पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे निधन
भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा
========================
मुंबई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
भारतीय मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्गज पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
चेन्नईतील नुंगम बक्कम येथील हॅडोस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचा मृतदेह जेव्हा आढळून आला तेव्हा त्यांच्या कपाळावर जखम झाली होती. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला असून मनोरंजन सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. वाणी जयराम यांनी संगीत विश्वामधील अनेक मोठ्या संगीतकारांसोबत सदाबहार गाणी गायली आहेत. त्यांनी तामिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि ओरिया भाषेतील अनेक गाणी गायली आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्यांनी तीनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. तसेच त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा या राज्यातून राज्य पुरस्कार देखील मिळाले आहेत. वाणी जयराम यांनी नुकतीच एक व्यावसायिक गायिका म्हणून संगीत क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण केली होती. त्यांनी आतापर्यंत 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांनी दिग्गज संगीतकारांसह एमएस इलैयाराजा, आर.डी.बर्मन, केव्ही महादेवन, ओ.पी.नय्यर आणि मदन मोहन यांच्या सोबत देखील काम केले आहे. त्यांच्या या संगीत क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांना भारतातील तिसरा - सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण नुकताच जाहीर झाला होता. त्यांच्या या अशा अचानक जाण्याने मनोरंजन सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
========================
Comments
Post a Comment