‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत कर्मचाऱ्यांनी काढली मोटासायकल रॅली
रॅलीत महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; आंदोलक कर्मचारी संपावर ठाम
=================================================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) भावासाठी…बहिणीसाठी…पत्नीसाठी…कुटुंबासाठी…‘ एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत आज दिनांक १८ मार्च रोजी कर्मचाऱ्यांनी मोटार सायकल रॅली काढून वेधले शासनाचे लक्ष. या रॅलीमधे महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. संपाच्या पाचव्या दिवशी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासह शासनाने जुन्या पेन्शनची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा प्रकारच्या घोषणा ही दिल्या.
अंबाजोगाई शहरातील हजारोंच्या संख्येने परिचारिका, वर्ग तीन, वर्ग चार, शासकीय - निमशासकीय - शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला. राज्यातील दि. 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 ची 'जुनी पेन्शन' योजना पूर्ववत लागू करण्यात यावी, या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटना दिनांक 14 मार्चपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. पण, कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून चर्चेसाठी शासन पुढाकार घेत नसल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. या संपाकडे लक्ष्य वेधण्यासाठी दिनांक १८ मार्च रोजी कर्मचाऱ्यांनी शहरातून मोटासायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमधे महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शासनाने तत्काळ संपाचे व जुनी पेन्शनचे महत्व लक्षात घेऊन विनाविलंब लेखी पत्र देऊन चर्चा करुन मार्ग काढावा, अशी एकमुखी मागणी कर्मचारी संघटना व समन्वय समितीतील संघटनांनी शासनास केली. कर्मचारी संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून जुनी पेंशन लागू करावी, ती मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समितीच्या सदस्यांनी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी चर्चा करावी. नसता यापुढे कर्मचारी अतितीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशीही मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे. लोकशाही पध्दतीने संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न शासनाने करू नये, नसता येणाऱ्या काळामध्ये मंत्री, संत्री यांना सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही असे कर्मचारी संघटना व समितीच्या सदस्यांनी बोलताना सागितले.
================================================
Comments
Post a Comment