जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)
जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज
लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सावळे परब्रम्ह श्रीहरि विठ्ठल भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवन प्रवासावर वाचन, श्रवण व मनन चिंतनातून साकारलेल्या साहित्याचे संक्षिप्त रसग्रहण, समिक्षणाचे शब्दांकन ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार यांनी नेमक्या शब्दांत केले आहे. ते वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संत शिरोमणी नामदेव महाराज हे जातीभेद न मानणारे संत होते. जनाबाई सारख्या सामान्य कुटुंबातील महिलेला त्यांनी आश्रय दिला. कुटुंब सदस्याप्रमाणे सन्मान ही दिला. जनाबाईंच्या अंगी असलेल्या भक्ति रचनेच्या ओढीला अधोरेखित करून त्यांना शिष्यत्व ही बहाल केले. या सत्संगामुळे त्या संत जनाबाई म्हणून पुढे ओळखल्या गेल्या. ईश साधनेच्या शिव आणि विष्णू भक्तांतील दुरावा त्यांनी नाहिसा करून हरहर व सांब भक्तीत एकसंघ केले. पंजाब शिख बांधवांना ही भगवद् भक्तीत समरस केले. जातीभेदाला तिलांजली देतांना, जनमानसांत समता बिंबवताना संत नामदेवांनी आपल्या शिंपी जाती विषयी निसंकोच अभिमान बाळगला. शिंपीयाचे कुळा जन्म माझा झाला | परि हेतु गुंतला सदाशिवी || या अभंगाद्वारे आपल्या कुळाचे वास्तव्य विश्वाला सांगितले. जातीजमाती वरून माणसाची पारख करू नये, जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वास पूर्वक सांगताना त्यांनी या संदर्भात खालील अभंग रचना अर्पण केली.
कुश्चल भूमीवर उगवली तुलसी
अपवित्र तियेसी म्हणोनये
कागविष्टेमाजि जन्मे तो पिंपळ
तया अमंगळ म्हणोनये।।
दासीचिया पुत्रा राज्यपद आले |
उपमा मागील देवू नये
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी |
उपमा जातीची देवु नये।।
असा सामाजिक सलोखा समृद्ध करणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी आपल्या
नाचू किर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावूं जगी || या अभंगाद्वारे जगाला ज्ञानदानाने निरंतर प्रफुल्ल चैतन्यात ठेवले.
श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज जीवन चिंतन :
श्री विठ्ठलाचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म दि.26 ऑक्टोबर 1270 इ.स.मध्ये गोणाई दामासेठ शिंपी या हरिभक्ता पोटी नरसी बामणी/नर्सी नामदेव (जि.