प्रासंगिक : ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे शब्दांकन

प्रासंगिक : ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे शब्दांकन

"पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आनंदाच्या उसळलेल्या आनंद लहरी..."

===================================

"नुकतेच १५ सप्टेंबर २०२४ रोजी ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या माध्यम पुस्तक प्रकाशनाचा श्री गणेशा झाला. तो त्यांनी स्वतः लिहीलेल्या असामान्य, मंदिराचं गांव आणि सहज सुचलं म्हणून या तीन पुस्तकांचे एकत्रित प्रकाशन करून. या प्रकाशन कार्यक्रमाचे संकलन अतिशय नेमक्या शब्दांत करून राजेंद्र रापतवार यांनी आपले लहान बंधू ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकनायक मिडिया न्युज नेटवर्कच्या वाचकांसाठी हा प्रासंगिक वृत्तांत उपलब्ध करून देत आहोत. तो आपणांस निश्चितच आवडेल असा विश्वास आहे..."

====================================

या कार्यक्रमासाठी बीडहून आलेल्या पाहूण्यांसोबत सुसंवाद साधतांना गणेश पल्लेवार या वाचनप्रेमी स्नेहींनी सहज विचारले हे माध्यम प्रकाशन कुणाचे ? मी उस्फूर्तपणे म्हणून गेलो सुदर्शन यांचेच.. त्यांच्यासह इतर पाहुणे ही एकदम खुष झाले. अगदीचं साखर टाकलेलं घटबिंड्या केशर दुध पिल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आला. ते म्हणाले कुठलं ही प्रकाशन करू शकणार का ते ? मी म्हणालो अर्थात नक्कीच करणार. त्याचाच हा श्रीगणेशा. विशेष नोंद घेण्यासारखी व अभिमानाची बाब म्हणजे गणेशोत्सवात आलेला हा आनंददायी शुभयोग. माध्यम प्रकाशन प्रा.लि.अंबाजोगाईचा हा त्रिगुणकारी साहित्य सोहळ्याचा शुभदिन म्हणजेच आम्हां रापतवार परिवारासह सर्व अक्षरप्रेमी गणगोतांसाठी साहित्य दिवाळीच जणू. सोबतच या साहित्य दिवाळीत जणू कांही खास भाऊबीजेसाठी नांदेडहून आलेल्या डॉ.सौ.वृषालीताई किन्हाळकर, आपल्या साहित्य बंधू सुदर्शनच्या साहित्याच्या पहिल्या पावलांचे कौतुक करायला आलेल्या. लेखक सुदर्शन यांचे १) असामान्य, २) मंदिरांचे गांव आणि ३) सहज सुचलं म्हणून..! हे त्रिमूर्ती स्वरूप साहित्य अपत्य अर्थात पुस्तक स्वरूपात. सौ.वृषालीताईंनी सुदर्शनच्या साहित्यीक भाऊबीजेची ओवाळणी त्यांच्या मधुरवाणीतील जिव्हाळा, आपुलकीसह अन्तर्मनाच्या शब्द सुमनांनी निश्चितच केली. सोबतच वृषालीताईंनी कौतुकांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे तिन्ही पुस्तकरूपी साहित्य कृतीच्या वैशिष्ट्ये यांची एकत्रीत गुंफण करताना डॉ.वृषालीताई किन्हाळकर यांनी प्रत्येक पुस्तकाचे वेगळेपण सांगितले. त्यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. सौ.वृषालीताई या वैद्यकीय प्रसुती तज्ज्ञ तर आहेतच पण, त्या साहित्याच्या ही निष्णांत सर्जक आहेत. हे उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून लक्षात आले. सौ.