शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाईची मदत जाहीर
========================
मुंबई (विशेष प्रतिनिधी - लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना पंचनामे करून मदतीचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, अद्याप पूर्ण मदत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली नव्हती. विरोधी पक्षांना हाच मुद्दा महत्वाचा ठरत होता. पण, आता विरोधकांची तोंडे बंद करण्याचा आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने आध्यादेश काढत शेतकऱ्यांना दुप्पट मदतीची घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईत प्रती हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रूपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये प्रती हेक्टर मिळणार आहेत, तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रूपये प्रती हेक्टरला मिळणार आहेत. तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता 36 हजार रूपये मिळणार आहेत. सरकारने नुकसानीची मर्यादा ही वाढविली आहे. दोन हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीक आणि शेतजमीनीच्या नुकसानासाठी 22232.45 लाख निधी वितरीत करण्यास सरकारने तत्वत: मंजुरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागणीद्वारे करण्यात येणार आहे. त्यानुसार या निधीचे वाटप लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले. यावेळी शासन निर्णयात जिल्हाधिकाऱ्यांना देखील विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे करून लाभार्थी निश्चित करावेत. तसेच शासन निर्णयानुसार रक्कम बीम्स प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येत असली, तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतरच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गरजेनुसार कोषागारातून रक्कम काढून शासन निश्चित करेल अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करायची आहे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
================
Comments
Post a Comment