शास्त्र, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम म्हणजे स्वामी विवेकानंद - समाजसेवक प्रसाददादा चिक्षे
कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई येथे 'राष्ट्रीय युवक दिन' मोठ्या उत्साहात साजरा
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
मुठभर धैर्यशील व्यक्ती अवघ्या जगाला हलवून सोडतील यावर स्वामी विवेकानंद यांचा अटळ विश्वास होता. स्वामी विवेकानंद हे त्यागाचे प्रतिक असून ते ज्वलंत धगधगता ज्ञानयज्ञ होते. ते युवकांचे प्रेरणास्त्रोत असून सळसळत्या चैतन्याचा जिवंत झरा होते असे प्रतिपादन ज्ञान प्रबोधिनीचे प्रसाददादा चिक्षे यांनी केले. ते कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई अंतर्गत जिमखानाच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय युवक दिनाच्या' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.संजीव बंटेवाड हे होते. तर व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष डॉ.रवींद्र चव्हाण व डॉ.संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या चिंतनपर मनोगतात समाजसेवक प्रसाददादा चिक्षे पुढे बोलताना असे म्हणाले की, स्वामी विवेकानंद म्हणजे शास्त्र, तत्त्वज्ञान व अध्यात्म यांचा संगम होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ.संजीव बंटेवाड म्हणाले की, पाणीदार डोळ्यांचे, बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद हे होय, देशातील तरूणांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. ते युवकांना, तुम्ही विनम्र बना, शक्तिशाली आणि सामर्थ्यवान बना आणि जीवनात संघर्ष करायला शिका..! असे आवाहन करीत. डॉ.बंटेवाड आपल्या भाषणात पुढे असे ही म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार व जीवनकार्य यांचा अभ्यास करून त्यांचे गुण अंगिकारावेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना उपाध्यक्ष डॉ.रवींद्र चव्हाण यांनी केले, तर बहारदार सूत्रसंचालन राजेश रेवले यांनी केले, आणि उपस्थितांचे आभार डॉ.संजय राठोड यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारीवृंद उपस्थित होता.
========================
Comments
Post a Comment