"सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी तरूणांना सक्षम बनविणे" हेच आई सेंटरचे मिशन - विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे
"सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी तरूणांना सक्षम बनविणे" हेच आई सेंटरचे मिशन - विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे
श्रीयश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च औरंगाबाद येथे "डायमंड इन मी" एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
=========================
औरंगाबाद (लोकनायक मिडीया न्युज नेटवर्क)
आजचा तरूण मग तो शहरी भागातील असो वा ग्रामीण भागातील या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात पुढे सरसावताना दिसत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मिळणारे ज्ञान तसेच, सेमिनार्स व वर्कशॉप्स मधून आत्मसात होणारे कौशल्य यामुळे विविध क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता व कौशल्य सिद्ध करण्यासाठीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामुळे तरूणांनी अधिक यशस्वी होण्यासाठी स्वतः मधील डायमंड ओळखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय आयकॉन पुरस्कार विजेते तथा ॲमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक व आई सेंटरचे संचालक विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी 'श्रीयश प्रतिष्ठान' संचलित श्रीयश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च औरंगाबाद येथे प्रथम ते अंतिम वर्षीय विद्यार्थ्यांसाठी आयोजित "डायमंड इन मी" या एक दिवसीय कार्यशाळेत केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेश तापडिया तर विचारमंचावर कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक आई सेंटरचे संचालक तथा विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे, सोहम एज्युकेशन कौन्सिलिंग सेंटरचे संचालक प्रा.राहुल सुरवसे, विभाग प्रमुख डॉ.मिलिंद कांबळे, समन्वयक तथा विभागप्रमुख प्रा.उदय दुनाखे व प्रा.प्रिती उंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे म्हणाले की, आज घडीला आपण जे यशस्वी व्यक्ति पाहत आहात यामध्ये अगदी लोकल पासून ते ग्लोबल पर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्व त्यांनी त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देत स्वतःच्या मनावर ताबा ठेवत व भावनांना योग्य दिशा देत हे दैदीप्यमान यश संपादित केलेलं आहे. यासाठी तुम्ही जे कार्य करत आहात त्यात तुमचा शंभर टक्के फोकस असणे खूप महत्त्वाचे आहे. सोबतच अधिक परिश्रम करण्याची तयारी, सातत्य व समर्पण यामुळेच आपण अधिक यशस्वी होऊ शकाल व आपल्या पालकांचे, गुरूजनांचे, महाविद्यालयाचे नाव देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी मोलाचे ठरणारे असेल. या कार्यशाळेत विश्वविक्रमवीर सर नागेश जोंधळे यांनी अतिशय प्रभावीपणे सादरीकरण करत तरूणांना अधिक यश संपादन करण्यासाठी मेडिटेशन चे महत्व, स्वतःतील जमेच्या बाजू, कमतरता, भविष्यात येणाऱ्या संधी व भीती म्हणजेच (SWOT : Strengths, Weaknesses, Opportunities, Threats) स्वाॅट अनायलिसिस, महाविद्यालयीन जीवन, करिअर तसेच, जीवनामध्ये येणाऱ्या अवघड प्रसंगांना देखील आपल्या सकारात्मक विचाराने व कृतीने कशी मात करता येईल यावर सुयोग्य असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पूर्ण दिवसभर तरूणांचा सक्रिय सहभाग पाहण्यासारखा होता. सर नागेश जोंधळे यांच्या आई कालवश शांताबाई भुजंगराव जोंधळे यांच्या 24 ऑक्टोबर 2022 रोजी झालेल्या निर्वाणानंतर ही पहिलीच कार्यशाळा असल्यामुळे 'आई'स सभागृहातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक यांनी अभिवादन केले. यावेळी आजची कार्यशाळा 'डायमंड इन मी' माझ्या प्रेमळ व हसतमुख आई ला समर्पित करत मी तुझ्यावर खूप प्रेम करतो व तुला वचन देतो की, सर्व कार्यशाळांमधील सहभागींच्या चेहऱ्यावर अधिक हसू आणून आणि त्यांच्या पालकांना प्रत्येक कार्यक्रमात अधिक अभिमान वाटेल असे दर्जेदार कार्यक्रम करत याचे समाजभान ठेवून आमच्या इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात 'आई सेंटर'चे मिशन "सशक्त राष्ट्र निर्मितीसाठी तरूणांना सक्षम बनविणे" असल्याचे सांगत असतानाच अतिशय सह्रदयस्पर्शी क्षण सर्व उपस्थितांनी सभागृहात अनुभवला. यावेळी प्रियंका खरात, शितल पुंड, साक्षी सोराशे, अपूर्वा गव्हाणे, पुरूषोत्तम बोधरे, पुनम गावंडे, अभिषेक डेंगळे व गायत्री पठाडे या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला व आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.स्नेहल राठोड व प्रा.प्रिती उंदरे यांनी अतिशय प्रभावीपणे केले तर विद्यार्थीप्रिय प्रा.डॉ.मिलिंद कांबळे सर यांनी उपस्थित मान्यवर व सहभागी विद्यार्थी यांचे ऋण व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
=======================
Comments
Post a Comment