आदर्श संस्काराचे विद्यापीठ : फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख
आदर्श संस्काराचे विद्यापीठ : फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख
========================
"आई म्हणजे नि:स्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा, आई तुझे नसणे आज पदोपदी जाणवत आहे. तू नेहमीच समाजातील गरजू लोकांना मदत केलीस, त्यांना मदत करताना हे "विश्वची माझे घर" हा एकच संस्कार जोपासलास. सामाजिक कार्य करताना आम्हाला कायमच प्रोत्साहन दिलेस. तुझे विचार आणि करारी व्यक्तिमत्त्व अखेरपर्यंत जमिनीशी जोडलेले होते. या मातीचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून तू माणुसकी जोपासली. तुझ्यासारखे व्यक्तिमत्त्व आमच्या परीवाराचे वैभव होते. हेच खरे..! आमची आई फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी नुकतेच मंगळवार, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दु:खद निधन झाले. आमच्यासाठी व समाजासाठी "आदर्श संस्काराचे विद्यापीठ : फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख" या होत्या व यापुढे ही राहतील, आमच्या मातोश्री फाल्गुनबाई हे आदर्श व्यक्तिमत्त्व मला नेहमीच का भावले, का आवडायचे, एक मुलगा म्हणून माझ्या भावना शब्दांतून व्यक्त करण्याचा केलेला प्रयत्न..!"
======================
आमचे वडील श्रीकिशनराव देशमुख हे एक आदर्श शिक्षक होते. अंबाजोगाई शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा (बुरूज) येथून केंद्रीय मुख्याध्यापक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले, वडीलांनी अखेरपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य केले. आमचे चुलते गावचे सरपंच आणि सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन होते. सात भावाचे मोठे कुटुंब आहे. जमीन ही मुबलक आहे. पंचक्रोशीत मानमरातब आहे. श्रीकिशनराव व फाल्गुनबाई यांना मी राजेसाहेब माझे दोन भाऊ अनुक्रमे विजयकुमार आणि संजयराव हे आम्ही तीन मुले आणि सुमनताई विजयकुमार देशमुख (डिघोळ ता.सोनपेठ) व कालिंदाताई श्रीमंतराव देशमुख (सोनपेठ) या दोन मुली आहेत. मी राजकारण, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारा एक कार्यकर्ता आहे, तर विजयकुमार हे उद्योजक आणि कंत्राटदार आहेत, लहान बंधू संजयराव हे माकेगावचे सरपंच होते, सामाजिक कार्य करून ते शेती हा व्यवसाय करतात. आई - वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही तिन्ही भाऊ, दोन बहिणी शिक्षीत असून आयुष्यात अत्यंत समाधानी, आनंदी, परोपकारी भावनेतून प्रगती करीत आहोत. मागे वळून पाहताना प्रकर्षाने आठवतात ते आमचे वडील श्रीकिशनराव देशमुख हा ‘बापमाणूस’, आणि आईच्या रूपातील तेवत असणाऱ्या "बाई" या ज्योतीपेक्षा अधिक प्रखर पण, विनातक्रार प्रकाश देणाऱ्या समईसारखी आमची आई म्हणजे सर्व भावंडे, नातेवाईक, आप्तेष्ट यांची लाडकी "बाई" होय. बाईचे माहेर लोमटे जवळा (जि.