हिंगोली) येथे झाला. श्री विठ्ठलाला केलेल्या नवसाने हा झालेला जन्म असे श्रध्देय मानतात. भक्तीविजय मध्ये भागिरथी नदी शिंपल्यात गोणाई-दामाजीस संत नामदेव सापडल्याचा उल्लेख आढळतो. शिंपी जात व शिंपला या नामसदृष्यामुळे सापडलेली ही कल्पना असल्याचे संत संशोधकांच मत आहे. भगवद् भक्ति कुळात जन्मलेल्या नामदेवाच्या मनी उपजतच विठ्ठल भक्ती व नामछंद जोपासला. वयाच्या पाचव्या वर्षीच नामदेव हस्ते भगवंतानीने प्रसाद स्विकारुन पुढे नागनाथांनी पंढरपूरला जाण्याचा दृष्टांत दिला. या दरम्यान वयाच्या अकराव्या वर्षीच नामदेव राजाई गोविंदशेट्टी सदावर्तेशी विवाह संपन्न झाला. त्यांच मन शिवणकाम व संसार कामात रमलं नाही. नागनाथ दृष्टांत आधार घेत ते यात्रेकरू सहित पंढरपूला पोहोचले. हाती चिपळ्या व मुखी विठ्ठल नाम घेवून विठ्ठलमंदिर वावरीत नित्यभजनाने त्यांची विठ्ठल नाम गोडी वाढतच गेली. यामुळे दामासेठ सहकुटुंब गंगाखेडहून जनाईंना सोबत घेवून पंढरपूरला आले. गृह हट्टापाई ते संसारात रमले त्यांनाचार मुले व एक कन्या झाली. त्यावेळी आई-वडीलांसह त्यांचे पंधरा जणांचे एकत्र कुटुंब होते. पुढे पून्हा संसाराकडे दुर्लक्ष करून त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटी भक्ती संसाराचा विस्तार वाढवला. घरकामासाठी आलेली, नामदेवांना अंगाखांद्यावर गंगाखेडच्या जनाईने पालना केली. या जनाबाईच्या अंगी असलेल्या भक्तिरचनेच्या ओढीला अधोरेखित करून संत नामदेवांनी जनाबाईला शिष्यत्व बहाल केले. विठ्ठलभक्त नामदेवाचे दास्यत्व स्विकारलेली, संतसत्संगात वावरलेलीही गंगाखेडची जनाईंची संत जनाबाई झाली. असा जातीभेद न मानणारे समाजाभिमुख संत नामदेव घडत गेले. पुढे नामभक्तीच्या शक्तीउर्जेने त्यांने अनेक चमत्कार घढवले. संत नामदेव हे तेराव्या शतकातील पहिले / संत, मराठी अभंगाचे जनक, भगवंतांच्या "विठ्ठल नांवाचे प्रभावी प्रसिद्धी प्रमुख, संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्म प्रचाराचा वसा दिलेले व सावळया परब्रम्हाचे लाडकेसंत होते. नामदेव व भगवंतांचा परस्पर जिव्हाळा अतुट होता, त्यांना प्रत्यक्ष भेटल्या शिवाय चैन पडत नसे. भगवंतांना आपलेसे करण्याचे सामर्थ असलेल्या नामदेवाने आपली जीवनयात्रा भगवंताच्या प्रचारार्थ समर्पित केली. संत ज्ञानदेव, नामदेव,एकनाथ व तुकाराम हे भागवत धर्माचे महत्वाचे खांब होते. त्यातील वारकरी संप्रदायाच्या मजबूत शक्तीही संत नामदेवांचीच होती हे सर्वमान्य आहे. माणसांच्या मनाच्या जडण- घडण,पोषणासह मानसांचे एकटेपण दूर करून समाज सुधारण्याचे काम त्यांनी केले. तत्कालीन संतसत्संगात सहा - सात वर्ष त्यांनी पंढरपूर-आळंदी हा महाराष्ट्राचा पट्टा संत नामदेवांचे किर्तन व ज्ञानदेवाचे प्रवचनाने दुमदुमून निघाला. संत जनाबाई यांच्या मते ज्ञानदेव हेच पाया व नामदेवांनी केलेला भक्तिचा विस्तार हाच भागवत धर्माचा खरा आत्मा आहे. भागवतधर्म प्रचारार्थ तिर्थयात्रेला जाण्यासाठी संत ज्ञानदेव पंढरपूरला आले. भक्तांचा सुखी गोतावळा असलेल्या अनुभवी नामदेवास पतितांचा उद्धार करणेसाठी सोबत चलन्याची विनवनी केली.