घर, गणगोत आणि शेतीच्या ऋणानुबंधाला बांधुन ठेवणाऱ्या भाऊसाहेब कोंडीबा शिंदे गित्तेकर या एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट..! - लेखक प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे



घर, गणगोत आणि शेतीच्या ऋणानुबंधाला बांधुन ठेवणाऱ्या भाऊसाहेब कोंडीबा शिंदे गित्तेकर या एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट..! - लेखक प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे

==================================

"चंदन अत्तर कस्तुरीचा सत्कार असो सन्मान असो

त्यांच्या चरणी ओंजळ भरूनी हे गजलेचे श्वास नवे..!"

(वटवृक्षासारखं दिर्घायुष्यी सावलीचं घर देणाऱ्या स्थीर झाडाची भूमिका बजावत पशु-पक्षी-मनुष्याला कवेत घेत जगत रहाणं तसं सोपं नसतं. परंतू, निसर्ग शिकवतो. गित्ता, (ता.अंबाजोगाई) येथील सज्जन सद्गृहस्थ भाऊसाहेब कोंडीबा शिंदे यांच्या सत्शील आयुष्याची अखेर ९० व्या वर्षी रहात्या घरी अंबाजोगाई येथे झाली. ढिगभर गणगोतांच्या गराड्यात आणि शेतीमातीचा सुगंध अनुभवत त्यांनी आपली कारकिर्द मोठ्या आनंदात काढली. शिवी कधी जिभेवर न उगलेला सभ्य सद्गृहस्थ म्हणून गावक-यांनी त्यांना कायम इज्जत दिली, आदर केला. जी त्यांनी आपल्या चारित्र्यसंपन्न आयुष्याचा अभिन्न अंग म्हणून कमावलेली होती. अंबाजोगाई येथील खडकपुऱ्यावर त्यांचं पिढ्यान् पिढ्याचं राजकारणात मुरलेलं गब्बर गणगोत असताना ही त्यांना राजकारणानं साधंही शिवलं नाही. सामोपचारानं प्रश्नांची उकल करून जगणं वहातं ठेवणं एवढंच माहित असल्यानं 'दाम,दंड आणि भिती' या राजकारणातल्या तीन गोष्टींचा आणि त्यांचा कधी दुरान्वयेही संपर्क आला नाही. त्यामुळं आयुष्यभर गावक-यांशी, गणगोताशी कसलीच किरकिर नसणं, ही त्यांची मोठी अपलब्धी आहे. सात्विक, सज्जन मनुष्य म्हणून गणगोतात आणि गावातही नांवलौकीक कमावलेले गित्ता (ता.अंबाजोगाई) चे वंदनीय भाऊसाहेब आण्णा अर्थात भाऊसाहेब कोंडीबा शिंदे यांनी ३० ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची तेरवी होते आहे, त्यानिमित्त मूळ गाव गित्ता येथीलच परंतू, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जेष्ठ गजलकार डॉ मुकुंद राजपंखे यांनी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील सलोखा खालावत जाणाऱ्या काळात एका सज्जन सद्गृहस्थांच्या खऱ्या खुऱ्या थोर आयुष्यावर उजेड टाकण्याचा प्रयत्न केला आहे. घर, गणगोत आणि गावाला बांधुन ठेवणाऱ्या एका सामान्य माणसाकी असामान्य गोष्ट सांगीतली आहे.) ती आम्ही लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्याच्या संपूर्ण वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत...

====================================

■ सामान्य माणसातलं असामान्य मनुष्य म्हणावं इतकं नादर आयुष्य जगलेल्या भावसाब आण्णांच्या जाण्याची वार्ता अंबाजोगाईचे जेष्ठ साहित्यिक दगडुदादा लोमटे यांनी अंबाजोगाईच्या ११ व्या साहित्य संमेलनाच्या ग्रुपवर टाकलेली छोटीशी वॉट्सअप पोस्ट वाचली आणि स्वाभाविकपणे वाईट वाटलं. आण्णा आमचे सेवानिवृत्त जेष्ठ सहकारी आणि गांवकरी माजी उपप्राचार्य आणि प्रसिद्ध कवी भगवानराव शिंदे सरांचे आदरणीय वडील. पांढरं शुभ्र धोतर, खमीस, टोपी आणि बूट घातलेला आण्णांचा सात्विक चेहरा माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. सात्विक, सज्जन मनुष्य म्हणून गणगोतात आणि गावात नांवलौकीक कमावलेले गित्त्याचे वंदनीय भाऊसाहेब आण्णा कोंडीबा शिंदे यांनी वयाच्या ९० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आण्णांच्या समग्र आयुष्याच्या संदर्भानं मराठी भाषेचे कवी निकुंबांच्या 'चंदन' कवितेची आठवण झाली.

