अखेर लिंगायत समाजाच्या लढ्याला यश ; राज्य सरकारकडून महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची घोषणा
अंबाजोगाईत बसव ब्रिगेडकडून निर्णयाचे स्वागत ; मानले सरकारचे आभार
=======================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
लिंगायत समाजातील बेरोजगार तरूणांना स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, अशी आग्रही मागणी लिंगायत समाजाच्या वतीने मागील काही वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती, या मागणीसह विविध प्रश्नांवर वेळोवेळी निवेदने दिली, विविध आंदोलने ही करण्यात आली. बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद सिद्रामप्पा पोखरकर यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन त्यांना दिले होते. तसेच सदर मागण्यांसाठी बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाज बांधवांना एकत्रित करून मुंबईत मोठे आंदोलन ही केले होते. या मागणीला आता यश आले असून लिंगायत समाजातील तरूण, सुशिक्षित बेरोजगार व नवोद्योजकांना स्वयंउद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री ना.देवेंद्र फडणवीसांनी केली आहे, त्यानुसार नव्या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रूपये निधी मिळणार आहे. हा निधी कल्याणकारी योजनांसाठी खर्च होणार आहे. या निर्णयाचे संपूर्ण लिंगायत समाजाकडून स्वागत केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लिंगायत समाज बांधवांना आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्जपुरवठा व्हावा व अनुदान मिळावे, यासाठी विनोद पोखरकर हे प्रयत्नशील होते, या करिता "जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ" स्थापन करण्यात यावे ही प्रमुख मागणी मराठवाड्यात सर्वप्रथम पोखरकर यांनीच मागील सात ते आठ वर्षांपूर्वीच केली होती. सध्या सुरू असलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अखेर या मागणीचा विचार होऊन अर्थसंकल्पा मध्ये तशी घोषणा व तरतूद व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन समस्त लिंगायत समाजाकडून नुकतेच मुंबईत भव्य मोर्चा काढून देण्यात आले होते. तसेच याप्रश्नी बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटले होते. सध्या राज्यात विविध समाजातील बेरोजगार युवक - युवतींच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी विविध आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत. मराठा समाज बांधवांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय बांधवांसाठी ओबीसी आर्थिक विकास महामंडळ, मातंग समाज बांधवांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, मागासवर्गीय समाज बांधवांसाठी महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ, भटक्या व विमुक्त जाती जमाती बांधवांसाठी वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ, मुस्लिम समाज बांधवांसाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहेत. या आर्थिक विकास महामंडळांच्या धर्तीवर लिंगायत समाजातील सुशिक्षित, बेरोजगार तरूणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय निर्मितीसाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी मराठवाड्यातून सर्वप्रथम बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद सिद्रामप्पा पोखरकर यांनी केली होती. या मागणीला आता यश मिळाले आहे. त्याबद्दल महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आश्वासक उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सर्व लिंगायत समाजाकडून आभार मानण्यात येत आहे. तर मराठवाड्यात सर्वप्रथम ही मागणी करणारे विनोद पोखरकर यांचा लिंगायत समाज बांधवांनी पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून हृद्य सत्कार केला. तसेच अंबाजोगाई शहरात गुरूवारी बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष पोखरकर यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून आणि पेढे वाटून लिंगायत समाजाकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत ही करण्यात आले.
हे तर लिंगायत समाज समन्वय समितीच्या महामोर्चाचे यश..!
======================
अखेर लिंगायत समाजाच्या 5 प्रमुख मागण्यांपैकी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने महाराष्ट्रात आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे ही एक महत्त्वाची मागणी पूर्ण झाली आहे, अनेक वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे. बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने काही दिवसांपूर्वी मुंबईत काढण्यात आलेल्या महामोर्चाचे हे यश आहे. त्याबद्दल विद्यमान सरकारचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांचे संपूर्ण लिंगायत समाज आभार मानतो आहे..!
- विनोद सिद्रामप्पा पोखरकर
(मराठवाडा अध्यक्ष, बसव ब्रिगेड)
======================
Comments
Post a Comment