बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्रात १५० जागा लढविणार - ऍड.(डॉ.) सुरेश माने
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी महाराष्ट्रात १५० जागा लढविणार आहे अशी माहिती बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.(डॉ.) सुरेश माने यांनी दिली आहे.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात ऍड.(डॉ.) सुरेश माने यांनी नमूद केले आहे की, आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात राज्यातील महाविकास आघाडी पक्ष व नेते यांच्या ताठर व स्वयंकेंद्रित भुमिकेमुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपाला व पर्यायाने संघिय विचारसरणीला सत्तेत स्थान मिळू द्यायचे नाही अशी वैचारिक व संघर्षात्मक भूमिका असून देखील राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी (पवार) व उबाठा यांच्या नकारात्मक भुमिकेमुळे अनेक आंबेडकरवादी, समाजवादी व डाव्या पक्षांची कुचंबना होत असून त्यांचे स्वतंत्र व धोरणात्मक राजकारण हे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. मात्र सत्तेचे सोपान सोपे व्हावे याचसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) किंवा उबाठा मध्ये जी भाजपा किंवा शिंदे शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्या पक्षातून जी आयात होत आहे. ती म्हणजे ज्यांनी आजपर्यंत भाजपाचे राजकारण जिवंत ठेवले त्यांना जिवंत करणे होय हे म्हणजे कालपर्यंतच्या भाजपातील नेत्यांचे महाविकास आघाडी तर्फे पुनर्वसन होय, मग जे कालपर्यंत भाजपात जातीयवादी म्हणून ओळखले गेले ते महाविकास आघाडीत पुरोगामी कसे ठरतात हा खरा सवाल आहेच, परंतू यातून राज्यात कोणत्याही परिस्थितीत महायुती व महाविकास आघाडी दोन्हीचे सत्ता हेच ध्येय असून वैचारिक संघर्ष किंवा धर्मनिरपेक्षतेचे राजकारण म्हणजे चेहरा झाकण्यासाठी वापरलेला बुरखाच वाटतो ही बाब अत्यंत निषेधार्ह होय. महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना राज्यातील आंबेडकरी, डावे, समाजवादी पक्षांचे राजकारणच मुळी नकोसे आहे. मात्र काँग्रेस भाजपा व्यतिरिक्त स्वतंत्र बाण्याचे फुले - शाहू - आंबेडकरी परिवर्तनाचे राजकारण महाराष्ट्रामध्ये मजबूत झालेच पाहीजे ही आमची ठाम भुमिका आहे आणि याच भूमिकेतून महाराष्ट्रात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने स्वबळावर १५० विधानसभा जागांवर लढण्याचे निश्चित केले असून इतरही फुले-आंबेडकरी, डावे व समाजवादी पक्षांचे सहकार्य घेणे व त्यांना देणे या दोन्ही बाबींचा निर्णय राज्याच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या नागपूर व मुंबईत संपन्न झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आलेला आहे. याशिवाय राज्यात संविधानात्मक आरक्षणाचे राजकारण करून राज्यातील जाती-धर्मात वैमनस्य निर्माण करणारे राजकारण, राजकारणी व त्यांचे पक्ष यांचेही या निवडणूकीत सुज्ञ जनतेने पानिपत करावे असे पक्षातर्फे ठराव करण्यात आलेला आहे. राज्याचा समतोल विकास, शोषणमुक्त समाज, भुमिहिनांना जमीन वाटप, प्रत्येक कुटूंबात कमीत कमी एक सरकारी नौकरी, अतिमागास समाजघटकांना विशेष घटक योजना, शेतक-यांना मोफत विज, पेन्शन योजना, सरकारी नौकर भरती, पदोन्नती आरक्षण, ओबीसी जनगणना, आदिवासींच्या डिलीस्टींगला विरोध अशा अनेकविध महत्वपूर्ण मुद्यांवर राज्यात बीआरएसपी निवडणूक लढविणार आहे आणि याबाबत पक्षातर्फे लवकरच निवडणूक जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे. याशिवाय, भारतीय राज्यघटना, लोकशाहीला मारक सर्वच पक्षांना राज्यातील मतदारांनी पराभूत करावे असे पक्षातर्फे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात अजूनही व्यापक समाजपाया आधारीत राजकारण व निवडणूका लढविण्याची संधी महाविकास आघाडीचे पक्ष व नेत्यांकडे आहे, आणि आमच्या सारख्या अनेक परिवर्तनवादी राजकीय पक्ष संघटनांना भाजपा व त्याचे मित्र पक्ष या बद्दल पराकोटीची कटूता आहे, विरोध आहे. परंतू, एवढ्या एकाच मुद्दामुळे महाविकास आघाडी पक्ष आणि नेते यांनी इतर लहान-सहान पक्षांना गृहीत धरण्याची चूक करू नये. कारण, लोकसभेत शंभर टक्के यशस्वी ठरलेले संविधान बचाव, लोकतंत्र बचाव सारखे राष्ट्रीय मुद्दे विधानसभा निवडणूकीत मदतीला येणार नाहीत हे समजून घेऊन हरियाणा राज्यातील विधानसभेच्या निकाला-पासून महाविकास आघाडी पक्ष व नेते यांनी जरूर बोध घ्यावा असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.(डॉ.) सुरेश माने, राज्यसचिव ऍड.माणिक आदमाने यांच्या वतीने करण्यात येत आहे.
===================================
Comments
Post a Comment