मुद्रांक विक्रेत्यांनो जनतेची आर्थिक लूट करू नका - अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा

मुद्रांक विक्रेत्यांनो जनतेची आर्थिक लूट करू नका - अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा इशारा 

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

==================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवा अशी मागणी जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण यांनी केली आहे. याप्रश्नी तात्काळ लक्ष वेधून घेत उपविभागीय अधिकाऱ्यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने सोमवार, दिनांक 7 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले.

याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण (बीड) यांनी सांगितले की, आम्ही सोमवार, दिनांक 7 ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाने नुकतेच 2024 मध्ये 100/- रूपयाचे मुद्रांक (बॉण्ड) बंद करून 500/- रूपयांचे मुद्रांक (बॉण्ड) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर दैनंदिन जीवनामध्ये मुद्रांक (बॉण्ड) चा उपयोग हा न्यायालय, कचेरी, रजिस्ट्री ऑफिस, तहसील कार्यालय, शैक्षणिक कार्यपद्धती व वेगवेगळी शपथपत्रे तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होतो. आजपर्यंत 100 चा मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून हा नियमबाह्य पद्धतीने 110/- रूपयाला विकला जात आहे. आता 500/- रूपयांचा मुद्रांक (बॉण्ड) देखील 550/- रूपयाला नियमबाह्य पद्धतीने विकला जातोय, परिणामी एका मुद्रांकामागे शासन 400/- रूपये तर मुद्रांक (बॉण्ड) विक्रेत्यांकडून अधिकचे 50/- रूपये असे एकूण मिळून 450/- रूपये मोजावे लागणार आहेत. हि वाढ तब्बल पाचपट आहे. मंत्रिमंडळाच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य माणसाला आर्थिक झळ स्वरूपात बसणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांची खूप मोठी आर्थिक लूट होत आहे. तरी राज्य सरकारने 100/- रूपयांचा बॉण्ड व 500/- रूपयांचा बॉण्ड यांची अधिकृत जी किंमत असेल ती जाहीर करून बॉण्ड विक्रेत्यांना शासनमान्य दरानुसारच विकण्यास बंधनकारक करावे, अन्यथा जे बॉण्ड विक्रेते शासन निर्णयांची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा बॉण्ड विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करावेत व सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट तात्काळ थांबवावी, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी जाचक ठरणारा हा तुघलकी निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी विनंती ही सदरील निवेदनातून करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण आणि लहुजी शिंदे, पांडुरंग देशमुख, विजय चव्हाण, ओम चव्हाण, शेख अकबर, सुधार उफाडे, दादाहरी केकाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

====================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)