" माझ्या चंदनी खोडाचा मंत्र झिजणे झिजणे

  उणे लिंपायाला माझे आले सुगंधाचे लेणे.

  झीज केशरी तयांची तप्त जिवा ऊटी

  आत उमले भावना शांत शितल गोमटी. "

हे असं चंदनासारखं दरवळणारं सुखी आयुष्य जगलेल्या आण्णांच्या संदर्भानं मन भावनांनी भरून गेलं.

■ 'भाऊसाहेब' या मूळ नांवाचं 'भावसाहेब', 'भावसाब' असा आपुलकीचा अपभ्रंश होऊन अखेर 'भाऊसाब आण्णा' असं स्थिरावलेलं नांव. भाऊसाब आण्णांच्या गोड सज्जन स्वभावामुळं ते गित्याला आपले वाटणारे मनुष्य होते. नव्वद वर्षांचं आदरणीय आयुष्य जगलेले भाऊसाहेब कोंडीबा शिंदे हे आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य भगवानराव शिंदे सरांचे वडील. अंबाजोगाई येथीलच शासकीय कृषी विद्यालयात कार्यरत असलेले प्रा.शामराव शिंदे हे भाऊसाब आण्णांचे धाकटे चिरंजीव. अंबाजोगाईतच खडकपुऱ्यावर असलेल्या स्व.विधिज्ञ अण्णासाहेब लोमटे यांना आण्णांची मुलगी सुनंदाताई दिली आहे, स्व.विधीज्ञ अण्णासाहेब लोमटे त्यांचे जावाई होते. अण्णांचं चौथं अपत्य अनिताताई धामणगाव येथील बालासाहेब भोसले यांच्या श्रीमती आहेत. भावसाब आण्णांची सासरवाडी धानोरा कंपनी, त्यामुळं आमच्या प्रा.भगवानराव व प्रा.शामराव सरांना भाच्चे कंपनी म्हणून मोठा मानसन्मान मिळाला. आण्णांचे मामा म्हणजे बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्ह्याचे लोकप्रिय नेते कै.भगवानराव बापू लोमटे यांचे वडील. या नात्यानं बापू आमच्या आण्णाच्या मामांचे चिरंजीव म्हणजे मेहुणे होत, शिंदे सरांचे मामा आणि मग राजाभाऊ, सतीषनाना, दगडूदादा ही मंडळी मामांची मुलं होत, शिंदे सरांचे मेहुणे. खडकपुरा आणि गित्ता हे मोठ्या आताड्यात गुताडा असलेले गावं आहेत. लोमटे आणि शिंदे यांच्या अर्ध्या अधिक सोयरिकी आपापसातल्याच आहेत. दिवाळीत करदुड्यांचा गुताडा व्हावा तसा गित्याच्या शिंदे कंपनींचा आणि अंबाजोगाईच्या लोमटे कंपनींचा आहे.

■ भाऊसाब आण्णा कोंडीबा बाबांच्या तीन मुलांपैकी थोरले. गित्ता गांवचे रूबाबदार सरपंच म्हणून गाजलेली कारकिर्द राहिलेले राजसाब बापू दुसरे आणि तरूणपणीच या जगाचा निरोप घेतलेले उत्तम तात्या हे तिसरे भाऊ. गित्याला सगळ्यांचे मोठे वाडे, गायवाडे आणि सुपीक रानं आहेत. सगळ्यांची मुलं व मुली हे सुशिक्षीत आहेत. नौक-या आणि शेतीबाडी मध्ये रमले आहेत. सगळेजण अंबाजोगाईला हल्ली स्थायिक झालेले आहेत आणि जाऊन येऊन शेती पहातात. दुधाचे कॅंडं घेऊन सायंकाळी अंबाजोगाईला घरी येतात. गित्यातले सगळ्यांचे घरं शेतीमालाच्या गोडाऊनचं काम करतात.