कैवल्य सुखाची जाण असणाऱ्या नामदेवाने विठ्ठठलाच्या परवाणगी घेण्यास सांगितले. ज्ञानदेवाच्या सत्संगात नामदेवाच्या ज्ञानात भर पडेल या सकारात्मकतेतून क्षणभर ही नजरेआड होऊ न देणाऱ्या नामदेवास या प्रचार मोहिमेतील तिर्थयात्रा करण्यास अत्यंत विश्वासाने ज्ञानदेवाच्या स्वाधिन केले. पंढरपूरहून सुरू झालेला हा ज्ञान-नाम अध्यात्म प्रवास. संत ज्ञानेश्वरांचे आत्मशोध, प्रवचनात प्राविण्य संत शिरोमणी नामदेवाचे चित्त विठ्ठलव्याप्त किर्तनात निष्णांत. अशा या ज्ञान-नाम दुथडीने वाहणाऱ्या भक्तीरसात पर्यटनाच्या सानिध्यात आलेले भक्त व श्रोतेजन ज्ञानगंगेच्या संगमात अध्यात्मज्ञानाने पावन होत असत. या प्रवासात संत नामदेवांनी ज्ञानदेवाला भक्तीच्या रहस्याचा उलगडा करताना निस्वार्थ भजन करावे भक्ती विना कर्म व धर्म व्यर्थ आहे यासह नवविध भक्तीचे महत्व पटवून देवून प्रसन्नचित्य केले. या वेळपर्यन्त त्यांचे सोमनाथ, प्रयास, अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवंतिका या सप्ततिर्थांचे दर्शन झाले होते. पुढील प्रवासात मारवाडजी जवळील "कोलादजी" गावी तहानेने व्याकुळ झाल्याने योगी लधिमा सिद्धीने सुक्ष्म होऊन खोलकुपातील पाणी पिवून आले. याचवेळी नामदेवाने विठु-रखूमाईचा धावा करून सुक्ष्म झरा पुर्नरूज्जीवीत करून त्या विहरीत तुडुंब पाणी भरवले. हा सर्वांप्रती कल्याण भावनेचा आदर ओम म्हणून आजही ही हे जलस्त्रोत "नामदेव कुप" म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे यथाशास्र तिर्थ विधी नंतर औंढे नागनाथ सभामंडपात किर्तनास उभे राहिले परंतु, तेथिल शंकर भक्तांनी विष्णू नाम घेण्यास विरोध केला. हरि व हर भक्ती भेद नसावा या भावनेने श्रोत्यांनी देवळाच्या मागील बाजूने संत नामदेवांचे किर्तन आयोजीत केले. त्या शिवरात्रीच्या दिवशी आपल्या भक्तांचे किर्तन ऐकण्यासाठी भगवंताने पूर्वाभिमुख देवूळ पश्चिमेकडे फिरवले. संत नामदेव बाल किर्तनकार म्हनूण इथेच नांवारूपास आले. नामदेवांना देव प्रत्यक्ष बोलतो. याचा सात्विक अभिमान होता. यासाठी ज्ञानदेवांनी संत सभा भरवून वयस्कर संत गोरा कुंभार यांचे परिक्षणातून नामदेवांचे पक्केपण कोरेच ठरवले. अपमानीत नामदेवराय विठ्ठलाकडे गेले असता परत औंढे नागनाथ येथील विसोबा खेचर यांना गुरू करून घेण्याची आज्ञा दिली. संत नामदेव सत्वपरीक्षेत न उतरल्याने ब्रम्हभाव व जीवभाव नाहिसे करून त्यास ब्रम्हरूप देण्याचा उपदेश दिला. यामुळे नामदेवांचा अंतरिक अहंकार व गर्व नाहिसा झाला. असे या औंढे नागनाथ येथे नामदेव जीवनातील महत्वांच्या घटनेचा त्रिवेणी संगम झाल्याचा योगायोग आहे. ज्ञान-नाम सत्संगाच्या या तीर्थ यात्रा नंतर भगवंतांनी ज्ञानदेवास संतमेळा घेवून सर्वांना उपदेश देण्याचे सांगितले. तिर्थाटनातील नामदेवाच्या सुसंवादाचा दाखला देत ज्ञानदेवाने चराचर विश्व व भगवंत एकरूप आहेत. ज्ञान व भक्ती, प्रवचन व किर्तन भगवंत प्राप्तीचे मार्ग आहेत म्हनुण निसंकोच संतास शरण जाण्याचा उपदेश देवून