वृषालीताईंनी या तिन्ही पुस्तकांच्या मध्यवर्ती सकारात्मक आत्मभावाची उकल वस्तुनिष्ठपणे केलीच आहे. या सोबतच पुस्तकांतील भावार्थाला एव्हरेस्ट उंचीवर नेवून हे पुस्तक विकत घेवून वाचन करण्याचा संकल्प ही वाचकांच्या मनामध्ये रूजविला. आपल्या कल्पक विश्लेषणात वृषालीताईंनी लेखकाच्या नाववातील 'सुदर्शन' बाण्याची आठवण देत 'रापतवार' नावातील 'रापने' आणि आपली 'पत' सांभाळून पत्रकारिता आणि साहित्य प्रपंंच वाढविण्याचे नैसर्गिक व्यक्तीमत्व असल्याचे लोकमनात बिंबवून वातावरणात विनोद तरंग निर्माण केले. यावेळी कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांनी आपल्या मिश्किल संभाषण शैलीने सभागृहात साहित्यातील हास्यानंदाची झालर देत सभागृहातील वातावरण प्रफुल्लित ठेवले. राजकारण आणि साहित्य या दुधारी प्रवाहात संचार करतांना धनुभाऊंनी सगळेच राजकारणी साहित्याबद्दल रूक्ष नसतात त्यांच्यात ही सुप्त साहीत्यिकता लपलेली असते हे स्वतःच्या वाणीने पटवून दिले. याच बरोबर पत्रकारातेतील खुबी व समतोलता राखण्याची चोखंदळ अभ्यासुवृत्ती ही सुदर्शन रापतवारकडून घ्यावी हे पटवून देतांना सुदर्शनच्या अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या जुन्या वृत्तांकनाचा दाखला देताना सभागृह हास्यकल्लोळात नेऊन ठेवले. आपल्याला ही साहित्याची जाण आहे. समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याची कला अवगत असल्याची मार्मिक कोपरखळी ही त्यांनी यावेळी मारली. सभागृहातील रसिक, श्रोत्यांना मनमुराद हसवत ठेवत त्यांनी सुदर्शनचे पत्रकारीतेतील व साहित्यातील लेखणीचे तेज अधिकाधिक उजळत राहो हा पण संदेश लोकाभिमुख केला. खासदार सौ‌.रजनीताई पाटील यांनी आपल्या वडिलकीच्या नात्याने सुदर्शनने पत्रकारीतेसह साहित्य लेखनशैली विविधांगाने समृद्ध होण्याचे आशिर्वचन दिले. तर आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी सुदर्शनच्या नेहमीच दिल्या सकारात्मक वार्तालापाचं आणि साहित्यिक योगदानाचं कौतुक केले. या सोबतच अंबाजोगाई परिसरातील मंदिराच्या सुधारणेसाठी मिळिललेल्या शासकीय निधीचा उल्लेख करून अंबाजोगाई शहर अध्यात्म पर्यटनासाठी प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले व सुदर्शनला भविष्यातील नवलेखनासाठी शुभसंकल्प दिले. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मैत्रीच्या धाग्याची विण अधिक घट्ट करीत सुदर्शनच्या लेखणीवर सकारात्मक विचारांचे शुभसंकल्प जनताभिमुख केले आणि भविष्यातील लेखणीला प्रोत्साहन दिले. लेखक सुदर्शन रापतवार यांनी स्वत:च्या लिखाणासंदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या पत्रकारीतेच्या जीवन प्रवाहात अंन्तर्मनात उमलत गेलेल्या साहित्य संस्काराचे हळुवार आकलन केले. आजवरच्या लिखाणावर वाचकांनी आणि स्नेहींनी दिलेल्या उस्फुर्त प्रोत्साहनाने नकळत पडलेल्या या साहित्य पाऊल वाटेचं स्वागत अंबाजोगाईकरांकडून होत असल्याचे ऋण व्यक्त केले. प्रकाशित तीन पुस्तकांचा अंन्तर्मनात दृष्टीक्षेप टाकला असता प्रसिद्ध गजलकार डॉ.