■ आमच्या गित्ता गावचे मार्गदर्शक आदरणीय भगवानराव (बप्पा) शिंदे हे भाऊसाब अण्णांचे चुलत भाऊ, ज्यांची सासरवाडीही खडकपुऱ्यावरीलच. कल्याणराव लोमटे बापूंचे आजोबा शामरावजी यांची मुलगी बप्पांना दिली आहे आणि परत भगवानराव बप्पांची मुलगी अंजलीताई यांचा विवाह ही आमचे जेष्ठ मित्र आणि योगेश्वरी महाविद्यालयाचे विद्यार्थीप्रिय क्रिडा विभागाचे सेवानिवृत्त प्रा.कमलाकर लोमटे सरांशी झालेला आहे. कमलाकर सरांची आई गजराआक्का या आमच्या भाऊसाब आण्णांच्या थोरल्या बहीण. त्यामुळं प्रा.कमलाकर सर आणि त्यांचे भावंडं हे आमच्या भगवानराव शिंदे सरांच्या आत्याचे मुलं आहेत. बस स्टँडच्या बाजूला पूर्वी रिगल कट्टा म्हणून सुप्रसिद्ध असलेली भगवानराव बापूंनी गाजवलेली अंबाजोगाईकरांची बैठक जी हल्ली गजराआईंच्या नावानं दिमाखात उभी आहे, ती आमच्या भाऊसाब आण्णांच्या बहिनीची आहे. या सगळ्या नात्यानं अंबाजोगाईच्या भगवानराव बापू लोमटे आणि सेवानिवृत्त प्रा.कमलाकर लोमटे या लोमटे कंपनीचं आजोळ आमचं गाव गित्ता आहे. या नाते संबंधात आमच्या सेवानिवृत्त उपप्राचार्य भगवानराव शिंदे सरांची सासरवाडी ही खडकपुऱ्यावरीलच. कै.बालूतात्या लोमटेंची एकुलती एक कन्या ही भगवानराव सरांना दिली आहे. बबनरावभैय्या, कै.सुनिलकाका, महेशराव, दिनेशराव आणि रणजित चाचा लोमटे ही बालूतात्यांची मुलं भगवानराव सरांचे मंडळीच्या, अर्थात सौभाग्यवतींच्या बाजूने मेहुणे कंपनी आहेत.

■ आम्ही एकाच गांवचे असल्यामुळं भगवानराव सरांकडं कधी गावी, शेतात किंवा घरी गेलो. तर आवर्जून माझ्या आई-वडीलांच्या प्रकृतीची चौकशी करणारे भाऊसाबआण्णा मागच्या एक वर्षापासून वार्धक्यामुळं घरीच आराम करीत होते. कांही दुखलं तर फॅमिली डॉ.शुभदा लोहिया मॅडमची व्हीजीट असायची नेहमीच. भगवानराव आणि शामराव ह्या दोन मुलांनी आणि अर्थातच बहिनींनी आण्णाला आणि आईंना तळहाताच्या फोडासारखं सांभाळलं. त्या शिवाय का नव्वदी पर्यंत जावू शकेल एखादा बुजुर्ग मनुष्य. वयोमानानुसार मनसाचं थकणं स्वाभाविक आहे. सात-आठ वर्षांपुर्वी सरांच्या आईंचं जाणं झालं आणि आण्णांच्या आयुष्याला असलेली आत्मिक आणि अध्यात्मिक सहजीवनीची सुखद सोबत गेली. घरात नातरूंडा - पतरूंडांच्या गराड्यात आण्णांचा वार्धक्याचा काळ तसा फार आनंदात गेला. भगवानराव सरांच्या मुली आणि शामराव सरांचे दोनही लेकरांनी, झिंकू आणि त्याच्या भावंडांनी आजोबांना कायम आनंदी ठेवलं.

