अंबाजोगाईच्या महसूल विभागाची बांधिलकी : वयोवृद्ध अंध दाम्पत्याला दिला मदतीचा हात
महसूल विभाग आणि नायब तहसिलदार गायकवाड यांचे सर्वस्तरांतून कौतुक
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
प्रशासनात काम करणा-या आधिका-यातील माणुस जीवंत असला तर काय होवू शकते याचा चांगला अनुभव लोखंडी सावरगाव येथील विठ्ठल येलगुना जाधव या 80 वर्षीय वयोवृद्ध पती - पत्नीस आला. अंबाजोगाई महसूल विभागाचे नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड यांनी बांधिलकी जोपासत वयोवृद्ध अंध दाम्पत्याला मदतीचा हात दिला. त्याबद्दल महसूल विभाग आणि नायब तहसिलदार गायकवाड यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.
आपल्या रोजच्या प्रशासकीय कामातून समाजसेवा कशी करावी याचे आणखीन एक उत्तम उदाहरण नुकतेच अंबाजोगाई येथील तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड यांनी दाखवून दिले, सोमवार रोजी लोखंडी सावरगाव येथील एक 80 वर्षीय वयोवृध्द अंध, असाह्य जाधव दाम्पत्य अंबाजोगाई तहसिल कार्यालयात आले. व त्यांनी भेटेल त्यांना विचारपूस करून नायब तहसिलदार गायकवाड यांची भेट घेतली. आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत सांगितले की, साहेब आमच्याकडे पोटाची खळगी भरायला कोणतेच साधन नाही, सरकारी पेन्शन किंवा साधे रेशनकार्ड देखिल नाही. आम्हाला दोन मुले आहेत. परंतू, त्यांचे पोट भरण्यासाठी ते पाखरासारखे उडून गेले. व आजपर्यंत ते कुठे आणि कसे आहेत, आम्हाला त्यांचा पत्ता सुद्धा नाही. आम्हाला मुले किंवा नातेवाईकांची साधी मदत नाही. आमच्याकडून आता काहीही काम सुद्धा होत नाही व डोळ्यांनी देखिल दिसत नाही. बोलता बोलताच ते अचानक चक्कर येऊन पडले. त्या व्यक्तीची तब्येत काहीशी ठीक नव्हती. हे गायकवाड साहेबांनी पाहीले. त्या वयोवृद्ध दाम्पत्याला प्रेमपूर्वक सहानुभूती दाखविली. कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तात्काळ घटनास्थळीच पंचनामा करण्यासाठी लोखंडी सावरगाव येथील तलाठी यांना आदेश दिले व सदरील सज्जाचे तलाठी साहेबांनी कसलाच विलंब न करता तत्काळ पंचनामा केला. तलाठी साहेबांना निदर्शनास आलेली बाब अशी की, दोन लोकांच्या झोपण्याची जागा असलेली अत्यंत लहान आकाराची झोपडी निदर्शनास आली. याची माहिती तात्काळ नायब तहसिलदार गायकवाड यांना सदर तलाठी यांनी दिली. याची गांभीर्याने दखल घेत, त्वरित रेशनकार्ड ऑनलाइन नोंदणी करून व नवीन रेशनकार्ड तत्काळ घेऊन संपूर्ण योजनेत समाविष्ट करून त्या वयोवृद्ध अंध दाम्पत्याला रेशनकार्ड देऊन व एक वर्षाचे नि:शुल्क स्वस्त धान्य मंजुर करण्यात आले. यापुढे आपल्याला धान्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही. असे उद्गार ऐकताच त्या वयोवृद्ध अंध दांपत्याला अश्रू आवरले नाहीत. व त्यांनी ते रेशनकार्ड खूप आनंदाने स्विकारले. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार शेख वाजेदभाई हे उपस्थित होते. आपल्या रोजच्या प्रशासकीय कार्यातून समाजसेवा कशी करावी हे तहसिलदार विपिनजी पाटील यांच्या मार्गदर्शनानूसार नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड व पेशकार अन्वरभाई यांची संपूर्ण तहसिल कार्यालयाची टीम करीत आहे. यापूर्वी ही नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड व पेशकार अन्वरभाई यांनी नेहमीच अशा गरजू लोकांची दखल घेतली आहे. बांधिलकी जोपासत वयोवृद्ध अंध दाम्पत्याला मदतीचा हात दिल्याबद्दल अंबाजोगाई महसूल विभाग आणि नायब तहसिलदार गायकवाड यांचे व त्यांच्या सर्व टीमचे सर्वस्तरांतून कौतूक होत आहे.
महसूलच्या वरीष्ठ अधिका-यांमुळे हे शक्य :
आपले रोजचे प्रशासकीय काम हे समाजसेवा समजून करावे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी राधाबिनोदजी शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनिलजी यादव साहेब, उपजिल्हाधिकारी शरदजी झाडके साहेब, तहसिलदार विपिनजी पाटील यांच्या मार्गदर्शनानूसार आणि अंबाजोगाईकरांचे व पेशकार अन्वरभाई यांची संपूर्ण तहसिल कार्यालयाच्या टीमच्या सहकार्यातून हे जनसेवेचे काम करीत आहोत.
- मिलिंद गायकवाड
(नायब तहसिलदार, अंबाजोगाई)
=======================
Comments
Post a Comment