खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे, आ.नमिताताई मुंदडांच्या प्रयत्नांना यश ; स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारकडून ६० कोटींचा निधी मंजूर
विद्यार्थी बैठक क्षमतेचा प्रश्न मार्गी लागणार
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क) ग्रामीण रुग्णांची जीवनवाहिनी असलेल्या प्रख्यात स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकास कामांसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने तब्बल ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांसाठी तासिका, परिक्षा कक्ष आणि रूग्णालयासाठी यंत्रसामुग्रीची तरतूद करण्यात येणार आहे. बीडच्या खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे आणि केज विधानसभ मतदारसंघाच्या आ.नमिताताई मुंदडा यांनी ‘स्वाराती’च्या विकासासाठी निधी मिळविण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
स्वाराती रूग्णालयवर बीडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणाऱ्या रूग्णांचा ओढा आहे. अत्यल्प दरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उच्च दर्जाचे उपचार मिळत असल्याने हे रुग्णालय गोरगरीब रूग्णांची जीवनवाहिनी आहे. दरम्यान, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयासाठी मागील काही काळात एमबीबीएस जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. विद्यार्थी संख्या वाढल्याने सद्य स्थितीतील तासिका कक्ष आणि परिक्षा कक्ष अपुरे पडत होते. त्यामुळे आ.नमिताताई मुंदडा यांनी खा.डाॅ.प्रीतमताई मुंडे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे तासिका आणि परिक्षा कक्षांच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून केंद्र सरकारने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालात ३०० विद्यार्थी क्षमतेचा एक, २५० विद्यार्थी क्षमतेचे दोन लेक्चर हॉलसाठी आणि २५० विद्यार्थी क्षमतेच्या दोन परिक्षा कक्षांसाठी ३९.४३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सोबतच, रूग्णालयातील यंत्रसामुग्रीसाठी २०.५६ कोटी रूपये असा एकूण ५९.९९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या काम्माना मंजुरी मिळाल्याने विद्यार्थी बैठक क्षमतेचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच, महाविद्यालयाला अत्याधुनिक यंत्रसामुग्री प्राप्त होणार असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांसाठी सोयीचे ठरणार आहे.
=======================
Comments
Post a Comment