मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
(प्रतिकात्मक चिञ)
बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती
========================
पुणे (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर कमी झाला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता तसेच किमान तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरूवारी सायंकाळनंतर अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र येथे राज्यातील नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यात औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, पुणे या जिल्ह्यात हलक्या ते जोरदार सरी कोसळल्यामुळे त्याचा रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भुसावळ तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहे. या बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा यासह केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी थंडी जाणवत असून या बदलत्या वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराई पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वातावरणामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक या बदलत्या वातावरणामुळे जाणार या भीतीने राज्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.
========================
Comments
Post a Comment