अंबाजोगाईत खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह
व्यक्तिगत ध्येय निश्चितीद्वारे संस्थेचा उत्कर्ष साधावा - आ.श्रीकांत भारतीय
भा.शि.प्र.संस्थेचे वटवृक्षात रूपांतर - सुनिल लोढा
================
अंबाजोगाई (लोकनायक मिडीया न्युज)
खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.
येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर महाविद्यालयाची स्थापना दिनांक 13 जून 1972 रोजी झाली होती. शैक्षणिक वर्ष 2021 - 22 हे खोलेश्वर महाविद्यालयाने आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले. खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र.संस्थेचे कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे प्रदेश संघटन मंत्री तथा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आ.श्रीकांत भारतीय आणि या प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील लोढा यांची विशेष उपस्थिती लाभली. या सांगता सोहळ्यासाठी भा.शि.प्र.संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजय वालवडकर, स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अप्पाराव यादव, सौ.वर्षाताई मुंडे, राम कुलकर्णी आदी पदाधिकारी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना आ.श्रीकांत भारतीय म्हणाले की, भा.शि.प्र.संस्थेचा जन्म हा वेदनेतून झालेला आहे. अशा संस्थेची वाटचाल हि नक्कीच दैदिप्यमान असते. सुरूवाती पासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या संस्थेने प्रगती केली आहे. संस्थेतील प्रत्येक घटकाने व्यक्तिगत ध्येय निश्चिती केल्यास संस्थेची सामुहिक ध्येयपूर्ती व भविष्यातील सर्जनशील उत्कर्ष नक्कीच साधता येतो, असे सांगून या महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केले याचा अभिमान वाटतो. ही संस्था मोठी होण्यापासून आता कोणी ही रोखू शकणार नाही. मी दिवंगत भाजप नेते प्रमोदजी महाजन यांच्या दिंडीतील एक वारकरी आहे, त्यामुळे प्रमोदजींच्या कर्मभूमीत येण्याचा मनस्वी आनंद आहे. ज्या भूमीवर प्रमोदजी एक यशस्वी रंगकर्मी म्हणून वावरले त्या भूमीवर प्रमोदजींच्या नावे एक नाट्यगृह उभा करणे ही माझी जबाबदारी असल्याचे सांगून आ.भारतीय यांनी या संस्थेच्या सर्वांगिण विकासाकरिता मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही दिली. प्रमुख अतिथी सुनिल लोढा यांनी भा.शि.प्र. संस्थेच्या विकासात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या आठवणी जागविल्या, अनेकांचा नामोल्लेख केला. संस्थेचे विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत असे सांगून भविष्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आधुनिक अभ्यासक्रम राबवता येतील, तसेच या संस्थेचे एक विद्यापीठ तयार करता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना भा.शि.प्र. संस्थेचे कोषाध्यक्ष सत्यनारायण लोहिया यांनी आगामी वर्षांत आपण काही संकल्प केले पाहिजेत, एखाद्या महाविद्यालयाचा सांगता समारोह कसा असावा याचा 'बेंचमार्क' खोलेश्वर महाविद्यालय आहे असे गौरवोद्गार लोहिया यांनी काढले. प्रारंभी मान्यवरांकडून दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर यांनी संस्था परीचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रभारी प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी खोलेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, खोलेश्वर महाविद्यालयाच्या वतीने विविध शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे, विद्यार्थ्यांमधून आदर्श, राष्ट्रप्रेमी व जबाबदार नागरिक घडविण्याचे तसेच अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले गेले. हे सर्व उपक्रम व कार्यक्रम यशस्विरित्या संपन्न करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व सेवकवर्गाने अत्यंत हिरीरीने सहभाग घेतला. पाहुण्यांचा परिचय करून देत महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष राम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर व माजी प्राचार्य रा.गो.धाट यांचे ध्वनिमुद्रित शुभेच्छा संदेश ऐकविण्यात आले. धर्मराज तुळशीराम नरवटे, बिभिषण पांडुरंग गडदे, सुमंत विठ्ठल जाचक या निवड झालेल्या अग्निवीरांचा मान्यवरांकडून विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.श्याम बारडकर व सौ.अनिता बर्दापूरकर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एॅड.मकरंद पत्की यांनी मानले. वैयक्तिक पद्य प्रा.शैलेश पुराणिक यांनी सादर केले, तर एकात्मता मंञाचे पठण उपप्राचार्य डॉ.दिगंबर मुडेगावकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी - माजी विद्यार्थी,माजी कर्मचारी, हितचिंतक, नागरिक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्ण महोत्सव सुकाणू समितीचे अध्यक्ष एॅड.मकरंद पत्की, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाकडून पुढाकार घेण्यात आला.
================
Comments
Post a Comment