जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ व अफार्मच्या वतीने दस्तगिरवाडी येथे शाश्वत शेती शेतकरी मेळावा
"शाश्वत शेती व शेतकरी" या विषयावर शेतकरी मेळाव्यात मौलिक मार्गदर्शन
=====================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
येथील जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाकडून तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे हवामान अनुकूल अल्पखर्चिक शाश्वत शेती तंञज्ञान याबद्दल दस्तगीरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य संप्रेशन घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली "शाश्वत शेती व शेतकरी" या विषयावर शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या शेतकरी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाचे सचिव शिवाजीराव खोगरे हे होते. 6 जानेवारी 2023 रोजी अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे सकाळी ठिक 8.30 वाजता आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना संस्थेचे सचिव शिवाजीराव खोगरे यांनी "वातावरणातील बदलांचा परिणाम आणि जबाबदार घटक" या विषयावर मार्गदर्शन केले, ते म्हणाले की, वातावरणातील बदलांचा शेतीतील पिकांवर परिणाम होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता केवळ खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळेच शेत जमिनीची प्रतवारी खालावत चालली आहे असेही त्यांनी सांगितले. 1965 से 1970 या काळातील अन्नधान्याची टंचाई होती व अन्नधान्य टंचाईवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंञी वसंतराव नाईक यांनी नविन रासायनिक नत्र, सुपर पालाश या खतांच्या मात्रा शेतात वापरून उत्पादनात वाढ केली. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्नधान्याच्या टंचाईवर त्यावेळेस मात करता आली. पण, आपण शेतकऱ्यांनी नञ, सुपर पालाश या रासायनिक खतांच्या मात्रा कृषी विद्यापीठाच्या अथवा कृषी विभागाच्या तंत्रज्ञानाचा, सूचनांचा वापर करून देण्याऐवजी आपल्या मनाला वाटेल त्याप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा आपल्या शेतात देत राहिलोत व त्यामुळे आजची रासायनिक शेती ही शेतकऱ्यांना न परवडणारी झाली आहे व त्यामुळेच शेतीची प्रतवारी देखिल खालावलेली आहे. या परिणाम असा की, शेती उत्पादनात प्रतिवर्षी घट होत चालली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे असे शिवाजीराव खोगरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, 1965 से 75 पर्यंत पेरणीच्या वेळी शेतकरी हे बाजारातून फक्त दोन ते तीन पैशांचा गंधक विकत आणून बीज प्रक्रिया करून शेतकरी पेरणी करीत होते. तेव्हा बाकी बाजारातून काहीही विकत आणण्याची गरज नव्हती. कारण, तेव्हा शेतकरी हे घरीच तयार केलेले बियाणे वापरावयाचे त्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांना संख्यात्मक उत्पादनाऐवजी गुणात्मक उत्पादन मिळत होते. आज परिस्थिती वेगळीच आहे शेतकऱ्यांना बाजारातून खते, बियाणे, औषधे विकत आणावी लागतात. मोठ्या प्रमाणात यांची किंमत मोजावी लागते. सध्या वातावरणातील बदलांमुळे कधी पिके चांगली येतात. तर कधी पीके ही चांगली येत नाहीत. यासह विविध कारणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे. शेतीवर खर्च जास्त व शेतातील उत्पादन कमी असे समीकरण शेतकऱ्यांच्या बाबतीत दरवर्षी घडून येत आहे. यामुळे सध्या शेतकरी सतत संकटात आहे असे मत शिवाजीराव खोगरे यांनी अल्पखर्चिक कोरडवाहू शेती संदर्भात बोलताना व्यक्त करून याला पर्याय म्हणून हिरवळीच्या खताची शेती, सेंद्रिय शेती, गांडूळ खताची शेती, नॅडॅप खताची शेती व बायडायनॉमिक खताची शेती, पिकांवर फवारण्यासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत अमृतपाणी, अन्नधान्यापासून तयार केलेली स्लरी, लिंबोळी अर्क आदी सेंद्रिय खत व सेंद्रिय अर्काची फवारणी करून शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादन गुणात्मक घेवून, रासायनिक खतांवर दुर्लक्ष करून सेंद्रिय शेतीकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अफार्म संस्थेने यासाठी दिलेली सेंद्रिय शेतीच्या लहान पुस्तिकेचे वाचन करून सेंद्रिय शेतीचे फलक कार्यक्रमस्थळी लावण्यात आले होते. या प्रसंगी गावातील प्रगतशील शेतकरी दाजीसाहेब लोमटे यांनी जैवविविधता याबद्दल अनेक घटक सांगून जैवविविधता शेतकऱ्यांसाठी कशी महत्वाची आहे या बद्दल त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना संप्रेशन घाडगे यांनी दस्तगिरवाडी येथे जयप्रभा ग्रामीण विकास संस्थेने सांगितलेल्या सेंद्रिय खताचा व औषधांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्यासाठी दस्तगीरवाडी गावातील शेतकऱ्यांना आवाहन केले, आम्ही सर्वजण मिळून यापुढे संस्थेने सांगितल्याप्रमाणे व संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारे विविध घटकांचा वापर करून सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प जाहीर केला. शेवटी उपस्थितांचे आभार मल्हारी घाडगे यांनी मानले. तर कार्यक्रमस्थळी अल्पोहाराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गावातील तरूण व अनुभवी शेतकरी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
======================
Comments
Post a Comment