आता आमचे काय होणार..? एमपीएड, बीपीएड प्रशिक्षितांसमोर प्रश्न
पाच शाळांमागे एक क्रीडा शिक्षक ; देण्याच्या हालचाली सुरू
===========================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त व्यक्तींना क्रीडा शिक्षक म्हणून नेमण्याच्या हालचाली शासनस्तरावरून सुरू झाल्या असून, पाच शाळांमधून एक क्रीडा शिक्षक असे पद निर्गमित करण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील एमपीएड व बीपीएड प्रशिक्षित पदवीधरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारांच्या संख्येत आणखीन मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच एका अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील दर पाच शाळांमधे रिक्त असणाऱ्या रिक्त असणाऱ्या क्रीडा शिक्षकाच्या जागेवर क्रीडा शिक्षक भरण्याच्या ऐवजी सैनिकी प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तींना सामावून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर व पदव्युत्तर पदवी घेतलेल्या तरूणांचे स्वप्न मात्र धुळीस मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात अंदाजे दोन ते तीन लाख बीपीएड व एमपीएड प्रशिक्षित पदवीधर उपलब्ध आहेत. या पदवीधरां ऐवजी सेवानिवृत्त झालेल्यांना शाळांवर क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती दिल्यास महाराष्ट्राच्या बेरोजगारीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द करून प्रशिक्षित पदवीधरांचा ही क्रीडा शिक्षक म्हणून प्राधान्याने विचार करावा. दरम्यान उत्तम खेळाडू तयार करण्यासाठी शालेय पातळीपासून महाविद्यालयीन जीवनापर्यंत क्रीडा शिक्षक व प्राध्यापक महत्त्वाची भूमिका बजावत असतात. क्रीडा शिक्षक नुसतीच शिस्तीची भूमिका घेत नसून विद्यार्थ्यांचा खेळाचा कल बघून शास्त्रोक्त पद्धतीने त्याला प्रशिक्षण देत असतात. खेळाचे मानसशास्त्र ओळखून त्या पद्धतीने खेळाडू निर्माण करण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे नुसतेच एका विशिष्ट पद्धतीचे प्रशिक्षण देऊन उत्तम खेळाडू बनणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय रद्द करून महाराष्ट्रातील बीपीएड व एमपीएड प्रशिक्षित पदवीधरांचा विचार करावा अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होत आहे.
•••••
=======================================
Comments
Post a Comment