वीज जोडणी मिळेना ; आजी माजी सैनिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा
वीज जोडणी मिळेना ; आजी माजी सैनिकांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा
जय जवान आजी माजी सैनिक वसाहतीत अंधाराचे साम्राज्य
================================
अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)
मागील अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा व सर्व बाबींची पूर्तता करून ही येथील गट नंबर 591(फौजी निगराणी तामीरात) या जमिनीमधील सैनिकांच्या 572 परिवारांना वीज पुरवठा व घरगुती मीटर जोडणी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत महावितरणने दफ्तर दिरंगाई टाळून तात्काळ विद्युत पुरवठा व घरगुती मीटर जोडणी मिळावी अशी मागणी जय जवान आजी माजी सैनिक संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन पांडुरंग शेप यांनी अंबाजोगाई येथील महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांचेकडे सोमवार, दिनांक 29 एप्रिल रोजी दिलेल्या रिमांयडर निवेदनाद्वारे केली आहे.
जय जवान आजी माजी सैनिक संस्थेच्या वतीने विद्युत पुरवठा व घरगुती मीटर मिळण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अंबाजोगाई येथील गट नंबर-591(फौजी निगराणी तामीरात) या जमिनी मध्ये सन-2011 पासून आजी माजी सैनिकांच्या 572 परिवार हे कायमस्वरूपी घरे बांधून राहत आहेत. 164 परिवारांची अंबाजोगाई नगरपरिषदेने पीटीआर रजिस्टरला भोगवटादार नांवाने नोंद घेतली आहे. घर क्रमांक प्राप्त झाला आहे. आम्ही रितसर मालमत्ता कर भरला आहे. त्यामुळे ज्यांच्या नांवाने पीटीआर आहेत. अशा सर्व आजी माजी सैनिकांच्या परिवारांना वीज पुरवठा व घरगुती मीटर देण्यात यावेत. आम्ही याबाबतची मागणी महावितरण कार्यालयाकडे सातत्याने करीत आहोत. सन-2018 मध्ये 1.3 टक्क्यांच्या स्कीम मधून मंजुरी मिळाली. त्याप्रमाणे एमएसईबीने दिलेल्या रीतसर वर्कऑर्डर प्रमाणे आमच्या संस्थेने हे काम स्वतःच्या पैशाने तब्बल साडेबारा लाख रूपये खर्चून पूर्ण केले. या कामाचा वर्क कंप्लेशन रिपोर्ट सादर करून लेखी कळविले. सदर कामाचा सुपरव्हिजन चार्ज राज्य शासनाला 16 हजार 830/- रूपये इतका भरणा केलेला आहे. महावितरण कंपनी, अंबाजोगाई कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वर्कऑर्डर प्रमाणे सैनिक परिवारांनी स्वतः आपसांत वर्गणी गोळा करून 13 लाख 85 हजार 814/- रूपयांचे विद्युत पुरवठाचे पूर्ण स्ट्रक्चर उभे केले आहेत. याबाबत सदरील कामाचा डब्ल्युसीआर रिपोर्ट 6 मे 2016 रोजी महावितरण कंपनी, अंबाजोगाई कार्यालयास सादर केला आहे. एमएसईबीच्या नियमानुसार वीज मीटर मिळणेसाठी आम्ही ऑनलाईन अर्ज ही दिनांक 18 नोव्हेंबर 2019 रोजी उपकार्यकारी अभियंता, अंबाजोगाई यांचेकडे सादर केलेले आहेत. सर्व प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करून ही विद्युत पुरवठा मिळत नाही. आतापर्यंत या वसाहतीत वीज पुरवठा करणा-या पुर्वीच्या वाहिनीवर एमएसईबीच्या परवानगीने सिंगल फेज वीज पुरवठा सुरू होता. तो 29 जून 2020 रोजी बंद करण्यात आला. सैनिक परिवारांना घरगुती विद्युत पुरवठा मिळावा आणि संस्थेतील विद्युत प्रवाह सुरू करून मिळावा म्हणून पुन्हा 18 मार्च 2024 रोजी उपकार्यकारी अभियंता, महावितरण अंबाजोगाई यांचेकडे विनंती अर्ज सादर केला आहे. महिना संपला तरी कार्यवाही का केली जात नाही. त्यामुळे आता याप्रश्नी 9 मे 2024 पर्यंत जर महावितरण कंपनीकडून कोणताच निर्णय झाला नाही. तर परिवारासह आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदरील निवेदन आयुक्त, मराठवाडा विभागीय (महसुल) आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांना ही माहितीस्तव पाठवले आहे.
सैनिकांच्या परिवारासोबत दुजाभाव करू नका :
या संस्थेच्या अनेक कुटुंबातील सैनिक हे सध्या अतिदुर्गम अशा काश्मीर सीमा, नौशेरा सेक्टर, पुलवामा, लेह, लद्दाख, चीन सीमेवरील चिशुल, खुनी नाला, गलवान घाटी या ठिकाणी देशाचे रक्षणार्थ आपले कर्तव्य बजावत आहेत. तर इकडे या सैनिकांचे कुटुंबीय मात्र अंधाराचा सामना करीत आहेत. वीज पुरवठाच नसल्याने सैनिकांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सैनिकांच्या परिवारासोबत हा दुजाभाव कशासाठी आता तरी महावितरणने याप्रश्नी सहानुभूतीपूर्वक विचार करून आमचा विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित करावा.
- कॅप्टन पांडुरंग शेप
(अध्यक्ष, जय जवान आजी माजी सैनिक संस्था.)
===============================
Comments
Post a Comment