पुसच्या श्रीक्षेत्र पद्मावती देवीच्या यात्रा महोत्सवास गुरूवार पासून प्रारंभ



देवीचा दोन दिवसीय यात्रा महोत्सव दि. 6 व 7 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार

===========================================

अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

भक्तांची इच्छापुर्ती करणारे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पद्मावती देवीची ख्याती संपुर्ण मराठवाड्यात सर्वदूर आहे. या देवीचा दोन दिवसीय यात्रा महोत्सव दि. 6 व 7 एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवाची ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. 



हेमाडपंती असलेले आणि नव्यानेच जिर्णोद्धार झालेले श्रीक्षेत्र पद्मावती देवी साडेतीन पिठांपैकी एक उपपीठ मानले जाते. हे मंदिर अहमदपुर रस्त्यावर अंबाजोगाई शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर परिसरात चैत्र पोर्णिमेच्या मुहुर्तावर दोन दिवस यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गुरूवारी सुरू होणार्‍या यात्रा महोत्सवात देवीची महापुजा, महाअभिषेख पालखी मिरवणूक तर शुक्रवारी महापुजा, महाअभिषेख, आराधी गीतांनी परिसर दुमदुमून जातो. सायंकाळच्या सुमारास कुस्ती स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत जिल्ह्यासह मराठवाड्यातील मल्ल सहभागी होतात. दाट झाडी उंच डोंगराशी पायथ्याची असलेल्या दंडकारण्यात पद्मावती देवीने तपश्‍चार्यासाठी हे ठिकाण निवडले होते. याच परिसरात महर्षी पुत्र शुकाचार्यांनी तपस्या केल्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. शुकाचार्यांचे मंदिर देशात दुर्मिळ ठिकाणी आढळत असले तरी महाराष्ट्रात हेच एकमेव ठिकाण आहे. या बरोबरच तालुक्यात मांडवा ऋषी (पठाण मांडवा) याज्ञवाल्क्य ऋषी (देवळा) भारद्वाज ऋषी (भारज), गार्ग्य ऋषी (गिरवली), वाल्मिक ऋषी (वाला) आदी ठिकाणी ऋषींनी तपश्‍चार्या केल्यामुळे वरील ठिकाण भाविकांसाठी महत्वपुर्ण असल्याचे मानले जाते. देवीच्या पुर्वेस कृष्णा पर्वतावर प्रत्यक्ष दत्त मुनींनी पदस्पर्श केल्यामुळे ही पुसची भूमी पावन झालेला परिसर मानल्या जातो. पद्मावतीच्या वास्तव्याने पुणित झाला आहे. अंबाजोगाई येथील माता योगेश्‍वरी आणि परळी येथील प्रभु वैद्यनाथ प्रमाणेच पुसचे स्थान पावन झालेले असल्याची अख्यायिका सांगण्यात येते. श्रीक्षेत्र पद्मावती देवी मंदिरात तुळजाभवानीची मुर्ती असून उत्तरेस यज्ञकुंड, पश्‍चिमेस जलकुंड असून पुर्वेस आणि पश्‍चिमेस दोन तलाव तुडूंब भरलेले असल्यामुळे रखरखत्या उन्हात ही या परिसरात आलेला भाविक प्रसन्न होतो. दोन दिवसीय यात्रा महोत्सवात सर्व धर्माचे लोक सहभागी होत असल्यामुळे सर्वधर्म समभावाची प्रचिती या पुसनगरी मध्ये दिसून येते. या दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.


=========================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड