कमी खर्चाचे पाणी साठवण हौद शेतकऱ्यांसाठी उपयुक्त - व्ही.चारी
दीनदयाल शोध संस्थान, कृषि विज्ञान केंद्र, डिघोळआंबा यांच्या माध्यमातून एन.बी.सी.एफ.डी.सी.यांच्या सौजन्याने बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अकरा गावांमध्ये उभारलेल्या एकूण १८ नारळ काथ्या - सिमेंट निर्मित जमिनीखालील पाणी साठवण हौदाची पाहणी
============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
शेतकरी कुटुंबाने लघु व्यवसाय उभारणीस अल्प दरात कर्ज प्राप्तीसाठी कॅनरा बँक व पंजाब नॅशनल बँक यांच्याद्वारे वित्तीय कर्जाचा लाभ घ्यावा व कौटुंबिक विकास साधावा असे प्रतिपादन राष्ट्रीय पीछडा वर्ग वित्त व विकास निगम (एनबीसीएफडीसी) नवी दिल्ली चे वरिष्ठ व्यवस्थापक व्ही.चारी यांनी केले.
दीनदयाल शोध संस्थान, कृषि विज्ञान केंद्र, डिघोळआंबा यांच्या माध्यमातून एन.बी.सी.एफ.डी.सी.यांच्या सौजन्याने बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अकरा गावांमध्ये उभारलेल्या एकूण १८ नारळ काथ्या - सिमेंट निर्मित जमिनीखालील पाणी साठवण हौदाचे पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी जलवर्धिनी प्रतिष्ठान मुंबईचे अभियंते उल्हास परांजपे, नाना पालकर समितीचे प्रमुख डॉ.अमर बहादुर ठाकूर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.वसंत देशमुख, कृषि अभियंता प्रमोद रेनापूरकर उपस्थित होते. या नारळ काथ्या - सिमेंट हौदातील पाण्याचा उपयोग करून अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळझाडे जोपासत पशुधनाच्या पाणी पिण्यासाठी व घरगुती वापर ही केल्याचे पाहून चारी यांनी समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे सांगून एकत्रित येऊन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचा व एकंदरीतच ग्राम विकास साधावा असे आवाहन ठाकूर यांनी केले. प्रत्येक शेतकऱ्याकडे पाणी साठवणुकीची व्यवस्था असावी या हेतूने कमी खर्चाच्या नारळ काथ्या सिमेंट निर्मित पाणी साठवन तंत्रज्ञानाचे हे संशोधन केले असून बीड जिल्ह्यातील विविध अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उभारणी केल्याचे परांजपे यांनी सांगितले. या पुढील काळात बदलत्या वातावरणाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसाठे निर्मितीसाठी फेरो सिमेंट तंत्रज्ञानावर ही भर देणार असल्याचे डॉ.देशमुख यांनी सांगितले.
===============================================
Comments
Post a Comment