योग प्रशिक्षक दत्ता लांब यांची निस्वार्थ योगसेवा प्रेरणादायी - दत्तात्रय दराडे
योग प्रशिक्षक दत्ता लांब यांची निस्वार्थ योगसेवा प्रेरणादायी - दत्तात्रय दराडे
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
मागील १० महिन्यांत शहर व परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयातून तब्बल ४० हजार विद्यार्थ्यांना योगाचे निःशुल्क धडे देवून प्रशिक्षित करणार्या माजी सैनिक योग प्रशिक्षक दत्ता सदाशिव लांब यांच्या लोखंडी सावरगाव येथे आयोजित तीन दिवसीय ६९ व्या शिबिराच्या समारोप प्रसंगी मान्यवरांकडून नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना योग प्रशिक्षक दत्ता लांब यांची निस्वार्थ योगसेवा ही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दत्तात्रय दराडे यांनी केले.
पतंजली योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक माजी सैनिक आयुर्वेदिक चिकित्सक दत्ता लांब मागील १० महिन्यांत ६९ निःशुल्क योग शिबिरांचे आयोजन केले आहे. योग दिंडी आपल्या दारी या अभियानांतर्गत पतंजली योग समिती व ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ६९ व्या शिबिराचा समारोप ३ मे रोजी झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दत्तात्रय दराडे तर प्रमुख पाहुणे अभियंता अनिल लोमटे, सुरेश बारी, शरद दाने, सुशिल कोरे यांनी योग प्रशिक्षक दत्ता लांब यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी दत्ता लांब यांनी ज्ञानदीप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना धावणे, फिजीकलसाठी उपयुक्त ठरतील अशी योगासने शिकवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या तीन दिवसीय शिबीरात ज्ञानदीप अकॅडमीचे १३० विद्यार्थीनी व १२० विद्यार्थी अशा एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक दत्तात्रय दराडे यांनी लांब यांच्या निःशुल्क, निस्वार्थ योगसेवेचे कौतुक केले. लांब हे भारतीय सैन्यात फिजीकल शिक्षक म्हणून कार्यरत होते. म्हणून त्यांच्या अनुभवाचा आणि मौलिक मार्गदर्शनाचा फायदा ज्ञानदीप अकॅडमीत सैन्य, पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरेल असे सांगून दराडे यांनी पतंजली योग समितीचे आभार मानले. दैनंदिन जीवनात योगाचे काय महत्त्व आहे ते नि:शुल्क शिकविण्याचे काम लांब हे करीत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थ्यांसाठी १५,९,६,३,२ व १ दिवसीय योग प्रशिक्षण शिबीर घेवून यात तब्बल ४० हजारांहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना दिनचर्या, आहार, योगिक डि.बिन्द्रिक, प्राणायाम, सर्व प्रकारचे आसन, योगनिद्रा, ध्यान यांचा अभ्यास व योगाचे धडे देण्याचे मौलिक काम माजी सैनिक लांब हे करीत आहेत. २१ वर्षे भारतीय सैन्य दलात असताना देखील लांब यांनी दरमहा आपली आर्धी पगार गोर-गरीबांसाठी खर्च केली आहे. सैन्यात देशसेवा करून निवृत्तीनंतर मागील १० महिन्यांत देखील ते आपली आर्धी पेंन्शन सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करीत आहेत. ही खरच प्रेरणादायी व कौतुकास्पद बाब आहे. माजी सैनिक दत्ता लांब हे योगाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरातील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांना निःशुल्क, मोफत योग सेवा देवून त्यांचे स्वास्थ निरोगी राहण्यासाठी ते आहोरात्र प्रयत्नशील आहेत. या बाबत त्यांच्याशी संवाद साधला असता योग प्रशिक्षक लांब यांनी सांगितले की, पतंजली योग समितीच्या माध्यमातून व ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पिढीसाठी आम्ही योग शिबीर आयोजित केले होते. या सर्व ६९ शिबिरांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही सर्व शिबीरे अंबाजोगाईकरांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेली होती. या पुढेही निःशुल्क आणि मोफत योग प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करणार आहोत असे माजी सैनिक योग प्रशिक्षक लांब यांनी सांगितले.
====================================
Comments
Post a Comment