उस्मानाबाद) आहे, आमच्या बाईला धार्मिक, अध्यात्मिक कार्याची मोठी आवड होती, बाईचा स्वभाव प्रेमळ, संवेदनशील आणि परोपकारी होता. बाई जेवढी मायाळू तेवढीच शिस्तप्रिय आणि करारी बाण्याची होती. देशमुख कुटुंबाला एकञ ठेवण्यात बाईचे मोठे योगदान आहे. बाईच्या व्यक्तिमत्त्वातील चांगुलपणामुळेच पंचक्रोशीत आमच्या आईला सर्वजण "बाई" या नावानेच ओळखत असत. वडील श्रीकिशनराव आणि आई फाल्गुनबाई यांच्या समाजस्नेही स्वभावामुळे बावणे (तांदुळजा,जि.लातूर), विजयकुमार देशमुख (डिघोळ ता.सोनपेठ), श्रीमंतराव देशमुख (सोनपेठ) लाखे पाटील (लाखनगाव, जि.जालना ), तांबे पाटील (देवळाली,ता.भूम, जि.उस्मानाबाद), खडके पाटील (उस्मानाबाद), कोकाटे देशमुख - आडसकर (आडस, ता.केज,जि.बीड), देवसरकर पाटील (उमरखेड-विदर्भ) आणि खासदार धनंजयजी महाडिक (कोल्हापूर-पश्चिम महाराष्ट्र) या परिवारांशी ऋणानुबंध जुळले. काही वर्षांपूर्वीच वडील गेले, आज आमची आई ही या जगात देहरूपाने नाही. पण, विचार रूपाने कायम मनात जिवंत आहे, मला वाटते आपल्या असण्याला अर्थ असतो तो केवळ आपल्या ‘आई - वडीलां’मुळेच, नाही का ? आई घराचे 'मांगल्य' असते, तर वडील 'अस्तित्व', या दोघांच्या चरणी आम्ही देशमुख (माकेगावकर) कुटुंबीय कायमच नतमस्तक आहोत..! आम्हा सर्वांना आपल्या मातृत्व भावनेने सांभाळणाऱ्या, एकञ ठेवणाऱ्या बाईंचा चेहरा डोळ्यांसमोरून जाता जात नाही. आमच्या बाईने, आई होऊन आमच्या कुटुंबात संस्काराची बीजे पेरताना वडीलानंतर पितृत्वाचा खंबीर आधार दिला. आम्हा भावंडांना एक समृद्ध माणूस म्हणून घडविले आणि वडिलांच्या इच्छेप्रमाणे लोककार्यासाठी मार्गस्थ ही केले. बाई तुम्ही आमचा आधार होतात, आणि पुढे ही राहताल, तुमच्या संस्काररूपी शिदोरीच्या बळावरच आम्ही उभे आहोत.
"करी मनोरंजन जो मुलांचे ।
जडेल नाते प्रभुशी तयाचे।।"
या ओळींचा मतितार्थ ज्यांनी आयुष्यभर जपला, ज्यांनी लावलेल्या संस्काराचा नंदादीप असंख्य मुलांच्या यशस्वी जीवनाचा मार्ग उजळून टाकतो आहे असे आमचे वडील 'श्रीकिशनराव' आणि ज्यांनी कुटुंबासाठी मातृप्रेमाचे महामंगल स्तोत्र ‘श्यामची आई’ होवून आम्हाला माणुसकीचे बाळकडू दिले त्या आमच्या आई 'फाल्गुनबाई' यांच्या संस्काररूपी सुगंधाचा दरवळ आज आमच्या पुढच्या पिढीत ही पसरलेला दिसून येईल. अत्यंत कठीण परिस्थितीत ही आपल्या जीवनाची अमृतवेल कशी फुलवावी हे शिकविले, वडील श्रीकिशनराव गुरूजींचे जीवन प्रत्येकाला मार्गदर्शन करणारी एक आदर्श संस्कारक्षम विद्यालय होते, आई-वडील आमचे गुरू, तेच कल्पतरू हेच सूत्र आम्ही आयुष्यभर जपले आहे. आपले मन निर्मळ ठेवा, परोपकारी बना, प्रत्येक काम नीटनेटके करावे, आपल्या कार्यातून इतरांचे भले व्हावे, संवेदनशीलता जपा, ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा मंञ आईने आयुष्यभर जपला व आम्हाला दिला. मिञांनो, आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात. पण, आपल्या आई - वडीलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता हे तिला माहीत नसेल तर तिच्यावर असलेले तुमचे प्रेम ती जीवंत असताना व्यक्त करा. कारण, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हे म्हणतात ते उगीच म्हणत नाहीत.
