अखेर सासू व सुनेत घडून आला सुसंवाद..!
अंबाजोगाई ज्येष्ठ नागरिक संघाचा कौतुकास्पद पुढाकार
================================================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
तालुक्यातील चनई येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला सदस्या यांचे त्यांच्या सूनेशी मागील तीन वर्षांपासून साधे बोलणे ही नाही, तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. जेव्हा ही बाब ज्येष्ठ नागरिक संघाच्या कौटुंबिक हिंसाचार निपटारा समितीला समजली तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन सासू - सुनेत मनोमिलन व सुसंवाद घडवून आणला.
गुरूवार, दिनांक 16 मार्च रोजी झालेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघाच्या कौटुंबिक हिंसाचार निपटारा समितीचे पदसिद्ध सचिव लक्ष्मण गोरे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार, कार्याध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर, डॉ.दामोदर थोरात, सचिव मनोहरराव कदम, कोषाध्यक्ष धनराज मोरे, सहसचिव पद्माकर सेलमोकर, कमलताई बरूळे, इंदू पोटपल्लेवार, मंगलताई भुसा, दत्तात्रय आंबाड, भास्कर हरेगावकर, श्रीधर काळेगावकर, आशाताई वाघमारे, विजय विर्धे, ललिताताई पुजारी, सोळंके मॅडम, गावरस्कर, वनमाला वाघ, चंद्ररेखा मुळे, विश्वनाथ गिरगिरवार व कार्यकारी मंडळाच्या इतर सदस्यांनी पुढाकार घेत, एकत्रित येत पुढील विषयावर चर्चा केली की, ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्य असणाऱ्या एका महिला भगिनीचे तिच्या सुनेशी मागील तीन वर्षांपासून साधे बोलणे ही नाही, या प्रकरणी आपण सर्वांनी मिळून काही तरी केले पाहिजे. जेव्हा हे प्रकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या हिंसाचार निपटारा समितीकडे आले तेव्हा समितीने संबंधित सासू आणि सून यांना विनंती केली, आणि त्यांच्या बैठकीत बोलावून घेतले. यावेळी दोघींनी ही समितीकडे लिखित स्वरूपात आपले म्हणणे मांडले. समोरासमोरील चर्चेतून त्यांच्यातील गैरसमज दूर झाले व त्यांचे मनोमिलन होऊन अखेर त्यांच्यात तब्बल तीन वर्षांनंतर सुसंवाद घडून आला. यासाठी पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर आणि डॉ.दामोदर थोरात यांनी या दोघी सासू - सुनेचे समुपदेशन करून, नाते संबंधाचे महत्व अधोरेखित करीत हा प्रश्न खाजगीत मिटविला, तसेच यावेळी सदरील सासू - सुनेने माननीय कोर्टात सुरू असलेले त्यांचे हे प्रकरण देखील सामोपचाराने व आपसातील सामंजस्याने कायमस्वरूपी मिटविणार असल्याची ग्वाही दिली. दोघींनी ही ज्येष्ठ नागरिक संघाची विनंती मान्य करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार आणि कौटुंबिक हिंसाचार निपटारा समितीचे सचिव लक्ष्मण गोरे यांनी सासू आणि सुनेचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करून आभार मानले. यावेळी अतिशय भावुक वातावरणात सासू सुनेने एकमेकींना अलिंगन ही दिले. उपस्थित 50 ज्येष्ठ नागरिक महिला स्त्री - पुरूषांनी टाळ्यांच्या गजरात पेढे भरवून सदरील सासु - सुनेचे मनापासून कौतुक केले. या प्रसंगी कौटुंबिक हिंसाचार निपटारा समितीचे सचिव लक्ष्मण गोरे यांनी असे आवाहन केले की, ज्येष्ठांच्या कुटुंबात काही कलह, भांडण, मनमुटाव व तंटे असतील तर त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाकडे लिखित स्वरूपात अर्ज करावेत, वेळीच माहिती द्यावी, याबाबत कौटुंबिक हिंसाचार मिटविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ तात्काळ पुढाकार घेईल. तर डॉ.डी.एच.थोरात यांनी उपस्थितांना कायदेविषयक माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार यांच्या अध्यक्षीय समारोपाने बैठकीची सांगता झाली. बैठकीचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मनोहर कदम यांनी मानले. यावेळेस ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
================================================
Comments
Post a Comment