■ आण्णा स्पष्टवक्ते सरळ बोलून मोकळं व्हायचे. आडपडद्याचं बोलणं त्यांना कधी जमलंच नाही. ही त्यांची एकवाक्यता सर्वश्रुत होती. सकाळी पायी चालत खडकपुऱ्याची एक बाजू धरली तर दुसरी बाजू निघायला सायंकाळ व्हायची. एवढ्या मोठ्या आभाळभर गणगोतात आण्णांची नव्वदी कधी आणि कशी आनंदात निघाली, हे कळालं सुद्धा नाही कोणाला. कधीच कुण्या सुनेची कसली तक्रार न केलेला मायाळू सासरा, प्रेमळ बाप आणि अतिशय मायाळू आजोबा त्यांच्या ठायी मुक्कामाला होता. खडकपुऱ्याचं लाडकं गणगोत ही त्यांना अत्यंत आदरानं वागवायचं.

 "कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 

   तयाचा हरीक वाटे देवा..!"

या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे दोनही कर्तुत्ववान प्राध्यापक मुलं आणि कर्तृत्ववान जावाई लाभणं ही खरोखर आनंदाची गाेष्ट आण्णांच्या आयुष्यात चिरकाल टिकून राहिली. प्रचंड समजूतदार आणि संयमी लेकरं असणं खरं तर हीच खरी संपत्ती आण्णांजवळ होती. आण्णांनी अथवा अण्णांच्या स़दर्भानं गावात कधी भांडणं झाल्याचा, अण्णांनी केल्याचा उल्लेख कधी कानावर आलं नाही. बर्दापूर अथवा अंबाजोगाई पोलीस स्टेशनला कुठल्याच कारणानं एकही एफ.आय.आर.नसलेले आण्णा कधी धुऱ्या बांधावरून, चिंचा अथवा आंबा तोडला म्हणून कुणाला शिवीगाळ केल्याचा इतिहास त्यांच्या नांवे नाही. नंतर तोच इतिहास त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी आपल्या निर्मळ वर्तनातून जीवंत ठेवला. आण्णा असतानाच दोनही भावंडांनी शेतांची वाटणी कधी केली आणि वेगवेगळी भव्य-दिव्य घरं कधी बांधली गावात या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. शेतात कामाला असलेले गडी असोत नाही. तर आडप झडप कामांसाठी शेतीवर कामाला येणाऱ्या माय माऊल्यांनी लेकीबाळींचं आदरातिथ्य अण्णाभाऊंकडून अनुभवल्याचा इतिहास आहे. माझे थोरले चुलते जीवनराव आण्णा आणि भावसाब आण्णांचं वय जवळ-जवळ सारखंच आहे, नव्वदीच्या आसपास, वर्षा सहा महिन्यांचा फरक असेल. 'शंकू कसाय रं ?' म्हणून माझ्या वडीलांची आवर्जून चौकशी करणा-या आण्णांंना माझा आणि भगवानराव सरांचा, आम्ही दोघंही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचा मोठं कौतुक वाटायचं, अभिमान वाटायचा.

■  दि.३० ऑगस्ट २०२४ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी सायंकाळी पाचच्या दरम्यान अण्णांनी देह ठेवला. यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगलेल्या आण्णांना अंबाजोगाई आणि परीसरातील भजनी मंडळींनी आदरांजली वाहिली. अण्णा माळकरी नव्हते. परंतू, वर्तनात साधू संतांच्या विचारांचा दरवळ होता. अंबाजोगाईतील बोरूळ तळ्याच्या काठावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मी आम्हां यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथील प्राध्यापक बांधवांच्या वतीने, आम्हा गित्तेकरांच्या वतीने, अंबाजोगाईतील साहित्यिक वर्तूळ आणि व्यक्तिश: राजपंखे कुटुंबियांच्या वतीने आमच्या भाऊसाब आण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना माझ्याच एका गजलेच्या शेरानं असं म्हणेन...

"चंदन अत्तर कस्तुरीचा सत्कार असो सन्मान असो

त्यांच्या चरणी ओंजळ भरुनी हे गजलेचे श्वास नवे !"


▪ प्रा.डॉ.मुकुंद शंकरराव राजपंखे

(पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन इंग्रजी विभाग प्रमुख) 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, अंबाजोगाई.

मो. 9881294226


*(टिप - सदरील लेखात व्यक्त केलेली मते व विचार हे लेखकाची स्वतःची मते व विचार आहेत. लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी, विचारांशी, संदर्भाशी संपादक सहमत असतीलच असे नाही. - संपादक, लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क, महाराष्ट्र राज्य.)


==================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)