बसपाचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.सिध्दार्थ टाकणकरांनी नोंदविला आक्षेप
उमेदवारांच्या अनुक्रमांकाबाबत निकष ठरविण्याची केली मागणी
==================================
बीड (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
बीड लोकसभा मतदारसंघा मध्ये निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या यादीतील अनुक्रमांकाबाबत बहुजन समाज पार्टीचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.सिध्दार्थ राजेंद्र टाकणकर यांनी आक्षेप नोंदविला आहे. याबाबत डॉ.टाकणकर यांनी राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे उमेदवारांच्या अनुक्रमांकाबाबत निकष ठरविण्याची मागणी मंगळवार, दिनांक ३० एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या ३९-बीड लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी संदर्भीय पत्रान्वये निवडणूक निर्णय अधिकारी ३९-बीड लोकसभा मतदारसंघ यांचे पत्र क्र. जा.क्र.२०२४/नि.नि.अ./३९-बीड/का.वि.दि. २९/०४/२०२४ नुसार ३९-बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी त्यांच्या चिन्हासहीत संदर्भीय पत्रान्वये दि.२९/०४/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेली आहे. या पत्रासोबत नमुना ७-अ मध्ये राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध केली आहे. यात बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा त्यास राज्यस्तरीय मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या खाली स्थान दिलेले आहे. अनुक्रमांक २ वर राज्यस्तरीय राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे नांव असून बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचे नांव यादी मध्ये अनुक्रमांक ३ वर दिले आहे. बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्याच्या उमेदवाराचे नांव हे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार येणे आवश्यक आहे. असे नमूद केले आहे. त्यामुळे याबाबत आक्षेप नोंदवत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ.सिद्धर्थ राजेंद्र टाकणकर यांनी राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे उमेदवारांच्या अनुक्रमांकाबाबत निकष ठरविण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि निवडणूक निर्णय अधिकारी ३९-बीड लोकसभा मतदारसंघ, बीड यांना देण्यात आल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार कार्यवाही व्हावी :
बहुजन समाज पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. असे असताना ही अनुक्रमांक-२ वर राज्यस्तरीय राजकीय पक्षाच्या उमेदवाराचे नांव आहे. तर बसपा या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचे नांव हे सदरील यादी मध्ये अनुक्रमांक-३ वर दिले आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टीचा उमेदवार असल्यामुळे माझे नांव हे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार घेण्यात यावे.
- डॉ.सिद्धर्थ राजेंद्र टाकणकर
(उमेदवार, बहुजन समाज पार्टी, ३९-बीड लोकसभा मतदारसंघ, बीड.)
================================
Comments
Post a Comment