महाविकास आघाडीची गांधीगिरी ; अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला घातला फुलांचा हार ; महावितरणने कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन करणार - राजेसाहेब देशमुख
महावितरणने कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन करणार - राजेसाहेब देशमुख
महावितरणच्या अनागोंदी कारभाराला जनता वैतागली - माजी आमदार पृथ्विराज साठे
================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून महाविकास आघाडीसह शेतकऱ्यांनी गांधीगिरी करीत अनोखे निषेध आंदोलन केले. तालुक्यातील शेतकरी मागील अनेक दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ नियोजनाने, दप्तर दिरंगाई, मनमानी कारभारामुळे तसेच जळालेली विद्युत जनित्रे वेळेत न बसविल्याने, उपलब्ध करून न दिल्याने वैतागले आहेत. या कार्यालयातील अधिकारी नेहमीप्रमाणेच आढळून न आल्याने महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी मंगळवार, दिनांक २५ जुन रोजी गांधीगिरी करीत कार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला फुलांचा हार घालून अनोखे आंदोलन केले. यावेळी बोलताना महावितरणने तात्काळ कारभार सुधारावा, शेतकरी आणि इतर सर्व वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी अन्यथा जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला. तर महावितरणच्या अनागोंदी कारभाराला जनता वैतागली असल्याचे माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी सांगितले.
महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोखे गांधीगिरी आंदोलन का करावे लागले याविषयी अधिक माहिती देताना बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सांगितले की, महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकारी उपलब्ध होत नाहीत, ज्यांच्याकडे वशिला त्याला डिपी मिळतो. गरजू, गोरगरीब शेतकऱ्यांना डिपी सहज मिळत नाही. तसेच नादुरूस्त डिपी आणणे व दुरूस्त झाल्यावर परत पोहोचविणे हे महावितरणचे काम असताना तसे न करता महावितरणचे अधिकारी शेतकऱ्यांनाच हे काम स्वखर्चाने करावयास लावतात. अशा अनेक तक्रारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमच्याकडे केल्या आहेत. जनता महावितरणच्या दप्तर दिरंगाई व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाची हेळसांड होऊ नये, म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आज कार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन केले आहे. परंतु, यापुढे ही जाणिवपूर्वक हालगर्जीपणा करून जनतेला त्रास दिला. तर महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिला. या बाबत बोलताना माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी सांगितले की, एकिकडे अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशी वीज उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे मात्र जबाबदार अधिकारी हे कार्यालयातच उपस्थित नसतात. यावर्षी शेतातील उभी पिके जळताना बघण्याची वाईट स्थिती उद्भवली. महावितरणच्या भोंगळ व अनागोंदी कारभाराला जनता आता खूप वैतागलेली आहे. कारभार सुधारा, पारदर्शक ठेवा अन्यथा महावितरण कंपनीच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरेल असे माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष अमर देशमुख म्हणाले की, विद्युत जनित्र मंजूर असूनही ते वेळेवर बसविले जात नाहीत, ते तातडीने बसवावेत. महावितरणच्या भोंगळ कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. मंगळवारी आम्ही शेतकऱ्यांसह महावितरणच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांच्या कानावर हे गाऱ्हाणे घालण्यासाठी आलो असता, या ठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांसह आम्ही सुमारे एक ते दीड तास वाट बघून कोणीच आपली दाद-दखल घेत नाहीत. या कारणास्तव गांधीगिरी करीत कार्यकारी अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला फुलांचा हार घालून अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला आहे. याप्रश्नी लवकरच मोठे आंदोलन केले जाईल. शिवसेनेच्या मदनलाल परदेशी यांनी ही महावितरण कंपनीच्या बोगस कारभाराचा समाचार घेतला. येथील महावितरणच्या कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांनी त्यांची कार्यपद्धती बदलावी, उंटावरून कारभार हाकू नये, ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. या कार्यालयाचा कारभार रामभरोसे होवू नये अशी अपेक्षा ही परदेशी यांनी व्यक्त केली. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, माजी आमदार पृथ्विराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ईश्वर शिंदे, शिवसेनेचे मदनलाल परदेशी, तारेख अली उस्मानी, तानबा लांडगे, कल्याण भिसे, शेख मुक्तार बागवान, यशोधन लोमटे, हमीद चौधरी, सिध्दू लोमटे, सुधाकर जोगदंड, जुम्मा चौधरी, अमर शिंदे, अमित सोळंके, नाना लोमटे, गणेश शेप, अमन परदेशी, सलिम पिंजारी, राहुल सिरसाट, गणेश घाडगे, रवि मोरे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन महावितरण प्रशासनाचा निषेध केला.
=================================
Comments
Post a Comment