मुकुंद राजपंखे, मुक्त पत्रकार अमर हबीब आणि माजी प्राचार्य रंगनाथ तिवारी सर यांचे पुस्तकांच्या मलप्रष्ट्रावरील संक्षिप्त आशिर्वचन, कविवर्य राजेश रेवले यांचे मनोगत याच बरोबर गिरीश रापतवार, पुणे यांची मुखपृष्ठ सजावट हे प्रभावीपणे सृजनशील वाचकांच्या मनावर बिंबणारे असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासारखेच आहे. पुस्तक प्रकाशन पुर्व आलेले मंदिराचे गाव या पुस्तकावर वृतपत्रात छापून आलेले समिक्षण, गोरख शेंद्रे गुरूजींचा मिळालेला सहानुभूती सहयोग, दगडूदादा लोमटे, डॉ.बाबासाहेब ठोंबरे, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार आणि सुदर्शनसह असलेला मॉर्निंग ग्रुप अंबाजोगाई यांची निस्वार्थ साथ हा उल्लेखनिय स्नेहभाव जिव्हाळ्या जपण्याचे व या कार्यक्रमाला यशस्वि होण्याची सुदर्शनला मिळालेली सकारात्मक ऊर्जा असल्याचे मला जाणवले. कनिष्ठ बंधू सुदर्शनला प्रोत्साहन सहयोग देणाऱ्या ज्ञात अज्ञात अशा सर्व योगदात्यांचे मी रापतवार परिवाराकडून आभार मानतो, धन्यवाद देतो. सदरील तिन्ही पुस्तक प्रकाशनाचा संयुक्त सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन व्याख्याते व अंबाजोगाई येथील अनुराग पुस्तकालयाचे संचालक अभिजित जोंधळे यांनी आपल्या रसाळ वाणिमाधुर्याने केले. सुत्रसंचलनाची संक्षिप्त टिपणी द्यावयाची म्हणजे अभिजीतजी आपली रसाळवाणी मनमोहक होती. शब्दाशब्दाने "माध्यम" फुलवित होती. धन्यवाद बंधू प्रेमाचे. आभार प्रदर्शन व कार्यक्रम नियोजनाचे विजय रापतवार यांनी केले. माध्यम प्रकाशन प्रा.लि.अंबाजोगाई यांच्या वतीने व लेखकाच्या वतीने उत्स्फूर्तपणे प्रतिनिधीक स्वरूपात कर्तव्य निभावले. इंजि.आशुतोष रापतवार, इंजि.अनिरूध्द रापतवार, संगीतकार ओंकार रापतवार यांचे नियोजनात चांगलेच योगदान लाभले. गायक बळीराम उपाडे व संचाच्या गायनाचे सांगितिक योगदान, सावरे डेकोरेटर्सचे उत्कृष्ट ध्वनिक्षेपण या प्रकाशन कार्यक्रमात चांगला सहयोग लाभला. साहित्य रसिक, स्नेहींच्या उपस्थितीत हाऊसफुल्ल झालेल्या अंबाजोगाई येथील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात खऱ्या अर्थाने साहित्य दिवाळी व शब्दमाधुर्याची आतिषबाजी होऊन रसिक श्रोत्यांच्या मनात सुदर्शन लिखीत असामान्य, मंदिराचे गांव आणि सहज सुचलं म्हणून या पुस्तकांचा झगमगाट लखलखित होऊन गेला. या पुस्तक प्रकाशनाला आलेल्या पहिल्या रसिक श्रोत्यात डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, डॉ.सौ.सुनिता बिराजदार, कवीवर्य राजेश रेवले, डॉ.दामोदर थोरात (अध्यक्ष फेस्काम मराठवाडा विभाग), रापतवार परीवारातील ज्येष्ठ सदस्य काशिनाथराव रापतवार आणि परिवारातील सर्व सदस्यांसह, प्रा.शरद यन्नावार (छत्रपती संभाजीनगर), नंदकिशोर मग्गीरवार (वसमत), शाम किर्तीवार (नाशिक), लक्ष्मण श्रीरामवार (मुदखेड), अरूण यन्नावार (नांदेड) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याचे साक्षीदार मी स्वत: व पवन रापतवार (पुणे) हे आहोत. बीड येथील प्रा.