भक्तांच्या मनातील संभ्रम दुर केला. या तिर्थावळीत ब्राम्हण वेशात प्रत्यक्ष पांडुरंगाने सर्व संत, ब्राम्हण व भक्तांना महाप्रसादाचे भोजन दिले. या तिर्थाटनात अनेक अभंग, रचना झाल्या परत आळंदीस जावून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचना पुर्ण केली. बाल इर्षेने अधीन झालेल्या लोकांनी सुडबुद्धीने ज्ञानदेव बंधुंना सवर्ण ब्राम्हण मानण्यास नकार दिला. या मुळे ज्ञानदेवांनी कार्तिक वद्द त्रेयोदशीला आळंदी येथील सिद्धेश्वर मंदिरातील नंदी खालील विवरात संजीवनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. या निर्ययाने नामदेव दु:खी झाले. चिर विरहाने दु:खी नामदेवांवरच ज्ञानदेव समाधी सोहळयाची जबाबदारी सोपविण्यात आली. आजही त्या जागेवर आजान वृक्ष आहे. समाधीवर शीळा झाकताना फुले वाहताना नामा म्हणे आता लोपला दिनकर | बाप ज्ञानेश्वर समाधिस्त || हे ह्रदयस्पर्शी भावोद्गार काढले. आता ज्ञानेश्वर दृष्टीपथात नसल्याने केशवाची पंढरी सोडून दूर जाण्याचा आणि जाईन तिथे नेईन पंढरी व तीथे संत नगरी भरवीन ही प्रतीज्ञा केली. त्यांनी ईश्वरीय संकेतानुसार परत उत्तर भारतात प्रवास करीत पंजाब प्रदेशात स्थिरावले. तीथे त्यांनी संत मंडळ स्थापन केले व त्या सहवासात पंढरी उभारण्याचे स्वप्न ही पुर्ण केले. जनसाखी या पंजाबी ग्रंथात नामदेव चरित्र आहे. पहिला प्रवास प्रत्येक्ष ज्ञानदेवासह व दुसरा त्यांच्या ज्ञानासह नामदेवांचा प्रवास झाला. पंढरपूर पासून पंजाब पर्यंत भक्ती पंथांची ध्वजा यशस्वीपणे अंमलात आणली. महाराष्ट्रातील नामदेवांना शीख संप्रदायाने सह्रद्य स्वीकारले. गोदावरी, तापी, नर्मदा नदी पार करीत गुजरात, राजस्थान व वायव्य भारतात आपल्या किर्तनाच्या रसाळ वाणीने अध्यात्मिक ज्ञानदान केले व सामाजिक प्रबोथनाने जनजागरण केले. बेदी, तीखाण, सप्पय, बावा इ.जाती व्यवसाई नामदेवांना वैष्णव कुल पुरूष म्हणून श्रद्धेने पुजतात. भुतपींडचे बोहरादास सारखे त्यांना शिष्य लाभले. नामदेवांनी वास्तव्य केलेल्या तलावास आजही नामियानी तलाव या नांवाने ओळखले जाते.सुखोवाल व धारीवाल येथेही त्यांचे शिष्य अनुयायी राहतात. पंजाब मधील त्या काळातील वास्तव्यात ध्यान धारणेसाठी नैसर्गिक सानिध्याचे स्थान निवडले व तीथे ध्यान धारणा करू लागले. या आश्रमाच्या बाजूलाच त्यांच्या शिष्य अनुयायी यांनी घोमान हे गांव वसवले. केशो हा शिष्य त्यांना तेथे लाभला. त्या काळातील दिल्ली बादशहा अल्लाउद्दिनने नामदेवाला तीथे मंदिर बांधण्यास देणगी दिली. घुमान येथे पुढे आठराव्या शतकात सुंदर नामदेव स्मारक उभारले गेले. त्यांच्या शिष्यांच्या पंजाबी रचना प्रसिद्ध आहेत. रामानंदाच्या भक्ती संस्काराने, रामानंद, कबीर, रोहिदास, विष्णुदास यांनी आपल्या काव्यरचनेत संत नामदेवांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. संत