परभणीत २३ ते २५ डिसेंबर दरम्यान मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

परभणी (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)








मराठा सेवा संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २३ ते २५ डिसेंबर दरम्यान परभणी येथील पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशाच्या स्वागताध्यक्षपदी कृषीभूषण कांतराव देशमुख झरीकर यांची निवड करण्यात आली आहे.



राज्यस्तरीय महाअधिवेशन संदर्भात होणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी गुरूवार, दि.२४ नोव्हेंबर रोजी आयोजक पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्वागताध्यक्ष कांतराव देशमुख झरीकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव भुसारे, सचिव सुधाकर गायकवाड, कार्याध्यक्ष नरहरी वाघ, प्रवक्ते सुभाष ढगे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, शहराध्यक्ष गजानन जोगदंड, सुभाष जाधव, प्रसिध्दीप्रमुख भुसारे यांची उपस्थिती होती. यावेळी भुसारे म्हणाले की, शुक्रवार, दि.२३ डिसेंबर रोजी महाअधिवेशनाला सुरूवात होईल. वसमत रोडवरील जिजाऊ मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर सकाळी १० वाजता महापुरूषांना अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता ग्रंथ अभ्यासक व साहित्यीक बाबा भांड यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाथरी रोडवरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा व ग्रंथदिंडी निघणार आहे. सायंकाळी ८ ते १० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होतील. अधिवेशनात २४ डिसेंबरला "शेतीचे वास्तव व दिशा", "नव समाज आणि शिवधर्माचे आचरण", "कुणबी मराठा समाजासाठी सारथी संस्थेचे योगदान", "शिक्षणातील बदल व देश विदेशातील संधी" या विविध विषयांवर परिसंवाद व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दुसरे दिवशी २५ डिसेंबर रोजी मराठा सेवा संघ विचार व कार्य, एक पाऊल आर्थिक साक्षरतेकडे, मराठा महिला, कुटुंब, समाजमान व उद्यमशिलता तसेच राजसत्ता, लोकशाही व वर्तमानातील राजकारण आदी विषयांवर तज्ज्ञ अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. महाअधिवेशनाचा समारोप दुपारी चार वाजता होईल. समारोप कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या संस्थांचा सत्कार, सन्मान करण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. अधिवेशनासाठी देश व राज्यभरातून मान्यवर परभणीत दाखल होणार असल्याचे भुसारे यांनी सांगितले. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी मराठा सेवा संघ, संलग्न संघटना पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. येणा-या सर्वांच्या भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली.


=========================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)