सोयाबीन पिकात 'अष्टसुत्री'चा वापर करून उत्पादन वाढवा - कृषि सहसंचालक शंकरराव तोटावर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

सोयाबीन पिकात 'अष्टसुत्री'चा वापर करून उत्पादन वाढवा - कृषि सहसंचालक शंकरराव तोटावर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

"शेतातच करा नैसर्गिक खत निर्मिती" - या विषयावर कार्यशाळा ; शेतकऱ्यांचा प्रतिसाद

=================================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) 

तालुक्यातील मौजे चनई आणि माकेगाव येथे अफार्म-पुणे, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, पंजाबराव देशमुख सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेती मिशनचा पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत निर्मितीचे तंत्र या विषयावर कार्यशाळेचे आयोजन गुरूवार, दिनांक १३ जुन रोजी करण्यात आले होते. यावेळी सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी शंकरराव तोटावर (सहसंचालक, कृषि विभाग, नागपूर) यांनी सोयाबीन पिकाच्या पेरणी अगोदर पासून तर काढणे पश्चात तंत्रज्ञानापर्यंत अगदी मुद्देसूद माहिती पीपीटी द्वारे शेतकऱ्यांना दिली. तसेच सोयाबीन पिकात अष्टसुत्रीचा वापर करून उत्पादन वाढवा असे आवाहन कृषि सहसंचालक शंकरराव तोटावर (नागपूर) यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यशाळेस तालुक्यातील विविध गावच्या शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

चनई (ता.अंबाजोगाई) येथील श्री खंडोबा मंदिरात तसेच माकेगाव येथे ही शेतकऱ्यांसाठी अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत निर्मितीचे तंत्र या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच सोयाबीन पिकावरील उत्पादन खर्च कमी करून निव्वळ उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. हि कार्यशाळा अफार्म, पुणे, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ, पंजाबराव देशमुख सेंद्रीय शेती व नैसर्गिक शेती मिशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आली होती. चनई येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा (काकाजी) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शंकरराव तोटावर (सहसंचालक, कृषि विभाग, नागपूर) व डॉ.संतोष चव्हाण (संचालक, फार्मलॅब्स, पुणे व संशोधन संचालक जयकिसान शेतकरी गट, वाशिम, संस्थापक - शेतकऱ्याच्या बांधावरची सेंद्रीय प्रयोगशाळा, वाशिम) हे मान्यवर उपस्थित होते. प्रथम सत्रात बोलताना शंकरराव तोटावार यांनी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीची अष्टसुत्री या विषयावर पीपीटीच्या द्वारे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अष्टसुत्रीमध्ये बियाणे प्रतवारी, बियाण्याच्या उगवणशक्ती तपासणीच्या घरगुती पध्दती, बिजप्रक्रिया, सुधारित वाण, पेरणी व पेरणीची खोली, पेरणीची पध्दत व त्याची मात्रा, रासायनिक खत मात्रा, तणनाशकाचा वापर याचे विश्लेषण हे शास्त्रीय पध्दतीने केले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीन पेरण्यासाठी सुधारित वाण ६७ टक्के बियाणे हे स्वायरल सेप्रेटरद्वारेच केलेले असावे. बाजारातून नवीन वाण खरेदी करावयाचे असल्यास त्याची उगवण शक्ती तपासावी ६० टक्के पेक्षा कमी उगवण शक्ती असेल ते बियाणे वापरू नये. पाच दिवसानंतर अंकुरित बियांची टक्केवारी काढावी. आणि बिजप्रकिया करावी. आपल्या शेतात सतत दोन-तीन दिवस ७५ ते १०० मि.मी, किंवा ६ इंच जमिन ओली झाल्यानंतर वापसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे ३ ते ५ सें.मी. खोलीवर पडत असल्याची खात्री करावी. बहुपिक पेरणीचा वापर केल्यास शेतकऱ्यांचा फायदाच होतो. यासाठी ४:१ किंवा ६:१ (सोयाबीन + तुर) पेरणी करावी. हि करताना बीबी एक टोकण यंत्र किंवा बैलाच्या सहाय्याने करावी म्हणजे अधिक फायदा होईल. असे सांगून त्यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादन वाढीचा कानमंत्र दिला. तोटावार यांनी सांगितले की, बीड जिल्हात मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. परंतु, दिवसेंदिवस सोयाबीनचे उत्पादन घटत आहे. तर दुसरीकडे सोयाबीनच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होताना दिसत आहे. उत्पादन खर्च कमी करून उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सोयाबीन मध्ये होणाऱ्या छोट्या - छोट्या चुका सुधारून त्या अष्टसूत्रीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासमोर मांडण्याचा एक प्रयत्न केला व त्यामुळे जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होवू शकते. सोयाबीन पिकाच्या पेरणी अगोदर पासून तर काढणे पश्चात तंत्रज्ञानापर्यंत अगदी मुद्देसूद माहिती पीपीटी द्वारे तोटावार यांनी शेतकऱ्यांना देवून सोयाबीन पिकात अष्टसुत्रीचा वापर करून उत्पादन वाढवा असे आवाहन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ.संतोष चव्हाण यांनी अल्पखर्चात शेतातच नैसर्गिक खत कशा पध्दतीने तयार करायचा या विषयावर पीपीटीच्या द्वारे शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. रासायनिक खतांच्या वाढत्या प्रमाणामुळे जमिनीची नापिकी वाढून त्याचे रूपांतर विविध मानवी रोगात. जसे की, कॅन्सर मध्ये होत आहे. यावर एकच उपाय म्हणजे शेतकऱ्यांना घरात तसेच बांधावर कमी खर्चात खत तयार करता येते. घरातील दररोजच्या वापरातील चहा पत्तीवर सुध्दा खत तयार करता येतील. केळीच्या सालीवर ट्रायक्रोडर्मा तयार करता येतो. घरी एक किलोच्या ज्वारी पीठ तयार करताना १ किलोच्या प्रमाणात ज्वारी, बाजरी, गहु, तांदुळ व डाळीचे पीठ एकत्रित करून ही व आंबवून ते पिकासाठी खुप लाभदायक होते.‌ शेतकऱ्यांनी आपल्या बांधावरील विविध झाडपाला कुजवुन दशपर्णी अर्क तयार करून तो पिकांना फवारला तर किडे नियंत्रण होण्यास मदत होते. सोबतच शेतकरी याचा स्वतः व्यवसाय ही करू शकतो. शेतात किंवा घरात अशा प्रकारची खतं व जैविके तयार करता येतील. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातच खते, जैविके, तयार करावीत, तसेच या पध्दतीचा अवलंब करून गावातील परिसरातील शेतकऱ्यांना खते व जैविके तयार करून वापरता येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव खोगरे (सचिव, जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ) यांनी केले. या प्रसंगी दगडुसाहेब देशमुख, अमर देशमुख, विक्रमराव देशमुख, चंद्रशेखर तोटावार, बाबुराव धिमधीमे, अनुरथराव मामडगे, बापू आजबे, शरद देशपांडे आदिंसह मान्यवर व प्रगतशील शेतकरी बांधव उपस्थित होते. या कार्यशाळेचा माकेगाव व चनई व परिसरातील एकूण ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

============================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)