नामदेवांच्या दोन शतकानंतर जन्मलेल्या शिखांचे गुरूनानकजी यांनी शिख संप्रदायाच्या अध्यात्मिक तत्वे जपजी मधील मुलतंत्रात सांगितलेले इक ओंकार निरंकार, सत्नाम कर्तापुरूख हा मुलमंत्र संत शिरोमणी नामदेवांच्या शिकवणीचा, त्यांच्या पासूनच्या प्रेरणेचा, ईश्वराच्या नामस्मरण संस्कारांचा सुगंधीत अंश आहे. त्यांचे अनेक अभंग उपदेशासाठी गुरूवाणीत अनुवादित केलेले आहेत. या आदीग्रंथात नामदेवांची मराठी साधूभाषा व पंजाबी भाषेचा मधुरमेळ जुळवून त्यात गीत गुणपरीता साधत विवीध रागदरीत बसविल्या आहेत. शिखांच्या गुरू साहेब मध्ये ही त्यांच्या गुरूभक्ती याशयधनाची हिंदीतील चौसष्ठ पदे समाविष्ट केलेले आहेत आणि ही मराठी रचनेची दर्जेदार उंची इतकेच श्रेष्ठ व श्रवणीय आहेत. संत नामदेव म्हणजे संत संगहीच वासनेची संगत सोडविणारे साधन आहे हे सांगणारे स्पष्टोक्ते, भक्ती व नामस्मरणाचे पुरस्कर्ते, जातीभेदन माननारे, संत व हरिनामाच्या सुखात आपले सुख मानणारे, केशवाच्या ध्यासामध्ये पंचमहाभूतांचा सन्मान जाणणारे, कीर्तनात स्वत:तल्लीन होऊन नाचणारे, भागवत धर्म, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासह शिख संप्रदायात अध्यात्मात लौकीकपात्र ठरलेले हे संत शिरोमणी नामदेव महाराज. संत नामदेवांनी श्रद्धाभक्ती व नाममहात्माचा प्रचार एकाच ठिकाणी न स्थिरावता केला. त्यांचे अंतर्मन सावळ्या फरब्रम्ह विठुमाऊलीच्या ओढीने पंढरपूरला सारखे आकर्षीत असावयाचे. यामुळेच त्यांनी आपल्या आयुष्याच्या अंतकाळी पंढरपूरला वास्तव्य केले.
नामा म्हणे आम्ही पायरिचे चिरे |
संत पाय हिरे देती वरात्यांच्या
अभंगवाणीला न्याय देत त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर इ.स 1350 मध्ये विसावा घेतला. वैकुंठ प्रयाणाच्या शेवटच्या क्षणी विठ्ठल पायरीवर विसावा घेण्याच मुख्यकारण अनंतकाळ विठ्ठलालाची दृष्टी त्यांच्यावर रहावी व सृष्टीच्या अंतापर्यन्त विठु रूख्माई माऊलींचे दर्शन नित्यनियमाने दिन प्रतिदिन त्यांना घेता यावे. संतांची व वारकरी मंडळींची पायधुळ आज ही नामदेव पायरीला लागते. नामदेव पायरीचे दर्शन घेतल्याशिवाय दर्शन भगवंताला ही मान्य नाही आणि सरळ दर्शनाचे पुण्यही लाभत नाही. नामस्मरणा शिवाय परमेश्वराची प्राप्ती होऊच शकत नाही हा अर्थ या श्रद्धेय साधनेतून जाणवतो. संत नामदेव किर्तनात मोक्षप्राप्ती सामर्थ होते. त्यांच्या किर्तनात स्वत: भगवंत तल्लीन होऊन नाचले. या पावन संतांच्या देहाचे पावित्र्य जपणारी ही नामदेव पायरी म्हणजेच श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांची पवित्र समाधी. संत नामदेवाच्या पवित्र वस्रांची समाधी अर्थात स्मारक घुमान (घोमान) येथे असावा असे मान्यवर संत संशोधकांचे मत आहे. या घुमान येथिल संत नामदेव स्मारकास शिख संप्रदायी संत शिरोमणी बाबाजींचा गुरूद्वारा म्हणून श्रध्येयस्थानी