मी तर काहीही चुकीचं केलं नाही...ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर हसन मुश्रीफांची
==================================================
मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांना सलग दुसऱ्या दिवशी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. ३५ कोटी रूपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांची आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. विशेष म्हणजे अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दोन आठवड्यांसाठी अटकेपासून संरक्षण दिलं आहे. गेल्या आठवड्यात ईडीने हसन मुश्रीफ यांना नोटीस बजावली होती.
सोमवारी चौकशीसाठी हजर राहा, अशी नोटीस ईडीने पाठवली होती. परंतु, हसन मुश्रीफ ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर मुश्रीफ ईडी कार्यालयात पोहोचले, बुधवारी दुपारी साडेबारा वाजता ते ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीने त्यांची आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. मुश्रीफ यांनी चौकशीला सामोरे जात सहकार्य केलं. ईडीने पुन्हा सोमवारी साडेबारा वाजता चौकशीसाठी बोलावलं आहे. आठ तासाच्या चौकशीनंतर ही तुमच्या चेहऱ्यावर थकवा का नाही ? तुम्ही आनंदी दिसत आहात, असं विचारलं असता मुश्रीफ हसत म्हणाले, मी काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळे चौकशी अतिशय चांगली झाली. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आम्ही त्यांना सहकार्य केलं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर चौकशी झाली. अनेक प्रश्न होते, त्यावर आता मी बोलणं योग्य होणार नाही. आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा सोमवारी पुन्हा चौकशासाठी बोलावले आहे, आम्ही पुन्हा समाधनकारक उत्तरे देऊत…” असे माजी मंत्री मुश्रीफ म्हणाले.
======================
Comments
Post a Comment