स्वाराती रूग्णालयात स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियानास सुरूवात





स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियानाचे उद्घाटन करून माहिती घेताना युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, माहिती देताना डॉ.नितीन चाटे, शेजारी अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, डॉ.चिन्मय इंगळे, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, प्रशांत आदनाक, अमोल पवार इत्यादी दिसत आहेत.






स्तन कर्करोग जनजागृती व उपचार मोहिमेचा लाभ सर्वस्तरांतील गरजू महिलांपर्यंत पोहचवा - युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा यांचे आवाहन

=========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये औषधी विभागातर्फे राज्यभरात स्तन कर्करोग जनजागृती व उपचार अभियान राबविले जात असून या अभियानाचे स्वाराती रूग्णालय, अंबाजोगाई येथे युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, डॉ.शुभदाताई लोहीया यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा म्हणाले की, स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग हा शरीराच्या इतर भागात झपाट्याने पसरतो, म्हणून याचे निदान व उपचार लवकरात लवकर करणे गरजेचे आहे असे नमुद करून स्तन कर्करोग जनजागृती व उपचार मोहिमेचा लाभ सर्वस्तरांतील गरजू महिलांपर्यंत पोहचवा अशी अपेक्षा व्यक्त करून आयोजकांचे अभिनंदन करून मुंदडा यांनी अभियानाचे स्वागत केले. या योजनेचे नोडल अधिकारी डॉ.नितीन चाटे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, सदरील अभियानामागील शासनाच्या निर्देशानूसार भुमिका स्पष्ट केली. 8 मार्च पासुन दर बुधवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्वाराती रूग्णालय येथील ओपीडी क्र.२ मध्ये या अभियानासाठी विशेष बाह्यरूग्ण कक्ष सुरू केला गेला असून तेथे स्तन कर्करोग, स्वयं स्तन तपासणी व संबंधित माहिती, समुपदेशन व उपचार मोफत केले जातील अशी माहीती दिली. भारतात महिलांमध्ये निदान झालेल्या एकूण ६,७८,३८३ कर्करोगाच्या रूग्णांपैकी १,७८,३६१ (२६.३%) रूग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते. तसेच २०२०, मध्ये भारतात महिलांमध्ये कर्करोगाच्या ४, १३, ३८१ मृतांपैकी ९०, ४०८ (२१.९%) मृत्यु हे स्तनाच्या कर्करोगामुळे झाले होते. स्तनाच्या कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रूग्णास कमी हानी होते व जीवनमान सुधारते असे दिसून येते. त्या करीता खालील प्रमाणे काही त्रास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य ती तपासणी करून घेणे आवश्यक आहे.


स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे :

 स्तनाच्या कोणत्याही भागात गाठ तयार होणे, अथवा वेदना होणे, स्तनावर सुज येणे, जळजळणे अथवा डाग पडणे, स्तनग्रातून रक्त येणे, लालसर होणे, वेदना होणे आत खेचले जाणे, स्तनांच्या आकारात बदल दिसणे. या सर्व लक्षणांवर, लक्ष देण्याकरिता सर्व महिलांनी स्व:ताची स्तन तपासणी करणे गरजेचे आहे व योग्य वेळी डॉक्टरांकडून स्तन तपासणी व गरज पडल्यास मॅमोग्राफी केल्यास स्तनाचा कर्करोग लवकरात लवकर निदान होण्यास मदत होते. या प्रसंगी बोलताना अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी सांगितले की, शासनामार्फत सन्माननिय मंत्री महोदय गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या स्थुलता निवारण, स्तनाचा कर्करोग या मोहीमांसह आगामी काळात हाडाचा ठिसुळपणा, थायरॉईड आजार आदींबाबत देखील जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचे नमुद करून स्वाराती रूग्णालय या अभियानांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी पुर्ण योगदान देणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ.शुभदाताई लोहिया, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.देव मॅडम, अधिपरिचारीका भताने ताई, पत्रकार अविनाश मुडेगावकर, भागवत मसने, पत्रकार रवि मठपती, डॉ.अमित लोमटे, डॉ.नागेश अब्दागीरे, डॉ.शुभदाताई पवार, अधिपरीसेविका रेखाताई बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.चिन्मय इंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.सतिश गिरेबोईनवाड यांनी मानले.


=====================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड