महाराष्ट्राच्या आश्वासक युवा गायिका - सुरमणी भाग्यश्री देशपांडे
" शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अध्यात्मिक अशा अंबाजोगाई शहरात आपल्या 'योगेश्वरी' या स्वतंत्र घराण्याचे वेगळेपण गायनातून सिद्ध केले, 'योगेश्वरी' घराण्याची निर्मिती करणाऱ्या लोकप्रिय गायिका सुरमणी भाग्यश्री देशपांडे (पाटील) यांचा आज जन्मदिन त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लोकप्रिय चॅनेल लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्कच्या वाचकांसाठी संगीत क्षेत्रातील जाणकार तथा पत्रकार राहुल देशपांडे यांचा लेख माहितीस्तव देत आहोत..."
_______________________________
आई सरोजिनीताई देशपांडे आणि वडील पांडुरंगराव देशपांडे हे दोघेही उत्तम गायक, वादक असल्याने लहानपणापासूनच घरातच भाग्यश्री यांच्यावर कळत - नकळत संगीताचे उत्तम संस्कार झाले. त्यांना बालवयातच संगीताची विलक्षण ओढ निर्माण झाली, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी कोणते ही रागदारीचे शिक्षण न घेता केवळ श्रवणाच्या माध्यमातून भाग्यश्री यांनी प्रारंभिक परीक्षेतील राग उत्तम सादर केला. अत्यंत लहान वयात लिहिता वाचता न येणाऱ्या अवस्थेत कसले ही मार्गदर्शन नसताना श्रवणाच्या माध्यमातून सादरीकरण ही एक विलक्षणच बाब.... येथील ख्यातनाम ज्येष्ठ तबलावादक स्व. शंकरराव पांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि साथ मिळाली. याच दरम्यान पुण्यातील सुप्रसिद्ध तबलावादक पांडुरंग मुखडे यांनी दिलेल्या संधीचे सोने करीत भाग्यश्री यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पुण्यात रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुढील काळात स्व.राम काका मुकद्दम (देशपांडे), डॉ.कमलाकर परळीकर, आप्पासाहेब जळगावकर, मालिनी राजुरकर, पं.जसराज, उस्ताद सैदुद्दीन डागर, डॉ.प्रभा अत्रे, संगीतकार नदीम श्रवण, पं.अभिषेकी, अशा किती तरी संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन आणि सहवास भाग्यश्री यांना लाभला. मराठवाड्यातील या गायिकेने चिकाटी, परीश्रम आणि स्वबळावर महाराष्ट्रातच नव्हे तर अ.भा.संगीत संमेलन तसेच परदेशात ही आपल्या 'योगेश्वरी ' घराण्याचे वेगळेपण गायनातून सिद्ध केलेच. त्यासोबतच किराणा व ग्वाल्हेर घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण गायिका म्हणून सर्वत्र ख्याती प्राप्त केली तिच्या गायनात अनेक उपशास्त्रीय गीतांचे बहारदार सुरेख सादरीकरण पहावयास मिळते अत्यंत कमी वयात संगीत मैफलीचे शतक पूर्ण करणारी पहिली गायिका होण्याचा मान भाग्यश्री यांनी मिळविला हे अंबाजोगाईच भाग्यच म्हणाव लागेल, अनेक संस्मरणीय मैफली सोबतच दूरदर्शन, विविध वृत्तवाहिन्या, आकाशवाणी केंद्र इथे त्यांच्या अनेक कार्यक्रमाचे प्रसारण झालेले आहे. फाउंटन म्युझिक कंपनीच्या माध्यमातून भाग्यश्री यांच्या दोन ध्वनीफितींची निर्मिती झाली असून राज्य शासनाच्या नृत्य संगीत कलावंत मानधनाच्या समितीवर ही त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले असून राज्य शासनासह विविध ठिकाणचे अनेक मान, सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. भाग्यश्री यांची सांगितिक क्षेत्रातील प्रगती अधिक उंच होवो. हीच महाराष्ट्राचे शक्तीपीठ असलेल्या योगेश्वरी देवी, प्रकांड पंडीत सर्वज्ञ दासोपंत, आद्यकवी मुकुंदराज यांच्या चरणी प्रार्थना... जन्म दिनाच्या शुभेच्छा..!
शब्दांकन : राहुल दि.देशपांडे,
पत्रकार (अंबाजोगाई, जि.बीड.)
=======================
Comments
Post a Comment