अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला - राजेंद्र रापतवार
===================================
अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला
अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला,
देवीभक्त जनसागर उसळलेला.
चला आराध्यांनो गोंधळाला,
मार्गशीर्ष नवरात्र उत्सवाला.
हे देवीमंदिर जयवंती काठाला,
हेमाडपंथी, पाचमजली शिखर त्याला.
ओंकाराकृती योगेश्वरीचा तांदळा,
कमरेपर्यन्त शेंदुर आच्छादलेला.
योगशक्ती! या कुमरीका देवीला
यज्ञ, धर्म रक्षण ! दंतासुर वध केला.
हातात परडी जोगवा घेण्याला,
गळ्यात कवड्यांची पोतमाला.
संबळ-टाळांचा नाद झाला,
गोंधळ-गीत ऊर्जा भक्तीला.
आता मुखाने उदो-उदो बोला,
हळदी-कुंकु, खण-नारळ ओटीला.
इरकली-पैठणी परिधानाला,
वेणी-मोगरा सुगंध दरवळला.
नंदादिप तेवता, तेजाळलेला,
गाभारा प्रकाशाने उजळला.
नैवद्य पुरणपोळीचा आला,
नागिलपान तांबुल प्रसादाला.
धरण, ठाण मांडले नवसाला,
दिवटेही पेटवली साय-संध्येला.
दगडी दिपमाळ तेजाळलेला,
देवी भक्तांत दैवीसंचार झाला.
देवी पुढे होम-हवन पेटला,
पालखी-छबीना हा निघाला.
या कोकणस्थ त्रिपुरसुंदरीला,
माहेरवाशीन ग्रामदेवीला.
जाज्वल्य देवी पावते नवसाला,
श्रद्धाभक्तिने हा विश्वास वाढला.
आशिर्वाद घेण्यासाठी चला,
अंबाजोगाई देवीच्या दर्शनाला.
- © राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई.
संपर्क क्रमांक - +91 98509 86765
Comments
Post a Comment