अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध संगीततज्ज्ञ प्रकाश बोरगावकर यांचे पासष्ट वेळा रक्तदान..!
विक्रमाबद्दल आ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांचा सत्कार
---------------------------------
अंबाजोगाई / रणजित डांगे
(लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
संगीत क्षेत्रामध्ये अनेक शिष्योत्तम घडविणारे संगीत गुरू आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी मागील वीस वर्षांपासून रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाला सुरूवात केली आणि आज भारतीय जैन संघटनेच्या वतीने महावीर जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात पासष्टावे वेळेस रक्तदान करून नवीन विक्रम केला आहे. यानिमित्त आज जैन स्थानक अंबाजोगाई येथे त्यांचा केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, डॉ.सिध्देश्वर बिराजदार, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य धनराज सोळंकी, आयोजक निलेश मुथा, संकेत मोदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. बनारस घराण्याचे प्रख्यात तबला वादक म्हणून ख्याती असणाऱ्या तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीत सतत रुग्णांच्या सेवेत स्वतः ला वाहून घेतले होते. एवढेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकास्पद ठरलेला मोकाट जनावरासाठी राबविलेला एक घास तुमचा हा उपक्रम त्यांनी अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने राबवून मोकाट जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविला होता. मयत रुग्णांचे अंत्यसंस्कार असो अथवा लसीकरण असो प्रत्येक कार्यात बोरगावकरांनी पुढाकार घेऊन काम केले. अंबाजोगाई आणि परिसरामध्ये बांबू लागवड आणि वृक्ष लागवडी साठी पुढाकार घेऊन हजारो वृक्षाची लागवड आणि संगोपन ते करत आहेत. जपानी जैवशास्त्रज्ञ मियावाकी यांनी विकसित केल्या घनवन वृक्ष लागवडीसाठी त्यांनी अधिक मेहनत घेऊन हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. संगीत क्षेत्रामध्ये त्यांचे अनेक शिष्योत्तम अंबाजोगाईचे नांव सर्वदूर पोहोचवत आहेत. तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी रक्तदान या उपक्रमात आपला नवीन आदर्श निर्माण करून अनेकांना प्रेरित करण्याचे काम केले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
================================================
Comments
Post a Comment