मान्यवरांच्या हस्ते व सकल जैन समाजाचे उपस्थितीत 'सम्यक सन्मान' प्रदान
सकल जैन समाजाचे अभिनंदनिय कार्य - धर्मादाय उपआयुक्त महावीर जोगी
भगवान महावीर यांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी - आ.सौ.नमिताताई मुंदडा
अंबाजोगाईत भगवान महावीर जयंती विविध उपक्रमांनी साजरी
==============================================
अंबाजोगाई / रणजित डांगे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
शहरात संपूर्ण जगाला अहिंसा, प्रेम, सत्य, समर्पण तसेच 'जगा आणि जगू द्या' हा महान संदेश देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीर, शोभायात्रा, जन्म कल्याणक, सांस्कृतिक कार्यक्रम या विविध उपक्रमांसह 'सम्यक सन्मान' पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
मंगळवार, दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शहरातील जैन गल्ली येथील जैन मंदिर, विमलनाथ सभागृहात 'सम्यक सन्मान' वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड विभागाचे धर्मादाय उपआयुक्त महावीर जोगी हे होते. तर या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा आणि प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर - पवार यांची उपस्थिती होती. यावर्षी पासून प्रथमच भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित गौरव 'सम्यक सन्मान' हा पुरस्कार देऊन करण्यात आला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांत सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल बीड येथील 'इण्फंट इंडिया' या संस्थेचे प्रमुख दत्ता मामा बारगजे यांच्यासह संध्याताई बारगजे, कृषि क्षेत्रातील प्रयोगशील कार्यासाठी डिघोळअंबा येथील प्रगतिशील शेतकरी विद्याताई रूद्राक्ष यांच्यासह त्यांचे पती श्री.रूद्राक्ष आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील कार्यासाठी वेरूळ येथील गुरूकूलचे मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर या सर्व मान्यवरांचा समावेश होता. आमदार सौ.नमिताताई मुंदडा, धर्मादाय उपआयुक्त महावीर जोगी आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार या मान्यवरांच्या हस्ते 'सम्यक सन्मान' देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ असे होते. यावेळी बोलताना आ.नमिताताई मुंदडा म्हणाल्या की, भगवान महावीर जयंतीनिमित्त "सम्यक सन्मान पुरस्कार" प्रदान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सुराणा परिवाराचे विशेष कौतुक करते. सकल जैन समाजाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यापुढील काळात ही शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. लवकरच इण्फंट इंडिया संस्थेला भेट देवून आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. भगवान महावीर यांचे विचार संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहेत. या विचारांचे अनुकरण समाजाने करावे असे आवाहन आ.सौ.मुंदडा यांनी केले. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार यांनी भगवान महावीर यांनी जगाला अहिंसा, सत्य, प्रेम व त्यागाची शिकवण दिली असल्याचे सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भगवान महावीर यांचे विचारांतून अहिंसेचा संदेश स्विकारला. समाजाने भ.महावीर यांचा अहिंसेचा मार्ग अवलंबला तर पोलिसांची गरजच पडणार नाही, समाजाने जैन समाजाकडून बोध घ्यावा, विद्यार्थ्यांमध्ये भ.महावीर यांचे अहिंसा, सत्य, प्रेम व त्याग या विचारांची शिकवण रूजवावी अशी अपेक्षा अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दत्ता मामा बारगजे, प्रगतिशील शेतकरी विद्याताई रूद्राक्ष, उपक्रमशील मुख्याध्यापक गुलाबचंद बोराळकर यांनी सत्काराला समर्पक शब्दांत उत्तर देत आपले अनुभव कथन केले. अध्यक्षीय समारोप करताना बीड विभागाचे धर्मादाय उपआयुक्त महावीर जोगी म्हणाले की, मानवतेच्या दृष्टिकोनातून सुरू असलेले सकल जैन समाजाचे कार्य अभिनंदनिय आहे. "सम्यक सन्मान" प्राप्त मान्यवरांकडून सामाजिक व विधायक बांधिलकी जोपासण्याची प्रेरणा समाजाने घ्यावी. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अभिजीत जोंधळे यांनी केले. तर मान्यवरांचे स्वागत डॉ.नितीन धर्मराव, रत्नाकर कंगळे गुरूजी, जतनबाई सोळंकी, गौतमचंद सोळंकी, अनिता संजय सुराणा, शशिकला कर्नावट, वर्धमान ढोले यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, धनराज सोळंकी, संजय सुराणा, साहिल मुथा, आदेश कर्नावट, संतोष डागा, श्रेणिक कात्रेला, निलेश मुथा, प्रा.शैलेश कंगळे, अधिकार मर्लेचा आदींसह अंबाजोगाई शहरातील राजकीय, सामाजिक, शिक्षण, पत्रकारीता, विधी, व्यापार, वैद्यकीय, साहित्य आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सकल जैन समाजातील महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता ध्वजगीताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सकल जैन समाज, भगवान महावीर जयंती महोत्सव समिती, अंबाजोगाई यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. प्रारंभी अंबाजोगाई शहरातून आकर्षक शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा जैन मंदिर (जैन गल्ली) येथून निघून पुढे ती पाटील चौक, मंगळवार पेठ, बस स्टँड, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरूवार पेठ, जैन स्थानक, मंडी बाजार, पाटील चौक मार्गे निघून या शोभायात्रेचा समारोप जैन गल्लीतील जैन मंदिर, विमलनाथ सभागृहात झाला. या शोभायात्रेत भगवान महावीर यांची भव्य प्रतिमा असलेला व विविध फुलांची आकर्षक सजावट करून सजवलेला रथ, ढोलपथक, कलश घेतलेल्या महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
==============================================
Comments
Post a Comment