स्वराज्य हे सुराज्य झाले, ही शिवराज्याभिषेकाची उपयुक्तता - शिवचरित्र अभ्यासक रविंद्र पाटील
खोलेश्वर महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
==================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क) शिवराज्याभिषेक हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी साध्य नव्हते. तर ते साधन होते, स्वराज्याला एक अधिकृत अधिष्ठान देण्यासाठी शिवराज्याभिषेक हा एक महत्त्वाचा पुरावा होता. स्वराज्य हे सुराज्य झाले पाहिजे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मनस्वी इच्छा होती, हीच शिवराज्याभिषेकाची उपयुक्तता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक तथा प्रख्यात वक्ते रवींद्र पाटील (पाचोरा,जळगाव) यांनी केले. ते खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाईच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा अंतर्गत इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा वर्षाच्या निमित्ताने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून बोलत होते.
या चर्चासत्रातील उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदी खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष विजयराव वालवडकर हे उपस्थित होते. तर मंचावर भा.शि.प्र.संस्थेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य राम कुलकर्णी, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह किरण कोदरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आयोजक डॉ.मुकुंद देवर्षी, माणिकराव बावणे (पाटील) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. इतिहास विभागाच्या वतीने आयोजित या एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वांच्या विविध पैलूंना डोळ्यांसमोर ठेवून तसेच त्यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष या अनुषंगाने विविध सत्रांची रचना करण्यात आली होती. उद्घाटन सत्राच्या प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व देवी सरस्वतीच्या प्रतिमांचे पूजन केले. प्रा.शैलेश पुराणिक यांनी वैयक्तिक पद्य व इशस्तवन सादर केले. बीजभाषण करताना प्रा.रवींद्र पाटील यांनी प्रेरणा शिवराज्याभिषेकाची हा विषय अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे महत्त्व हे आज ३५० वर्षानंतर ही तसूभर ही कमी झालेले नाही. जगातल्या प्रत्येक प्रश्नाचे, समस्येचे उत्तर शिवचरित्रात सापडते म्हणूनच महाराजांचे चरित्र हे जगासाठी मार्गदर्शक ठरणारे असे चरित्र आहे असे त्यांनी सांगितले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व अनेक परकीय शक्तींचा धैर्याने सामना करून शेवटी ते शिवराज्याभिषेकाच्या रूपाने स्थापन ही केले. शिवचरित्राचा हा खराखुरा इतिहास आपण पुढील पिढीला हस्तांतरित केला पाहिजे. महाराजांचे द्रष्टेपण आपल्यामध्ये आले पाहिजे. स्वराज्य उभे करण्यासाठी जे - जे काही चांगले आहे ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात विजय वालवडकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढले. त्यांच्या संपूर्ण हयातीत परकीयांपेक्षा स्वकियांशी लढण्यातच त्यांची अर्ध्यापेक्षा जास्त शक्ती कारणी लागली. पण, तरीही शेवटी त्यांनी स्वराज्य निर्माण केलेच. या स्वराज्याबद्दलचे प्रेम, राष्ट्रनिष्ठा त्यांनी प्रत्येक व्यक्ती व्यक्ती मध्ये रूजविली, त्यांच्या कार्यास मी वंदन करतो असे विचार व्यक्त केले. या सत्राचे आभार प्रा.जिजाराम कावळे यांनी मानले. यानंतर आभासी पद्धतीने संपन्न झालेल्या दुसऱ्या सत्रात बाबू जगजीवनराम शासकीय पदवी महाविद्यालय (नारायणगुडा, हैद्राबाद) येथील इतिहास विभागाचे प्रा.डॉ.गोविंद देशमुख यांनी , छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्यव्यवस्था, या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.बाबासाहेब शेप हे उपस्थित होते. डॉ.देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा तत्कालीन राज्यकारभार हा कसा लोकहिताचा व लोक कल्याणकारी होता हे विविध उदाहरणांमधून स्पष्ट केले. यात त्यांनी तत्कालीन न्यायव्यवस्था, गडकोट व किल्ल्यांची बांधणी, तळी, बंधारे, तलाव, विहिरींची बांधणी, सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेले विविध रोजगार, धर्म संरक्षण आदी बाबी विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगितल्या. तिसरे सत्र ही आभासी पद्धतीने संपन्न झाले. यात केंद्रीय विद्यापीठ कलबुर्गी, कर्नाटक येथील पुरातत्व व इतिहास विभागाचे प्रा.डॉ.विजय सरडे यांनी, सतराव्या व अठराव्या शतकातील मराठा कालीन स्थापत्य, या विषयावर आपले विचार मांडले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.अनंत मरकाळे हे उपस्थित होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी विविध प्राचिन वास्तू, मंदिरे, गड किल्ले आजही मोठ्या दिमाखात उभी आहेत, त्यांचा पुरातत्वीय दृष्टिकोनातून सविस्तर व बारकाईने अभ्यास होणे गरजेचे आहे. या संशोधनासाठी खूप मोठा वाव आहे. या संशोधनातून अनेक बाबी समोर येऊ शकतात म्हणून आणखी जास्तीच्या संशोधनाची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात डॉ.अनंत मरकाळे यांनी लोककल्याण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचा केंद्रबिंदू होता असे सांगून राज्याभिषेकाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेच्या मनात आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचा अभ्यास सविस्तरपणे करणे गरजेचे आहे असे यावेळी ते म्हणाले. समारोप सत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसुंधरा महाविद्यालय (घाटनांदुर) चे प्राचार्य डॉ.अरूण दळवे हे लाभले होते तर मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी, आयक्वँक समन्वयक प्रा.सतीश हिवरेकर, डॉ.बाबासाहेब शेप, उपप्राचार्य डॉ.रवींद्र कुंबेफळकर, डॉ.सुभाष पटेकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक व्यक्तिमत्व - हा विषय मांडताना डॉ.दळवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना नीटपणे समजावून सांगितला पाहिजे. महाराजांच्या कार्यकाळात ही अनेक समस्या होत्या परंतु, त्यांनी आपल्या युक्तीने व बुद्धीचातुर्याने त्या समस्या सोडविल्या, म्हणून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील एक तरी शिवगुण आपण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ.मुकुंद देवर्षी यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले की, शिवचरित्र हे केवळ महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी नाही. तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. आजतागायत अनेकांना त्यातून प्रेरणा मिळालेली आहे. आजच्या प्रशासनातील अडचणींना शिवचरित्रात उत्तरे सापडतात. महाराजांची शिस्त व ध्येय जाणून घेतले पाहिजे. त्यांची पूजा करून महाराजांचे गुण अंगिकारले पाहिजेत. त्यांनी जनकल्याणाच्या अनेक योजना राबविल्या म्हणूनच ते लोक कल्याणकारी राजे बनू शकले. या शिवचरित्राला डोळसपणे पाहण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. या सत्राचे आभार प्रा.डॉ.तृप्ती पाडेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कालिदास चिटणीस यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी खोलेश्वर शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, इतिहास प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इतिहास विभागातील प्रा.कालिदास चिटणीस, प्रा.किशोर काळुसे तसेच प्रा.डॉ.रोहिणी अंकुश, प्रा.रमेश वैद्य, प्रा.अमोल गणोरकर, प्रा.जीवनकुमार बाचेवाड, प्रा.डॉ.तृप्ती पाडेकर, सर्व सेवकवर्ग यांनी परिश्रम घेतले.
==================================
Comments
Post a Comment