जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन ; 44 शाळांमधील 450 दिव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग







आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा दिव्यांगांकडून घ्यावी - अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार


दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजना - समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे

========================



अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)

जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, बीड आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ, धानोरा (ता.अंबाजोगाई) यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील मुला - मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 9 व 10 जानेवारी 2023 रोजी अंबाजोगाईत करण्यात आले असून या स्पर्धेचे शानदार उद्घाटन अंबाजोगाईत करण्यात आले. या स्पर्धेत 44 शाळांमधील 450 दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाले असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक रवींद्र शिंदे (जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद,बीड) वैसाका अंकुश नखाते आणि सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर गुणाले यांनी दिली आहे.



दिव्यांग शाळेतील मुला - मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित करून, ध्वजारोहण करण्यात आले, दिव्यांग विद्यार्थ्यांची मानवंदना लक्षवेधी ठरली, सर्व दिव्यांग विद्यार्थी हे ड्रेस कोड मध्ये उपस्थित होते. स्पर्धेसाठी जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाच्या बँड पथकाने पथसंचलनाची सुरूवात केली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शानदार पथसंचलन केले. यावेळेस अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार या उद्घाटक म्हणून लाभल्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे हे होते, याप्रसंगी व्यासपीठावर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुश नखाते, सहाय्यक सल्लागार रितेश गाडे, गटशिक्षण अधिकारी शेख चाँद, गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे, सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संयोजक दिनकर गुणाले, संभाजीराव लांडे, लक्ष्मीकांत कुलकर्णी या मान्यवरांसह इतरांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रज्ञाचक्षू निवासी अंध विद्यालय (बीड) च्या संगीत संचाने स्वागतगीत सादर केले. यावेळेस मान्यवरांकडून परीक्षक शिवकुमार निर्मळे, दत्ता देवकते, रमण सोनवळकर, मनेश गोरे, गरूड सर, नाना गायके तसेच सुरवसे सर, कैलास, सय्यद सलीम यांचा मान्यवरांकडून यथोचित सन्मान करण्यात आला. उदघाटक म्हणून बोलताना अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार म्हणाल्या की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निःस्वार्थी मानवंदनेने आपण सारे भारावून गेलो आहोत, खरोखरच दिव्यांग मुले ही गुणांची खाण आहेत, त्यामुळेच ती  विशेष आहेत. या मुलांचे खरे पालक हे दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षिका आहेत. जगाचा दृष्टीकोन बदलविण्यासाठी ईश्वरानेच तुम्हाला पाठविले आहे. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदाने या मैदानाला ही आज धन्य वाटणार आहे, दिव्यांग कोणती ही तक्रार न करता आयुष्यात पुढे जातात, त्यामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा दिव्यांगांकडून घ्यावी असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी केले. प्रारंभी प्रास्ताविक करताना अलोक कुलकर्णी यांनी सदर जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये वरील नियमावलीचा अवलंब करून दिव्यांगाच्या प्रवर्गानुसार (१) मुकबधीर मुले - मुली, (२) मतिमंद मुले - मुली, (३) पुर्णत: अंध व अंशतः अंध मुले - मुली, (४) अस्थिव्यंग मुले - मुली, अशा चार प्रवर्गासाठी त्यांच्या वयोगटानुसार मुला - मुलींकरिता स्वतंत्र जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सदर जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक, साॅफ्ट बाॅल थ्रो, स्पाॅट जंप, पळत येवून लांब उडी, बुध्दीबळ, पासिंग दि बाॅल, भरभर चालणे, बादलीत बाॅल टाकणे, व्हीलचेअर रेस आणि व्हीलचेअर वर बसून - गोळाफेक, साॅफ्ट बाॅल थ्रो या विविध स्पर्धांचा समावेश आहे. सदरील जिल्हास्तरीय स्पर्धा मध्ये प्रथम विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र राहील असे सांगून या स्पर्धेत बीड जिल्ह्यातील 44 शाळांमधील 450 दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि 150 हून अधिक शिक्षक, शिक्षीका, कर्मचारीवृंद सहभागी झाले असल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता अंकुश नखाते यांनी दिव्यांग हा समाजातील घटक सर्वांत वंचित, उपेक्षित आहे. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे,  दिव्यांगांना समाजाकडून केवळ सहानुभूती नकोय तर त्यांना समानतेची योग्य संधी आणि सन्मान मिळाला पाहीजे असे सांगून त्यांनी हेलन केलर आणि ब्रेल लुईस यांचे दिव्यांग बांधवांसाठीचे योगदान, विविध क्षेत्रातील दिव्यांगांचे कार्य, यश, सुविधा, संधी याबाबत त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी शेख चाँद यांनी दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना, सर्वसमावेशक शिक्षण याबाबत अधिक माहिती दिली. गटविकास अधिकारी समृध्दी दिवाणे यांनी समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून दिव्यांग शाळा कार्य करीत आहेत, हे अभिनंदनीय आहे. असे गौरवोद्गार काढून दिवाणे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हा समाजकल्याण अधिकारी रवींद्र शिंदे म्हणाले की, शासनाचा दिव्यांग विभागाकडून चांगले काम करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी संयोजन समितीचे कौतुक केले, दिव्यांगांसाठी विविध योजना राबवून चांगल्या सेवा व सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत अशी माहिती देवून जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिंदे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन मानवविकास मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार सौ.सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव दिनकर गुणाले यांनी मानले. 9 जानेवारी रोजी सायं 6.30 वाजता सौभाग्य मंगल कार्यालय अंबाजोगाई येथे सांस्कृतिक समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा समारोप आज मंगळवार, दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता पारीतोषिक वितरण समारंभाने होईल. बक्षीस वितरण व समारोप समारंभासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे, तहसीलदार बिपीन पाटील, स्वाराती शासकीय रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी शेख चाँद, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव गणपत व्यास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


======================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड