शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी - आमदार भाई जगताप
बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या कार्यालयास आमदार भाई जगताप यांची सदिच्छा भेट
================================================
अंबाजोगाई ( संपादक रणजित डांगे - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क )
केवळ टोलवा - टोलवी न करता न दिलासा देणे आवश्यक आहे. देशात जिथे - जिथे काॅंग्रेस पक्षाचे सरकार आहे तिथे - तिथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद म्हणून जुनी पेन्शन योजना शिंदे - फडणवीस सरकारने लागू करावी अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली. ते अंबाजोगाईत बोलत होते. बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या "काॅंग्रेस भवन" या कार्यालयास आमदार भाई जगताप यांनी शनिवार, दिनांक 18 मार्च रोजी सदिच्छा भेट दिली.
एका कार्यक्रमानिमित्त अंबाजोगाई तालुक्यात आल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या "काॅंग्रेस भवन" या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी ज्येष्ठ कामगार नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, सुनिल भाऊ शिंदे यांच्यासह मान्यवरांचा फेटा बांधून, पुष्पहार घालून, शाल व श्रीफळ देऊन हृद्य सत्कार केला. प्रारंभी आ.जगताप यांनी बीड जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे काॅंग्रेस पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आ.भाई जगताप म्हणाले की, शिंदे - फसणवीस सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या कोपराला गुळ लावण्यासारखा प्रकार आहे. "आमदनी चवन्नी और खर्चा रूपय्या" असा हा प्रकार आहे, फसणवीसांनी जनतेची दिशाभूल केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे, माथाडी कायदा लागू करून देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने कायमच केले आहे. परंतु, असे असताना ही आज महाराष्ट्रावर तब्बल साडे सहा लाख कोटी रूपयांचे प्रचंड कर्ज आहे, त्यामुळे एकीकडे नवीन विकास योजना राबविण्यासाठी पैसे येणार कोठून हे सरकार सांगत नाही, तर दुसरीकडे मात्र भरमसाठ आश्वासने व फसव्या घोषणा करून फसणवीस महाराष्ट्राची फसवणूक करीत आहेत. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुष करण्यासाठी गुजरातला उद्योग पळवून महाराष्ट्राला भूकेकंगाल करण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. अर्थसंकल्प चांगला असेल तर मग शेतकरी, कष्टकरी यांचा प्रचंड मोर्चा मुंबईवर का धडकला.?, पेन्शनसाठी कर्मचारी आंदोलन का करीत आहेत.? असे सवाल करून आमदार, खासदार यांच्या पेन्शन विषयी बोलताना ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींबाबत वेगळा विचार करावा लागेल असे आ.जगताप म्हणाले. भाजप सत्तेच्या काळात विचार व लेखन स्वातंत्र्य अबाधित राहीलेले नाही, विविध हातखंडे वापरून भाजपा सरकार राज्यघटनेची पायमल्ली करीत आहे. आपण एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांचा हा देश आहे. हा देश एकसंघ राहीला पाहिजे, विकासाच्या प्रक्रियेत पुढे गेला पाहिजे, शेतकरी, कष्टकरी, कामगार व श्रमजीवी जनतेच्या समस्या सुटल्या पाहिजे, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, महिला - मुली सुरक्षित असल्या पाहिजेत, सर्वधर्मीय समाज बांधव आनंदाने, सुख व समाधानाने भारतात एकत्र राहीले पाहिजेत हीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची भूमिका होती व आहे असे प्रतिपादन आमदार भाई जगताप यांनी केले. यावेळेस काॅंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, माजी तालुकाध्यक्ष एॅड.अनंतराव जगतकर, माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे, माजी शहराध्यक्ष तारेख अली उस्मानी, प्रवीण देशमुख, संजयराव काळे, विद्याधर पांडे, किसान काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, खंडेराव टेमकर, आचार्य गुरूजी, योगेश देशमुख आदींसह प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
======================================
Comments
Post a Comment