"सगळे दिले मला आयुष्याने, आता एकच देवाकडे मागणे, प्रत्येक जन्मी मला हिच आई मिळो या पेक्षा अजून काय हवे"
आमच्या आईने आम्हा भावंडांना माणूस म्हणून घडविले. आज जाणीव होते आहे की, तुझ्याशिवाय या जगात काहीही नाही चांगले, मागील अनेक वर्षांपासून "बाई" रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नसायचा, आपल्या दोघांच्या माय - लेकराच्या नात्यात छान ट्यूनिंग जमले होते, आईच्या प्रेमाची माया ही काहीही केल्या कमी होत नाही. जगाच्या बाजारात सगळे काही मिळते. पण, मिञांनो आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही. घराला घरपण आणते ती आई आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते ती म्हणजे आपली आई, माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…"बाई" होय, बाई तु किती काय काय सांगायचीस, मनमोकळे बोलायचीस. रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती. आज तू दिसत नाहीस, त्यावेळी मला तुझी नसण्याची किंमत कळली आहे आई. काय करू आई आज तुझी खूप आठवण येते. मला प्रत्येक ठिकाणी आज तुझीच सावली दिसते. कातर होऊन जातो स्वर. दबून जातो हुंकार, आठवणीने जीव तळमळतो. वाटते जेव्हा येईल कुठून तरी बाईचा आवाज, आकाशाचा जरी केला कागद, अन् समुद्राची जरी केली शाई. तरीही आईच्या प्रेमाबद्दल मला कधीच काही लिहीता होणार नाही, हे मी जाणतो. माझ्या आईची महती सांगायला शब्द कधीच पुरणार नाहीत. तिचे उपकार फेडायला सारा जन्मही पुरणार नाहीत. पहिला शब्द जो मी उच्चारला. पहिला घास जिने मला भरविला. हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकविले. मी आजारी असताना ही माझ्या आईने रात्रंदिवस जागून काढले. हे कसे विसरू त्यामुळे मिञांनो आपणांस एकच आवाहन करतो की, तुम्ही जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या आई वडीलांना प्रेम द्या, आनंद असो वा दुःखाचे ढग आईला सदैव आनंदी आणि हसरं ठेवा, घराला घरपण आणते ती आई, आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते ती म्हणजे आपली आई होय, हे कधीही विसरू नका. आई म्हणजे निःस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा, आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. पण, आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई, आपल्यावर मनापासून प्रेम करते. कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते अशा आईवर तुम्ही किती प्रेम करता. सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात. तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द कायम राहतात. आमची आई फाल्गुनबाई श्रीकिशनराव देशमुख यांचे वयाच्या 85 व्या वर्षी नुकतेच मंगळवार, दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दु:खद निधन झाले. या दुःखाच्या काळात धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, राजकीय, क्रीडा, पञकारीता, वैद्यकीय, सहकार, शेती, शेतमजूर, श्रमिक, कष्टकरी, कामगार, संगीत, उद्योग, व्यापार, विधी, सर्वधर्मीय समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक आणि मित्र परिवाराने प्रत्यक्ष भेटून, तसेच फोनवरून, सोशल मिडीयावरून आमचे सांत्वन केले, आमच्या दु:खात सहभागी होत धीर दिला त्या सर्वांचा मी राजेसाहेब, विजयकुमार, संजयराव आणि समस्त देशमुख परीवार (माकेगावकर) आपला ऋणनिर्देश व्यक्त करीत आहोत.
शब्दांकन :
राजेसाहेब श्रीकिशनराव देशमुख
(माकेगावकर)
जिल्हाध्यक्ष - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,बीड.
========================
Comments
Post a Comment