संजय माकुरवार, प्रा.डॉ.अरविंद रायलवार, इंजि.गणेश पल्लेवार, डॉ.बाबासाहेब ठोंबरे, अधिष्ठाता कृषि महाविद्यालय (लातूर), हरिश्चंद्र वंगे (परळी) यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. लेखक सुदर्शन व आम्हा भावंडांशी आईची माया लावलेल्या बहिणी श्रीमती कमल यन्नावार, श्रीमती सावित्रा श्रीरामवार, श्री व सौ.इंदू तुळशीदास पोटपल्लेवार. श्री व सौ.विद्या नंदकिशोर मग्गीरवार व भाची सपना , श्री व सौ.उज्वला शरद यन्नावार, श्री व सौ.लिला लक्ष्मण श्रीरामवार यांच्यासह श्री व सौ.पूनम दिपक श्रीरामवार, विश्वंभर रापतवार यांनी प्रकाशनास उपस्थित राहून कौटुंबिक साहित्य दिवाळीत आत्मियतेचे चैतन्य आणले. या त्रिगुणात्मक पुस्तक प्रकाशनाने अंबाजोगाई परिसर साहित्यीक सुगंध प्रफुल्लित निश्चितच झाला. या सोबतच अंबाजोगाईचे विविध पत्रकार संघ हे परस्पर जिव्हाळ्याने आणि साहित्यिक, सामाजिक , राजकीय स्थरांतील मान्यवर यांच्यासह शिंपी समाज बांधव, संत नामदेव बी.सी.ग्रुप यांच्या आपुलकीने साक्षीदार झाल्याने या त्रिमुर्ती पुस्तकांच्या माध्यम प्रकाशनाच्या जन्मोत्सवाचे बारसे अधिकाधिक सुदृढतेने रंगतदार झाले हे विशेष होय. यामुळे भोवताल नैसर्गिकपणे "आनंदाचे डोही, आनंद तरंग" अशा लहरीचे सुक्ष्म लहरीचे केंद्र ठरले. सुदर्शन तुझं कौतुक करणे हे शब्दांतीत आहे. जणू कांही तुझ्या शब्द फुलांनी बहरलेल्या वेलींना अधिकाधिक सुगंधित करण्याचा सकारात्मक भाव वडील बंधुच्या अधिकारवाणिने मी राजेंद्र रापतवार हे शब्द सुमन तुझ्या प्रकाशनाला शुभेच्छांसह अर्पीत करीत आहे. या सोबतच माझ्या फेसबुक वाट्सॲप मित्रांसह तुझ्या साहित्याक्षरावर नि:स्सीम प्रेम करणाऱ्या व प्रकाशनास प्रत्यक्ष उपस्थितीत राहिलेल्या बंधु भगिनींचे मनस्वी ह्रद्यस्पर्शी आभार मानत आहे. तसेच या पुस्तक प्रकाशनाला अर्पण करीत असलेल्या शब्दसुमनांच्या ओंजळीला अर्पण करीत असताना विशेष नोंद करण्यासारखी ह्रदयस्पर्शी उपस्थिती होती. ती म्हणजे ओवी रापतवार हिची. माध्यम प्रकाशन प्रा.लि.अंबाजोगाईच्या सुदर्शन रापतवार लिखीत तीन पुस्तक प्रकाशनाच्या केंद्रस्थानी मुख्य आकर्षण ठरली सर्वांत लहान कु.ओवी स्मिता अनिरूद्ध रापतवार अर्थात श्री व सौ.उर्मिला सुदर्शन रापतवार यांची निरागस नात. या गोड नातीसह सुदर्शनच नव्या पुस्तकांचं लेखनाचं नाविण्यपूर्ण लिखाण अधिकाधिक सुदृढ होत राहो, माध्यम प्रकाशनाला स्वत:सह इतरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या नव्या पाऊलवाटांचे ऐश्वर्य प्राप्त होऊन ते अधिकाधिक लोकांपर्यंत जावो हाच रसिक, वाचक, श्रोते व साहीत्यिकांकडून प्रतिनिधीक स्वरूपात शुभसंकल्प.

शुभम भवंतु..!


लेखक - राजेंद्र रापतवार (अंबाजोगाई)

मोबाईल - +91 98509 86765

==================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)