वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी महापुरूषांचा समर्पित सेवाभाव अंगिकारावा : डॉ.राजेश इंगोले
जागतिक आरोग्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
जगभरातील महापुरूषांच्या विचारांवर मार्गक्रमण करीत वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या हृदयात समर्पित सेवाभाव रूजविला पाहीजे असे मत सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ तथा इंडीयन मेडीकल असोसिएशनचे राज्याचे सांस्कृतिक सचिव डॉ.राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते "दीप्ती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग"च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स, वॉर्ड बॉय या प्रत्येक व्यक्तीवर एक मोठी जबाबदारी असते. त्यामध्ये रूग्ण आणि नातेवाईक यास निदान करण्यापासून ते औषधोपचार, समुपदेशन, सांत्वन या जबाबदाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकास पार पाडावी लागते. म्हणून या क्षेत्रात काम करत असताना आईचे काळीज, बहिणीची माया, बापाचं कर्तृत्व आणि भावाचं प्रेम या भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे माणुसकीची, मानवतेची, प्रेमाची शिकवण देणाऱ्या महापुरूषांचे विचार या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आत्मसात करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीस निरोगी आरोग्य मिळावे, अंधश्रद्धा मुक्त, व्यसनमुक्त निरोगी समाज होण्याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे प्रयत्न आवश्यक आहेत. भारता सारख्या देशात फक्त दोन टक्के इतका जी डी पी आरोग्यव्यवस्थेवर खर्च करतात ही मोठी शोकांतिका आहे. ज्या देशात आठ ते दहा टक्के खर्च होणे आवश्यक आहे तिथे हा अत्यल्प खर्च म्हणजे सरकार आणि सरकारी यंत्रणा आरोग्यप्रति कसलेच सजग नाहीत आणि या देशातील जनतेची त्यांना कसलीच काळजी नसल्याचे दर्शविते असे सांगत अफगाणिस्तान सारखा देश आरोग्यावर सहा ते सात टक्के खर्च करतो हे सांगितले. कोरोनाच्या काळात आपली आरोग्य यंत्रणा कशी ढेपाळली हे ताजे उदाहरण समोर असताना ही याही अर्थसंकल्पात आरोग्य व्यवस्थेवर कसलीच वाढ केल्याचे दिसत नाही. मग, सरकारी यंत्रणांचा देशातील नागरिकांच्या आरोग्याबाबतीत असलेले प्रेम हे पुतना मावशीचे प्रेम असल्याचे सांगितले. या कारणांमुळेच आपले अपयश झाकण्यासाठी "राईट टू हेल्थ" असले बिले आणत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रबोधनपर पुस्तके भेट देण्यात आली.
============================================
Comments
Post a Comment