादनावर आधारीत प्रक्रिया उद्योग, सहकारी बँका, पतसंस्था, आरोग्य विषयक सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याच प्रमाणे शहरापासून लातूर येथील विमानतळ जवळ असून परळी, घाटनांदुर, लातूर येथील रेल्वे स्टेशनही जवळच आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकदारांच्या दृष्टीने अंबाजोगाई हे शहर सोयीचे आहे. शहरालगत मोठ्या प्रमाणावर गायरान, मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसी प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे या भागातील सुशिक्षीत, बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळवून उद्योजकांना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. व अंबाजोगाई येथे तातडीने एमआयडीसी व्हावी यासाठी आ.नमिता मुंदडा यांनी राज्याच्या उद्योग विभागाला पत्र दिले होते. तसेच या बाबत महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव, भूसंपादन विभागाचे महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आ.मुंदडा यांच्या पाठपुराव्याला सकारात्मकता दर्शवित बीड जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. अंबाजोगाई शहरा लगत 10 ते 15 कि.मी.च्या परिघामध्ये जमिन उपलब्ध आहे किंवा कसे व खाजगी जमीन भूसंपादन करता येईल किंवा कसे या बाबतची माहिती उपलब्ध करून देणेबाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी यांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. जेणे करून सदर माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर प्रस्ताविक क्षेत्राची महामंडळाच्या मुख्यालयीन स्तरावरील भू-निवड समिती मार्फत पाहणी करून भूसंपादन प्रस्ताव मुख्यालयामार्फत शासनाच्या उच्चाधिकारी समिती समोर सादर करणे सोयीचे होईल असे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे यांनी बीड जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे. यामुळे अंबाजोगाई तालुक्यात एमआयडीसी निर्मितीसाठी शासकीय पातळीवर हालचाल सुरु झाली असल्याची चिन्हे आहेत. एमआयडीसी मुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार मिळेल व उद्योजकांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्ती करून आ.नमिताताई मुंदडा यांनी या बाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, भाजपाचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.


=========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)