सुनिलकाका लोमटे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

                                या सम हा..!

===================================

सुनिलकाका लोमटे हे एक अंबाजोगाई पंचक्रोशीतील उगवत आणि उमलतं व्यक्तीमत्व. दिवसागणिक ते बहरत विकसित आणि उमलत जात होते आणि सुगंध उधळत होते. त्यांचा वेग इतका मोठा होता की, जणु त्यांस लवकरच कोमजण्याची जाणिव तर झाली नव्हती ना..?

====================================

मी अंबाजोगाई येथे सन - २०१५ ते २०१६ या कार्यकालात जिल्हा व सत्र न्यायाधीश होतो. शेवटच्या एक महिन्याच्या कार्यकालात सुनिल काकांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शोभाताई माझे समोर जिल्हा सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. त्या निमित्ताने त्यांचा व माझा परिचय होता. परंतु, सेवानिवृत्ती नंतर आमचा संपर्क राहिला नाही. योगायोगाने मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने 

उस्मानाबाद (धाराशिव) येथे गेलो असता तेथे शोभाताईंची व माझी भेट झाली. संमेलन संपले नंतर दुसरेच दिवशी दिवंगत सुनिल काकांचा वाढदिवस असलेने त्यांचे अग्रह व विनंती वरून मी अंबाजोगाईला गेलो. तेव्हाच सुनिलकाकांचे दिवसभर पहिले आणि शेवटचे सान्निध्य मिळाले नव्हे लाभले. त्यामुळेच मला सुनिल काकांचा सखोल जीवन परिचय, विचारांची अदान-प्रदान अनुभवता आणि निरीक्षिता आली. सुनिल काकांचा जन्म नबाब या बहुप्रतिकष्ठीत, सुसंस्कृत, नामांकीत सुसंपन्न खानदानी घराण्यातला. अशा घराण्यात जन्मलेले सुनिलकाका फक्त सुशिक्षित नव्हे तर सुसंस्कृत लोभस व्यक्तीमत्व आणि ते प्रथम भेटीतच जाणवले. सदासर्वदा हसरा चेहरा, गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रिडा विषयक विशेषतः क्रिकेट या सर्व विषयांचे सखोल ज्ञान व अभिरूची हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्ये. आणि मला तर ते विशेष करून विशद करावेसे लागेल. त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अवलोकन आणिक निरीक्षणा वरून सुनिलकाका बरेचसे समजले, उमजले आणि उलगडले. वाढदिवसाच्या दिवशी समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व्यवसायिक, आणि इतर क्षेत्रातील नागरीकांची रीघ बघून सुनिलकाकांचा मित्र, स्नेही, समर्थक परिवार पाहिल्या नंतर ते एक जणु अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेचे जाणवले. त्या ह्रद्य सोहळ्यात समाजातील सर्व थरातील वयस्क आणि तरूण स्त्रिया, सर्व जात धर्म पंथांचे सुजाण नागरीक पाहिल्या नंतर माझी मनोमन खात्री पटली की, सुनिलकाका हे किती समाजप्रिय आणि तळागाळापर्यंत पोहोचलेलं अनाकलनीय मिश्रण आहे. सुनिल काकांचे व्यक्तीमत्वाची घडण नबाब घराण्यास साजेशी होती. विचारांची उत्तुंगता आणि सामाजिक जाण आणि भान याची सामुद्रिक खोलीशीच तुलना करावी लागेल. वयाच्या पन्नाशीच्या आसपासच जे व्यक्तीमत्व बुध्दी, विद्वता, तळागाळापर्यंत सामाजिक समस्यांची जाण व उपाय आणि मार्ग असलेल ते एक अनाकलनीय व्यक्तीमत्व होत. अशा पार्श्वभूमीवर सुनिलकाका राजकारणापासून अलिप्त राहतील ते सुनिलकाका कसले..? अशा या व्यक्तीमत्वाला श्रेष्ठींनी न हेरले तरच नवल. म्हणून तर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचे भाग्य त्यांना अल्पवयातच लाभले होते. एकंदरीत सुनिलकांच्या गत जीवणाचे चिंतन, मंथन, परिक्षण, आणिक अवलोकन केले तर त्यांना भविष्यकाळ उज्ज्वल आणि दैदिप्यमान होता हे सांगण्यास कुण्या भविष्यवेत्याची गरज नाही. परंतु, नियतील जणु ते अभिप्रेतच नव्हते. म्हणूणच की, काय सुनिलकाकांना इहलोक, अल्पवयात, आकस्मिकरित्या सोडावा लागला हे त्यांचे नव्हे तर समाजाचेच दुर्दैव म्हणावे लागेल. सुनिल काकांच्या आवडत्या क्रिकेट भाषेत बोलायाचे झाल्यास सुनिलकाका फलंदाजीस आले, पहिल्या पाच चेंडूंवर षटकार ठोकले आणि सहाव्या चेंडूवर मात्र सीमारेषेवर झेलचित झाले. सुनिलकाकांच्या सामाजिक आणि राजकीय जीवणशैलीचे तटस्थ दृष्टीकोनातून मुल्यमापन करावयाचे झाल्यास त्याची जीवननीती आणि जीवनशैली ही ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशी होती. म्हणूनच ते राजकारणी कमी आणि समाजकारणी अधिक होते. माझ्या निरीक्षणा वरून दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेबांचा वरील वैचारीक वारसा चालविणारा जिल्हास्तरावरील दुर्मिळ राजकारणी व वैचारीक वारसदार म्हणून सुनिल काकांचा प्रकर्षाने नामोल्लेख करावा लागेल. सुनिल काकांसारखे दुर्मिळ व्यक्तीमत्व अकाली आकस्मिक पडद्याआड जाणे हे समाजाचे दुर्दैव. नियतीपुढे देवादिकही श्रेष्ठ नाही (पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा) तरीही सुनिलकाकांचा वैचारीक सामाजिक आणि राजकीय वारसा चालविण्यास आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकुन मार्गक्रमण करण्यास त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शोभाताई या समर्थ आहेत. त्यांना त्यांचे सुपुत्र श्रीकृष्ण याचा देखील हातभार लागणार आहे. उभयता सुनिलकाकांचा वारसा भविष्यात पुढे चालवून यशस्वी मार्गक्रमण करतील हिच अपेक्षा आणि सदिच्छा..!

शुभ्र सुंदर तो एक मोगरा होता, 

परिमळाने परिसर अक्रांदिला.

आकस्मिक फक्त नियती जाणो

अकल्पित होवूनिया तो कोमेजला.    


घुमे सर्व सुगंध तयाचिया भुवरी

राहो अमर आणिक दरवळत.

कधी न लाभो अंत तयाशी

वाहे सरिता जशि खळखळत.


लेखन :

-- वसंत शिवराम पाटील (हगवणे),

जिल्हा व सत्र न्यायाधीश (से.नि.)

नाशिक.

=======================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)