मानतात हे विशेष होय. घुमान येथे विश्व मराठी साहित्य संमेलन भरल्यापासून दरवर्षी नित्याने नादेड-घुमान ही घुमान यात्रेच आयोजन नानकसाई प्रतिष्ठान आयोजीत करीत असते. संत नामदेवांनी रचलेली युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ही विठु माऊलींची आरती आणि घालीन लोटांगण वंदीन चरण |डोळ्याने पाहिल रूप तूझे || ही शेजारती महाराष्ट्रात अवर्जून म्हणली जाते. त्यांच्या नावातच नाम आणि देव ह्या नांवातूनच त्यांचे अभंग व्यक्तिमत्व आणि कवित्वाचे दर्शन होते. जास्त आयुर्मान लाभलेल्या या संतांचे साहित्य हे सदा चैतन्याचा अविष्कार देत प्रफुल्लित राहणार आहे. जातीवरून माणसाची पारख करू नये, जाती पेक्षा भक्ती श्रेष्ठ असल्याची त्यांची कुश्चल भुमीवर उगवली तुलसी | अपवित्र तियेसी म्हणोनये || ही रचना तेच दर्शविते. संत नामदेवांनी स्वत:च्या जातकुळा विषयी, पिढीजात धंद्या विषयी आणि विठ्ठल भक्ती विषयी न संकोचता स्पष्टपणे लिहीले आहे. शिंपीयाचे कुळा जन्म माझा झाला परि हेतू गुंतला सदाशीवी ||...{566} संत नामदेवांनी मराठी भाषेत संत चरित्र लिहीण्याची संत नामदेवांची कल्पना प्रथम प्रत्यक्षात आणली. संत नामदेवांनी आदी समाधी या दोन प्रकरणात संत ज्ञानदेवांचे अभंगरूप चरित्र लिहीले. पुढे संत एकनाथ व स्वत: संत तुकारामांनी स्वत:ही संत रचना साकारली आहे. नामदेवे रचिला पाया | तुका झालेसी कळस || ही रचना याचे प्रत्यक्ष प्रमाण आहे. संत नामदेवांच्या एक नाम केशवाची प्रचिती भक्तीरसाचे प्रेम अंगात भरले असता त्या छंदावर नाचत प्रेमपिसे भरले अंगी | गीत संगे नाचो रंगी || ही त्याची रचना भक्ति समरसतेचा परमोच्य बिंदू आहे. वैष्णव भक्त व शिवभक्तांना एकसंघ करण्यासाठी त्यांनी हर हर शंभो सांब सदाशिव हा नाम मंत्रोच्चार केला. बोलू ऐसे बोल | जेने बोले विठ्ठल डोले || ही सद्भावना प्रत्यक्षात आणून संत शिरोमणी नामदेवांनी विविध जनजातीतील जनसमुदायात सामाजिक सलोखा निर्माण करून मानवतावादी प्रेरणेने समृद्ध करून विठ्ठल भक्तिचा जागर केला हे उल्लेखनीय आहे. सदर लिखाण हे मी श्री संत नामदेव महाराजांवर ऐकलेले विविध व्याख्यान, प्रवचन व विविध पुस्तकांचे वाचनावर समिक्षण म्हणून संत नामदेव यांच्या भक्त परिवाराला वाचण्यासाठी लिहीलेलं शब्दांकन आहे. याकरिता सर्व संबधितांचे सौजन्यपूर्ण आभार
- © राजेंद्र रापतवार,
(सचिव, संत नामदेव संजीवन समाधी सोहळा 2024., शिंपी समाज, अंबाजोगाई.)
मोबाईल - 9850986765
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*(विशेष टिप - संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई यांनी संदर्भासह लिहिलेल्या लेखात त्यांनी मांडलेल्या मतांशी, विचारांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. - संपादक )
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment