भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले - बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख



बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचेकडून माकेगाव, नांदडी व पाटोदा येथे महामानवाला अभिवादन

===============================================

अंबाजोगाई / संपादक रणजित डांगे (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क) 

तालुक्यातील माकेगाव, नांदडी व पाटोदा येथे बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचेकडून महामानवाला अभिवादन करण्यात आले. ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व अनुयायी यांचे अभिनंदन करून महामानवाच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांचेकडून अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव, नांदडी व पाटोदा येथे महामानवाला अभिवादन करून त्यांनी विविध कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. नांदडी ग्रामस्थांकडून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी गावचे मुळ रहिवासी असलेल्या व सध्या अंबाजोगाई येथे स्थायिक झालेल्या विकास वाघमारे व आशाताई वाघमारे या शिक्षक दाम्पत्याचे सुपुत्र वैभव वाघमारे या तरूणाने केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेत ७७१ वी रँक प्राप्त करीत प्रेरक यश संपादित केले त्याबद्दल त्यांचा ह्रद्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आबासाहेब देशमुख, हरिश्चंद्र वाघमारे, प्रकाश वाघमारे, बालासाहेब देशमुख, ग्रामसेवक झिरमाळे, आबा वाघमारे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले की, आपल्या जिल्ह्याचे भुमिपूत्र वैभव विकास वाघमारे यांनी मिळविलेल्या यशाचा आपल्या सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. कारण, महामानव यांना अपेक्षित समतेचे राज्य व समाज व्यवस्था आज भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून निर्माण होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर वैभव वाघमारे हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उभे आहेत. अंबाजोगाई तालुक्यामधील नांदडी या छोट्या गावाचे सुपुत्र वैभव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत जे यश संपादन केले ते निश्चितच प्रेरणादायी आहे. वैभवच्या आई आशाताई आणि वडील विकास वाघमारे हे दोघेही शिक्षक आहेत याचा मोठा आनंद वाटतो. वैभव यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग, दिल्ली यांच्या वतीने सप्टेंबर - २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत देशातून ७७१ वी रँक प्राप्त केली आहे. वैभव यांचे आजोबा ईश्वर वाघमारे व आजी भीमाबाई वाघमारे हे दोघेही शेतमजूर होते. पण, स्वतः अशिक्षित असून ही त्यांनी वैभव यांचे वडील विकास वाघमारे यांना शिक्षक केले. विकास वाघमारे हे सध्या लातूर येथील शंभूलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. तर आशाताई वाघमारे (गवळी) या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. बारावीला असताना वैभव यांनी ८७ टक्के गुण घेऊन मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढे पुणे येथे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. २०१८ साली लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली. आणि त्यानंतर सप्टेंबर - २०१९ मध्ये केवळ दुसऱ्याच प्रयत्नात त्यांनी हे कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे. वैभव वाघमारे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे आज ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला याचा मनापासून आनंद वाटतो. असे सत्कार सोहळे सातत्याने आयोजित करणे म्हणजेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना खरे अभिवादन ठरेल. असे विचार जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी नांदडी येथे मांडले. तर पाटोदा येथे बोलताना जिल्हाध्यक्ष देशमुख म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक महान नेते आणि युगपुरूष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाज तसेच विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. हा जन्मोत्सव सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सणच आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांचे, महामानवांनी स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवली. विवेकवादी होणे, बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे असे सांगितले, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाचा पुरस्कार केला, अन्याय सहन करू नये, शिक्षणाचे महत्त्व विशद केले, धर्म हा माणसासाठी आहे हे सांगितले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांसाठी व्यवस्थेशी लढा दिला. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले हे प्रेरणादायी विचार आत्मसात केले तर तरूण पिढीकडून देशाच्या विकासात योगदान लाभेल असा विश्वास काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केला. पाटोदा येथे सामाजिक कार्यकर्ते अविनाश उगले, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख, काकासाहेब जामदार, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी तसेच पत्रकार रत्नदीप सरवदे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


===========================================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड