समाबाई शिंदे यांच्या विधीतील पारंपारिक गोष्टीला नातवांनी दिला फाटा

वृक्षारोपण करून अस्थी व रक्षाचे विसर्जन ; दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

=========================

अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)


येथील समाबाई मारोती शिंदे यांच्या विधीतील पारंपारिक गोष्टीला नातवांनी फाटा दिला, जलप्रदूषण टाळण्यासाठी आजीच्या आठवणी सतत मायेची सावली देतील हा विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून हजारो वर्षांपासून सुरू असलेली अस्थी विसर्जनाची परंपरा खंडित केली. आणि वृक्षारोपण करून नातवांनी अस्थी व रक्षाचे विसर्जन केले. 


निधनानंतरच्या पारंपरिक विधी व प्रथेला फाटा देत येथील पशुसंवर्धन विभागात कार्यरत असलेले बाबासाहेब शिंदे, भगतसिंग ज्युनियर कॉलेज मधील प्रा.रवींद्र शिंदे यांच्या मातोश्री समाबाई मारोती शिंदे यांचे वृध्दापकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीनंतर त्यांच्या अस्थि व रक्षा नदीत विसर्जित न करता नातवांच्या हातून तिसऱ्या दिवसाच्या विधी दिवशी पिंपळवृक्ष हे झाड लावून त्यात अस्थि व रक्षा विसर्जित करण्यात आली. अस्थि व रक्षा नदीत विसर्जित केल्याने नदीचे जलप्रदूषण होत असल्याने शिंदे कुटुंबाने या पध्दतीने तिसऱ्या दिवसाचा विधी केला. यावेळी पारंपरिक रूढीप्रमाणे अस्थि व रक्षा नदीत विसर्जित करण्यात आल्या नाहीत. तर कालवश समाबाई यांचे सुपुत्र बाबासाहेब शिंदे, प्रा.रवींद्र शिंदे, मोठी मुलगी आरोग्य कर्मचारी केशरताई सिरसट, शिक्षिका रेखाताई शिंदे, कस्तुरताई साळवे तसेच नातू अक्षय सिरसट, प्रशांत मस्के, विश्वास साळवे, मंथन शिंदे, हर्षवर्धन शिंदे तसेच सुना, जावाई, पणतू यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या सर्वांनी मिळून कालवश समाबाई यांच्या स्मरणार्थ पिंपळाचे झाड लावून झाडाच्या आळयात अस्थि व रक्षा विसर्जित करून सर्वांसमोर आदर्श घालून दिला आहे. कालवश समाबाई यांचे मुळगाव परळी तालुक्यातील मोहा हे होते, समाबाई यांचे पती काॅ.मारोतीराव हे कम्युनिस्ट पक्षाचे नेते माजी खासदार काॅ.गंगाधर आप्पा बुरांडे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीचे सच्चे पाईक होते, मोहा गावात सामाजिक सलोखा कायम राखणे, गावात सर्वांना सोबत घेवून सर्वप्रथम महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी, श्रमिक यांच्यासाठी कार्य केले. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. "एक गाव, एक पाणवठा" राबविण्यासाठी पुढाकार घेतला. काॅ.मारोतीराव यांच्या प्रवर्तनवादी विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम आज शिंदे, सिरसट, साळवे, मस्के हे परीवार करीत आहेत.



नदीपात्र, तळ्यात अस्थी विसर्जन टाळा, आणि आपल्या प्रियजनांच्या आठवणीसाठी वृक्ष लावा..!

======================

पर्यावरण रक्षण केले पाहीजे, पर्यावरण संतुलन व जलप्रदूषण रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्न झाले पाहिजेत, गावातील, कुटुंबातील मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा नदीपात्र, तळ्यात किंवा जलप्रवाहात विसर्जित न करता आपल्या शेतात किंवा घरासमोर खड्डा खोदून त्यात टाकाव्यात. पर्यावरणाचा संदेश देणारा हा सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाचे अनेकांकडून स्वागत होत आहे.

- अक्षय सिरसट (नातू)



तर पर्यावरणाचे संवर्धन होईल..!

=======================

मृत व्यक्तीची रक्षा नदीत विसर्जित केली, तर त्यामुळे जलप्रदूषण होते. पण, या उपक्रमामुळे घरासमोर, शेतात, परीसरात लावलेली झाडे आणि त्यात असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तींच्या आठवणी सतत मायेची सावली देत राहतील. अशी प्रथा देशभर राबविली, तर पर्यावरणाचे संवर्धन होईल. 

- बाबासाहेब शिंदे (मुलगा)


=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)