प्रसारमाध्यमांनी संविधान निष्ठा जपायला हवी - पत्रकार प्रशांत लाटकर


प्रसारमाध्यमांनी संविधान निष्ठा जपायला हवी - पत्रकार प्रशांत लाटकर

=============================

अंबाजोगाई (लोकनायक मिडिया न्युज नेटवर्क)

व्यक्ती स्वातंत्र्यातच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही समाविष्ट आहे. जे अधिकार व्यक्तीला आहे तेच प्रसारमाध्यमांनाही आहेत. व्यक्तीनिष्ठ, भेदभाव पूरक व असत्य कथन करणारी पत्रकारीता ही निकृष्ट दर्जाची समजली जाते. तर सत्यशोधन करणारी, शासनाला जाब विचारणारी ध्येयनिष्ठ पत्रकारीता ही कल्याणकारी समजली जाते. पण, आज भांडवलदारी व्यवस्थेने प्रसारमाध्यमांवर काही प्रमाणात ताबा मिळवलेला आहे. त्या माध्यमातून अनेक प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. विविधता जपण्याऐवजी सर्वांना एकाच रंगात रंगविण्याचे कार्य होतांना दिसत आहे. बातम्या वस्तुनिष्ठ स्वरूपात स्विकारण्या ऐवजी त्या बऱ्याचदा मोडून-तोडून प्रसारित केल्या जात आहेत. समस्यांना व सत्याला बगल देण्याची वृत्ती वाढली आहे. त्यातून माध्यामांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. परंतु, सामाजिक माध्यमे मात्र सत्यशोधकाची भूमिका बाजावत आहेत. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या देणगीचा ते पुरेपूर उपयोग करीत आहेत. लोकहित आणि लोककल्याण हेच पत्रकारितेचे ब्रीद असले पाहिजे, राष्ट्रहिताला प्रधान्य देणारी पत्रकारिता सशक्त झाली पाहिजे. संविधानाला जपणारी पत्रकारिता धष्टपुष्ट झाली पाहिजे. यासाठी प्रसारमाध्यमांनी संविधाननिष्ठा जपावी असे विचार पत्रकार प्रशांत लाटकर यांनी व्यक्त केले आहेत. ते संघर्षभूमी येथे आयोजित १४ दिवसीय भीमजयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गणेश सुर्यवंशी हे होते. या कार्यक्रमाची सुरूवात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. नंतर सामूहिक वंदना व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घेण्यात आले. या भीमजयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित संविधान जागृतीपर व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी मराठी पत्रकार परिषद, अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष प्रशांत लाटकर यांनी 'भारताच्या संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांची जबाबदारी' या विषयावर विचार व्यक्त केले. याप्रसंगी पुढे बोलतांना प्रशांत लाटकर म्हणाले की, स्वातंत्र्यापासून ते १९९० पर्यंतच्या काळातील प्रमुख प्रसारमाध्यमे म्हणजे वृत्तपत्र तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन ही होती. या काळामध्ये ध्येयनिष्ठ , समाजाभिमुख आणि समाजाचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता विकसित झाल्याचे आपल्याला दिसते. परंतु, १९९० च्या नंतर मात्र देशात अशा प्रकारच्या पत्रकारितेला ओहोटी लागल्याचे दिसते. २०१० नंतर तर ती अधिकाधिक क्षीण होत गेली. माध्यमांनी राष्ट्रीय सुरक्षितता, आंतरराष्ट्रीय संबंध, देशाची एकात्मता आणि राष्ट्रीय सुरक्षितता या बाबींचे कृतीशील भान ठेवले पाहिजे. तसेच आपली भूमिका व जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली पाहिजे. देशात आज एकतर्फी राजकीय भूमिका घेणारी व धार्मिक भूमिका घेणारी पत्रकारिता होताना दिसत आहे. ही बाब गंभीर व चिंतनीय आहे. नागरिकांनी पत्रकारितेचे हे एकांगी स्वरूप बदलवण्यासाठी सजग राहणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.गणेश सुर्यवंशी म्हणाले की प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा मजबूत असा आधारस्तंभ आहे. लोकशाहीचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही माध्यमांकडे आहे. एकाअर्थाने माध्यमे ही जनमताच आरसा आहेत. लोकांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता दिनबंधुच्या माध्यमातून क्रांतीसूर्य जोतीराव फुले यांनी केली. तर मूकनायकच्या माध्यमातून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही केली. वृत्तपत्र हे बदलाचे क्रांतिकारी माध्यम आहे हे त्यांनी दाखवून दिले. आज लोकांचे प्रश्न मांडणारी प्रखर भूमिका घेतांना माध्यमे दिसत नाहीत. शासनाच्या स्थापने मध्येही आज माध्यमांची भूमिका ही महत्त्वाची ठरताना दिसत आहे. माध्यमे जर आपली जबाबदारी पार पाडत असतील तरच देश विकसित होईल. आणि प्रसारमाध्यमांनी जर आपली जबाबदारी पार पाडली नाही तर देश संकटात येईल. असे विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि प्रास्ताविक ॲड.संदीप थोरात यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पंकज भटकर यांनी मानले. कार्यक्रमाची सुरूवात सामूहिक वंदना व उद्देशिका वाचनाने झाली. तर समारोप राष्ट्रगीताने झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड.शाम तांगडे, गुलाबराव गायकवाड, संजय हतागळे, बाबुराव मस्के, विश्वनाथ सावंत, डॉ.किर्तीराज लोणारे, भारत सातपुते, वामन वाघचौरे, चंद्रमणी गोवंदे, संजय आचार्य, पांडुरंग लांडगे आदींनी विशेष प्रयत्न केले.

=================================

Comments

Popular posts from this blog

जाहिर प्रगटन

ऋषिकेश लोमटे यांची बीड जिल्हा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुखपदी निवड

जातीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे विश्वाला विश्वासपूर्वक सांगणारे संत शिरोमणी नामदेव महाराज (लेखक - राजेंद्र रापतवार, अंबाजोगाई)