प्रासंगिक काव्य - एक दिवस अन्नत्यागाने
प्रासंगिक काव्य - एक दिवस अन्नत्यागाने
▪️ कवी विषयी माहिती :
" राजेंद्र रापतवार हे साहित्याची अभिरूची असणारे ज्येष्ठ व्यक्तीमत्व आहे. ते अंबाजोगाईत राहतात. साहित्य क्षेत्रात सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकूंद राजपंखे, अभिकथाकार गोरख शेंद्रे, वात्रटिकाकार रणजित डांगे यांच्याशी रापतवार यांचा विशेष स्नेह आहे. अतिशय संवेदनशील व्यक्तीमत्व आणि शीघ्र कवी म्हणून ही राजेंद्र रापतवार हे सर्वत्र ओळखले जातात. प्रासंगिक विषयावर काव्य निर्मिती हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. अनेक कवी संमेलनातून रापतवार यांनी सहभाग घेतला आहे. १९ मार्च हा दरवर्षी शेतकरी बांधवांविषयी सहवेदना, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर काका हबिब यांच्या नेतृत्वाखाली एक दिवस अन्नत्याग करण्यात येते. अंबाजोगाई शहरात ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार हे या उपक्रमात सक्रिय सहभागी होत आयोजनासाठी पुढाकार घेतात. या उपक्रमाला बळ देण्यासाठी ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार यांनी प्रासंगिक काव्य रचना तयार केली आहे. वाचकांना ती निश्चितच आवडेल अशी खात्री आहे..."
=======================
---प्रासंगिक काव्य---
एक दिवस अन्नत्यागाने
=======================
बळीराजाने आपल्या शेतामंदी
पेरले अस्सल बियाणे.
मातीमधुन उगवण्यासाठी जसे
की,ते बावनकशी सोने.
राबला शेतकरी उन्हा-पावसांत
कधी काकडला थंडीने.
राब-राब राबला शेतमातीत तो
कायम बारा ही महिने.
आस लागली तयाला, हो यंदा
पीक येईल हे जोमाने.
रीन काढले त्याने, आस सुखाचे
दिवस येतील नव्याने.
गाठले त्याला कधी कोरड्या तर
कधी ओल्या दुष्काळाने.
त्यात लेकरांचे लगीन, शिक्षण
भार सोसला तो एकट्याने.
होतो जीव कासावीस त्याचा
ऋण परतफेडीच्या प्रश्नाने.
एकटा पडला तो, ग्रासले का
त्याला नेहमीच उधारीने.
विष पिऊन, फास आवळून
असते का मार्ग काढणे ?
नको अंदोलने, किसान मित्र
होऊन करू जनप्रबोधने.
शेतकरी सहवेदनेला साथ
करू आपण अन्नत्यागाने.
कुणबी, किसानपुत्र, शेतमजुरांनो
वागा आता धीराने.
जाचक कायदे, निसर्ग आपत्ती
संघटीत उपाययोजून टाळणे.
*© राजेंद्र रापतवार (अंबाजोगाई.जि.बीड)
मोबाईल - 9850986765
=======================
Comments
Post a Comment