आई सेंटर आयोजित "द डायनॅमिक टॉप रँकर" या दोन दिवसीय कार्यशाळेस मुलांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोरोनाने मुलांची अभ्यासूवृत्ती हिरावली ; मुलांच्या मेंदूवर अभ्यासाच्या सवयीचे संस्कार आवश्यक - विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे
========================
अंबाजोगाई (लोकनायक डिजिटल मिडीया न्युज नेटवर्क)
कोरोना काळात मुलांच्या अभ्यासातील सातत्य सुटल्यामुळे तसेच, ऑनलाइन शिक्षण पद्धती भारतीय मुलांच्या अंगी रूजविणे सपेशल फेल ठरल्यामुळे आजची शाळकरी व महाविद्यालयीन मुले हे त्यांच्या ध्येयापासून दूर जातानाचे विदारक चित्र हे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच शिक्षण संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक तसेच पालकांसाठीही मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे कोरोनानंतर मुलांच्या मेंदूवर अभ्यासाच्या सवयीचे संस्कार होणे गरजेचे, आवश्यक आणि महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन 'शिक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व' पुरस्कार प्राप्त तथा अमेझॉन बेस्ट सेलिंग लेखक व विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांनी 'आई' बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित "द डायनॅमिक टॉप रँकर" या दोन दिवसीय कार्यशाळेत बोलताना केले.
इयत्ता दहावी / बारावी बोर्ड परीक्षेत अधिक गुण मिळविण्यासाठी आणि नीट / जेईई / सीईटी तसेच युपीएससी / एमपीएसी परीक्षा क्रॅक करण्यासाठी 14 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आई सेंटर कॅम्पस, संत सावतामाळी नगर, अंबाजोगाई येथे केले होते. या कार्यशाळेत बोलताना सर नागेश जोंधळे यांनी सांगितले की, मुलांची सद्य:स्थितीतील दिनचर्या, शाळेत व महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक शिकवित असताना येणाऱ्या अडचणी, आत्मविश्वासाचा अभाव, अभ्यासात मन न लागणे, सोशल मिडियाचा क्षणिक आनंद देणारा भडीमार, ऐन किशोरवयीन वयात नको असलेले मोबाईल मधील ऍप्स यामुळे तो दिशाहीन झालेला आहे. यावर मात करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी रचनात्मक व कृतिशील आराखड्याच्या माध्यमातून त्यांच्या अभ्यासात गोडी निर्माण करण्यासाठी तसेच, सातत्य राखण्यासाठी मुलांनी का, काय व कसे करायला हवे? मुलांचे अभ्यास कौशल्य विकसित करीत त्यांच्या मनात अभ्यासाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करून अभ्यासात अधिक रूची आणि एकाग्रता कशी वाढवायला हवी, सोबतच बोर्ड परीक्षेत 50 ते 95 टक्के व यापेक्षा अधिक गुण कसे मिळवायचे?
याची सविस्तर मार्गदर्शन आकर्षक पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशन व विविध चित्रफितीच्या माध्यमातून अगदी प्रभावीपणे सर नागेश जोंधळे यांनी दिली. या दोन दिवसीय कार्यशाळेत मुलांनी दिलेला भरभरून प्रतिसाद खूप वाखाणण्याजोगा होता. विश्वविक्रमवीर प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांच्या सादरीकरणाने व त्यांची मुलांना प्रेरित करण्याची हातोटी यामुळे सर्व सहभागी विद्यार्थी हे अतिशय प्रभावित झालेले असल्याचे अभिप्राय परिसरातील विद्यार्थीप्रिय शिक्षक व शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्व डॉ.बबन मस्के, प्रा.डॉ.किर्तिराज लोणारे व तौर सर यांनी दिले. इन्फॉर्मेशन एक्सचेंज सेंटर अर्थात 'आई सेंटर'च्या "द डायनॅमिक टॉप रँकर" या कार्यशाळेच्या माध्यमातून नागेश जोंधळे सरांनी मुलांची परीक्षेची भीती नाहीशी करून त्यांना ध्येय ठरविणे व ते कसे मिळवावे यासाठीचे अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केल्याचे जयप्रभा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.पवार यांनी यावेळेस नमूद केले. तर परिसरातील विद्यार्थी, पालक, सजग शिक्षक तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य व संस्थाप्रमुखांनी दिलेला प्रतिसादच या "द डायनॅमिक टॉप रँकर" या कार्यशाळेच्या यशाचे गमक असल्याचे सांगत आई सेंटरचे संचालक सर नागेश जोंधळे यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. तर अशा कार्यशाळेची नितांत आवश्यकता असल्याचे मत यावेळेस अनेकांनी व्यक्त केले हे विशेष होय. या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी परमेश्वर जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे, तरूण प्रशिक्षक आकाश गजभारे, कु.योगेश्वरी पुदाले, सजग पालक महादेव पुदाले व आई सेंटरचे सर्व फॅमिली मेंबर्स यांनी पुढाकार घेतला.
=====================
Comments
Post a Comment