अंबाजोगाईच्या पोलीस स्टेशन मधील अफलातून बालदिन..!

अंबाजोगाईच्या पोलीस स्टेशन मधील अफलातून बालदिन..!

शब्दांकन - 





प्रसाद (दादा) चिक्षे

समाजसेवक,अंबाजोगाई (जि.बीड)

========================

बालदिन कसा साजरा करावा या बाबत मनात बरेच प्रश्न चालू होते. काही निर्णय घेता येत नव्हता. काही तरी अफलातून, अनोखे, जगावेगळे आणि वस्तीतील मुलांना कायम स्मरणात राहणारे व्हावे असे नक्कीच वाटत होते. मुलांना आपला समाज आपलं कौतुक करतो असे पण वाटावे व समाजावर क्रुद्ध होऊन नक्कीच मुलं भविष्यात गुन्हेगार होणार नाहीत न याचा पण विचार सतत चालू होता. माझी मती खरंच काही काम करीत नव्हती.

अशा थोड्या विचित्र अवस्थेत असताना सकाळी एका कार्यक्रमात अप्पर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार मॅडमची भेट झाली. 

"आज काय करणार दादा बालदिनाचे काही विशेष ?" त्यांनी मला विचारले. माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. 

"मुलांशी जाऊन गप्पा मारणार..!" मी त्रोटक उत्तर दिले. 

"मी येऊ का गप्पा मारायला ? " 

"जरूर या !!"

थोडावेळ त्या शांत होत्या. त्यानंतर त्यांनी मला प्रस्ताव दिला  मुलांना पोलिस स्टेशन मध्ये बोलावण्याचा. त्यानंतर त्या फक्त बोलत होत्या आणि मी ऐकत होतो. त्यांनी बालदिन साजरा करण्याची पूर्ण जबाबदारी घेतली. मला मनातून बरं पण वाटलं. फार विशेष नाही पण होईल कार्यक्रम अशाच भावात मी होतो.

प्रत्यक्षात घडलं मात्र एकदम अफलातून. मॅडमनी व त्यांच्या टीमने फारच मस्त नियोजन केले होते. वस्तीवरील 60 मुलांना पोलिसांच्या गाडीतून ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये आणले गेले. त्यांना पूर्ण पोलीस स्टेशनची माहिती दिली गेली. पाहता पाहता भेदरलेली आणि घाबरलेली मुलं एकदम मोकळी झाली. पोलीस स्टेशन मध्ये आनंदाचे कारंजी उडत होती. 

मुलांसाठी बहारदार खेळांचे आयोजन केले गेले. मुलांचे भावविश्व समजून घेत त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मनसोक्त खाऊ आणि शैक्षणिक साहित्य देत प्रत्येक मुलाचे कौतुक करण्यात आले. मुलांनी आपल्याला येणारी गीत सादर केली. अंगीभूत असणारे कलागुण त्यांनी सर्वांना दाखवले. आपल्या हाताने बनवलेल्या भेट वस्तू त्यांनी मॅडम आणि त्यांच्या टीमला दिल्या. 

संपूर्ण कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा होता. मुलांच्या देशभक्तीपर घोषणांनी ग्रामीण पोलीस स्टेशन निनादत होते. आनंदाचा बहार आलेला होता. मला खरंच ही दोन तास मी स्वप्नांत तर आहे का ते वाटत होते. मी स्वतःला चिमटा घेऊन पाहिला. अंबाजोगाईच्या पोलीस स्टेशन मध्ये असा साजरा झालेला हा पहिलाच बालदिन असावा..! 

शासकीय कर्मचारी त्यात परत पोलीस मी तसा चार हात दूरच राहणारा. कविता मॅडमनी मला भेटण्याची इच्छा अनेकांच्या जवळ व्यक्त केली होती. मी ते अनेक वेळा टाळत होतो. पण, एक दिवस योग आला आणि आमची भेट झाली. एक पोलीस अधिकारी व त्यांची पूर्ण टीम इतका अप्रतिम कार्यक्रमाचे नियोजन करतात हा खरंच सुखद धक्का होता. मला अजून ही सतत डोळ्यांसमोर गेलेली दोन तास सतत येत आहेत. प्रत्येक क्षणाचे इतके देखणे आणि प्रचंड प्रेमाने भरलेले नियोजन केलेलं होते की, मन भरून पावलं.

मनःपूर्वक धन्यवाद  कविता मॅडम, श्री. उदार साहेब, श्री. केंद्रे साहेब, श्री. तागड साहेब आणि टीम.

तुम्ही आमच्या नाही तर आपल्या मुलांचा दिवस अविस्मरणीय केला.

================

Comments

Popular posts from this blog

भाजपाने अदानीच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीय जनतेला लुटून भुकेकंगाल केले - राजेसाहेब देशमुख

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड